एकेकाळी महाराष्ट्राच्या सत्तेचे केंद्र अशी पश्चिम महाराष्ट्राची ओळख. सहकारातून समृद्धी आल्याने येथे विकासाची गती उत्तम राहिली. प्रामुख्याने काँग्रेसनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रभाव असलेला हा भाग. मात्र गेल्या दशकात भाजपने बाहेरील नेते पक्षात घेऊन ताकद वाढविली. राज्यात विधानसभेच्या एकूण २८८ जागांपैकी ७० जागा पश्चिम महाराष्ट्रात येतात. जवळपास राज्यातील २५ टक्के जागा या पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर तसेच नगर या सहा जिल्ह्यांतून येतात. शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीमुळे येथील समीकरणे बदलली आहेत.
२०१९ मध्ये पश्चिम महाराष्ट्रातील ७० पैकी सर्वाधिक २७ जागा राष्ट्रवादीने जिंकल्या तर २० जागा जिंकणारा भाजप दुसऱ्या स्थानी राहिला. काँग्रेस १२, शिवसेना ८, तसेच इतरांना ६ जागा मिळाल्या. यंदा महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना रंगेल. आघाडीत काँग्रेस-शिवसेना उद्धव ठाकरे गट तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचा शरद पवार गट प्रामुख्याने सहभागी आहेत. लोकसभेतील निकाल पाहता १२ पैकी सात ठिकाणी महाविकास आघाडीचे खासदार निवडून आले. भाजप आणि शिंदे गटाने प्रत्येकी दोन जागा जिंकल्या तर सांगलीत अपक्ष विजयी झाला.
हेही वाचा : २०२९ मध्ये ‘एक देश एक निवडणूक’
नगर : दूध, कांद्याचा मुद्दा
जिल्ह्यातील १२ पैकी सर्वाधिक सात जागा गेल्या वेळी एकत्रित राष्ट्रवादी काँग्रेसने पटकावल्या. तर भाजपला तीन काँग्रेसला दोन ठिकाणी यश मिळाले. राज्याच्या राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावत असलेले भाजप नेते राधाकृष्ण विखे-पाटील तसेच काँग्रेसचे बाळासाहेब थोरात हे याच जिल्ह्यातील. दूधदराचा मुद्दा तसेच कांदा उत्पादकांची समस्या कायम असल्याने सत्तारूढ महायुतीला काही प्रमाणात अडचण आहे. लोकसभेला जिल्ह्यातील दोन्ही जागा महाविकास आघाडीने पटकावल्या.
कोल्हापूऱ : काँग्रेसला उभारी
गेल्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात सर्वाधिक चार जागा काँग्रेसला मिळाल्या. जिल्ह्यातील दहापैकी अजित पवार गटाचे २ तर शिंदे गटाचा एक व इतर तीन आमदार आहेत. स्थानिक पातळीवर साखर कारखानदारीच्या माध्यमातून पक्षापेक्षा व्यक्तिकेंद्रित प्रभाव दिसतो. त्यामुळे उमेदवारी मिळाली नाही तर अपक्ष म्हणून निवडून येण्याची क्षमता साखर कारखानदारांकडे आहे. लोकसभेला खासदार निवडून आल्याने काँग्रेसला जिल्ह्यात चांगले यश मिळेल अशी अपेक्षा आहे. कागल मतदारसंघातील हसन मुश्रीफ विरुद्ध समरजित घाटगे ही पारंपरिक लढत यंदाही लक्षवेधी ठरणार आहे.
सोलापूर : तुतारीकडे ओढा
काँग्रेसचा प्रभाव असलेल्या या जिल्ह्यात भाजपने पाय रोवले. २०१९ मध्ये विधानसभेच्या ११ पैकी ५ जागा भाजपने पटकावल्या. मात्र यंदा लोकसभेपूर्वी वातावरण बदलले. शरद पवार यांच्या पक्षाकडे ओढा वाढला आहे. लोकसभेला धैर्यशील मोहिते- पाटील घराणे भाजपमधून राष्ट्रवादीत गेल्याने जिल्ह्याचे चित्र बदलले. आता विधानसभेलाही जिल्ह्यात त्याचा परिणाम होईल. जिल्ह्यात काँग्रेसच्या हाती फार काही लागेल असे वातावरण नाही. प्रणिती शिंदे खासदार झाल्यावर त्यांच्या जागेवर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने दावा सांगितल्याने वरिष्ठ पातळीवर हा तिढा सोडवावा लागेल.
