Anil Deshmukh Katol Assembly Election 2024 : मविआ सरकारच्या काळात गृहमंत्री असताना झालेल्या आरोपांमुळे तुरुंगात जावे लागलेल्या अनिल देशमुख यांनी गेल्या काही दिवसांपासून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. फडणवीस आणि सत्ताधारी महायुतीतील नेतेही देशमुख यांना आरोपांनी प्रत्युत्तर देत आहेत. मात्र, अनिल देशमुख आमदार असलेल्या नागपूर जिल्ह्यातील काटोल मतदारसंघात मात्र त्यांना आव्हान कोण देणार, असा प्रश्न महायुतीला पडला आहे. तुल्यबळ उमेदवाराची वानवा आणि जागा कोणाची, याबाबत महायुतीमध्ये अद्याप मतैक्य झालेले नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नागपूर जिल्ह्यातील काटोल मतदारसंघ हा अनिल देशमुख यांचा बालेकिल्ला मानला जातो. या मतदारसंघातून देशमुख १९९५ ते २०१९ या पंचवीस वर्षात फक्त २०१४ चा अपवाद सोडला तर सलग चार वेळा ते निवडून आले आहेत. २०१४ मध्ये त्यांचे पुतणे व भाजपचे आमदार आशीष देशमुख यांनी त्यांचा पराभव केला होता. २०१९ मध्ये ते पुन्हा निवडून आले असून २०२४ च्या निवडणुकीसाठी त्यांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

हेही वाचा >>> राजधानी दिल्लीचा कारभार नक्की कोणाच्या हातात? कोलमडलेल्या पायाभूत सुविधांसाठी कोण जबाबदार?

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत काटोल मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या उमेदवाराला पाच हजारांची आघाडी मिळाली होती. त्यामुळे देशमुख यांची मतदारसंघावर असलेली पकड कायम असल्याचे स्पष्ट होते. पंचवीस वर्षांच्या राजकीय कारकीर्दीत राज्यमंत्री, कॅबिनेट मंत्री आणि २०१९ मध्ये महाविकास आघाडीत थेट गृहमंत्रीपद भूषवले. मात्र गृहमंत्री म्हणून अडीच वर्षांची त्यांची कारकीर्द वादग्रस्त ठरली. त्याचाच फायदा घेत भाजपने देशमुख यांच्याविरोधात आरोपांचे सत्र सुरू केले आणि देशमुख यांना कारागृहात जावे लागले. राज्यातील महाविकास आघाडी सरकार उलथवण्याच्या प्रक्रियेतील तो एक भाग असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे देशमुख कारागृहात जाणे, त्यांच्या घरावर ईडी आणि प्राप्ती कर विभागाचे छापे पडणे, यामुळे मतदारसंघात देशमुख यांच्याबाबत सहानुभूती आहे.

देशमुख यांनी त्यांच्या दोन वर्षांपूर्वीच्या अटकेच्या मुद्द्यावरून भाजपवर आरोप केल्याने भाजप नेते संतापले असून देशमुख यांना त्यांच्या बालेकिल्ल्यातच घेरण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. मात्र त्यांच्याकडे देशमुख यांना टक्कर देणारा सक्षम उमेदवार नाही, २०१४ मध्ये भाजपने देशमुख यांचे पुतणे आशीष देशमुख यांना रिंगणात उतरवून अनिल देशमुख यांना पराभूत केले होेते, पण हा विजय भाजपचा म्हणण्यापेक्षा आशीष यांचे वडील व काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष रणजीत देशमुख यांनी या मतदारसंघात उभ्या केलेल्या शैक्षणिक आणि संस्थात्मक बांधणीचा होता, असे बोलले जाते. मात्र त्यानंतर आशीष देशमुख यांनी राजकारणात धरसोडवृत्तीचे दर्शन घडवले. भाजप नेत्यांवर टीका करून ते काँग्रेसमध्ये आले व काँग्रेस नेत्यांवर टीका करून भाजपमध्ये आले. त्यांनी सावनेर मतदारसंघावर लक्ष केंद्रित केले आहे.

अनिल की सलील?

अनिल देशमुख हे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे विद्यामान आमदार आहेत. त्यामुळे या जागेवर राष्ट्रवादी शरद पवार गटाचा नैसर्गिक दावा आहे. त्यामुळे महाविकास आघाडीकडून त्यांनाच उमेदवारी मिळेल हे निश्चित आहे. प्रश्न आहे तो देशमुख स्वत: लढणार की मुलगा व जि.प. सदस्य सलील देशमुख यांना रिगणात उतरवणार हा. कारण सलील यांची विधानसभा निवडणूक लढण्याची इच्छा आहे. देशमुख यांनी राष्ट्रीय राजकारणात सक्रिय होऊन सलील यांच्याकडे मतदारसंघाची धुरा सोपवावी, अशी मागणी होऊ लागली आहे.

जागावाटपाचाही तिढा

काटोल मतदारसंघ हा राष्ट्रवादीचा असल्याने त्यावर महायुतीतील घटक पक्ष म्हणून अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून दावा केला जाऊ शकतो. या पक्षाचे विदर्भातील मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी तसे सूतोवाचही केले आहे. काटोलची जागा आजवर भाजपच लढत राहिला आहे. २०१४ मध्ये या पक्षाने ही जागा जिंकल्याने त्यांचा या जागेवरचा दावा नैसर्गिक स्वरूपाचा आहे. मात्र अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस या जागेवर दावा करण्याची शक्यता आहे. त्याच्याकडे या मतदारसंघात देशमुख यांना टक्कर देणारा तुल्यबळ उमेदवार नाही. मात्र तरीही ही जागा अजित पवार यांच्या गटासाठी सोडण्याचा निर्णय महायुतीने घेतला तर भाजप आपला उमेदवार अजित पवार यांच्या गटाकडून लढवण्याची शक्यता आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mahayuti not get candidate against anil deshmukh from katol assembly constituency print politics news zws
Show comments