हेही वाचा : BJP MLA Munirathna Naidu : कंत्राटदाराचा छळ केल्याप्रकरणी भाजपाच्या आमदाराला अटक; कोण आहेत मुनीरत्न नायडू?
सांगली : जागावाटपाचा तिढा
शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा हा जिल्हा. येथील ८ जागांपैकी सर्वाधिक तीन जागा शरद पवार यांच्या पक्षाकडे आहेत. तर सांगली व मिरज या शहरी भागातील दोन्ही जागांवर भाजपला यश मिळत आले. मात्र लोकसभेला येथून अपक्ष विशाल पाटील यांनी बाजी मारल्यावर भाजपसाठी विधानसभेला जागा राखणे आव्हानात्मक ठरले. दोन्ही आघाड्यांमधून जागावाटप कसे होते त्यावरच निकालाचे चित्र अवलंबून असेल. काँग्रेसकडे दोन जागा आहेत. त्यात जतमध्ये पक्षाचा मार्ग सोपा नाही. जागावाटपानंतरच बंडखोर तसेच नाराजांची भूमिका निकालात महत्त्वाची ठरेल.
सातारा : महायुतीतील एकजूट महत्त्वाची
पश्चिम महाराष्ट्रात महायुतीला सर्वाधिक अपेक्षा सातारा जिल्ह्यातून आहेत. लोकसभेला चुरशीच्या लढतीत येथे भाजपने बाजी मारली. जिल्ह्यातील विधानसभेच्या ८ जागांपैकी भाजप, शिंदे गट व अजित पवार गटाचे प्रत्येकी दोन आमदार आहेत. तर काँग्रेस आणि शरद पवार यांच्या गटाचा प्रत्येकी एक आमदार आहे. राष्ट्रवादीतील फुटीनंतर वाई तसेच फलटणच्या आमदारांनी अजित पवारांना साथ दिली. सातारा येथे भाजपच्या शिवेंद्रसिंह राजेंना फारसे आव्हान नाही. कोरेगाव तसेच माणमध्ये अटीतटी आहे. कराडमध्ये दोन्ही जागा महाविकास आघाडीकडे आहेत. दक्षिणेत यंदा पृथ्वीराज चव्हाण यांना पुन्हा भाजपचे कडवे आव्हान आहे. महायुतीने मनापासून एकमेकांचे काम केले तर साताऱ्यातून अपेक्षा बाळगता येतील.
हेही वाचा : कधीकाळी मतदानावर बहिष्कार टाकणाऱ्या गावात यंदा मतदानासाठी लांबच लांब रांगा; जम्मू-काश्मीरमध्ये बदलाचे वारे?
पुणे : बंडखोरीची भीती
मुंबईपाठोपाठ राज्यात पुणे जिल्ह्यात सर्वाधिक २१ जागा आहेत. त्यात पुणे शहर व पिंपरी-चिंचवड ११ व ग्रामीण भागात १० असे स्वरूप आहे. शहरी भागातील या ११ पैकी सध्या ८ जागा भाजपकडे आहेत. पुण्यात लोकसभेला गेल्या वेळच्या तुलनेत भाजपचे मताधिक्य कमी झाले. दोन्ही आघाड्यांत तीन पक्षांत जागावाटप हा कळीचा मुद्दा आहे. विद्यामान आमदारांच्या पक्षांचे मतदारसंघ कायम ठेवायचे झाले तर, गेल्या वेळी दुसऱ्या क्रमांकावर राहिलेले उमेदवार पर्याय शोधतील. त्यामुळे इंदापूरसारख्या ठिकाणी भाजप नेते हर्षवर्धन पाटील काय करणार, हा चर्चेचा मुद्दा आहे. ग्रामीण भागात शरद पवार यांच्या पक्षाच्या तुतारीचा प्रभाव बऱ्यापैकी आहे. मराठा आरक्षण मुद्द्याची धग कायम आहे.
© The Indian Express (P) Ltd