महानगरपालिकांचे सर्व निकाल रात्री उशिरा जाहीर झाल्यावर पुढील सत्तेची गणिते जमविण्यास शनिवारपासून सुरुवात झाली. २९ पैकी २३ महानगरपालिकांमध्ये महायुतीचे महापौर संख्याबळानुसार निवडून येऊ शकतात. सहा महानगरपालिकांमध्ये विरोधकांना सत्तेची संधी असली तरी त्यापैकी दोन महापालिकांमध्ये घोडेबाजार होण्याची चिन्हे आहेत.

राज्यातील २९ पैकी २३ महानगरपालिकांमध्ये भाजपप्रणित महायुतीला बहुतम अथवा अधिक संख्याबळ मिळाले आहे. यामुळे या महानगरपालिकांमध्ये काही गडबड होण्याची शक्यता नाही. मुंबईत भाजपचे ८९ तर शिंदे गटाचे २९ असे ११८ संख्याबळ होते. म्हणजेत साध्या बहुमतापेक्षा अधिक संख्याबळ आहे. तरीही भाजपकडून अन्य काही नगरसेवकांची मते मिळविण्याचा प्रयत्न होऊ शकतो. एमआयएमने तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला तरी तो महायुतीलाच फायदेशीर ठरू शकतो. सांगलीमध्ये भाजपला बरोबर निम्म्या जागा मिळाल्या आहेत. अजित पवार गटाचे १६ तर शिंदे गटाचे दोन नगरसेवक आहेत. तेथे १८ नगरसेवक निवडून आलेल्या काँग्रेसने गणित जुळविण्याची चाचपणी सुरू केली आहे. पण ते कठीण दिसते. अकोल्यात बहुतमसाठी दोन जागा कमी असल्या तरी भाजप संख्याबळ जमवू शकेल.

लातूरमध्ये काँग्रेसला बहुमत मिळाले. त्यामुळे तेथे महापौरपदाचा मार्ग मोकळा आहे. वसई – विरारमध्ये हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीला बहुमत मिळाले आहे. परभणीमध्ये ६५ सदस्यीय पालिकेत शिवसेना ठाकरे गटाचे २५ तर काँग्रेसचे १२ जण निवडून आले आहेत. भाजपचे १२ तर अजित पवार गटाचे ११ जण निवडून आले असले तरी ३३चे संख्याबळ जमविणे भाजपसाठी आव्हानात्मक असेल.

चंद्रपूर, भिवंडीमध्ये चुरस

खरी चुरस ही चंद्रपूर आणि भिवंडीमध्ये आहे. चंद्रपूरमध्ये ६६ सदस्यीय पालिकेत काँग्रेसचे सर्वाधिक २७ तर भाजपचे २३ जण निवडून आले आहेत. महापौरपदासाठी ३४ मतांची आवश्यकता आहे. ठाकरे गटाचे सहा तर शरद पवार गटाचा एक अशा रितीने बहुमताचा आकडा गाठण्याची तयारी काँग्रेसने केली आहे. अपक्षांमधील दोन काँग्रेसचे बंडखोर आहेत. चंद्रपूरमध्ये महापौर हा काँग्रेसचाच होईल, असा ठाम विश्वास काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केला.
भिवंडी- निजामपूरा महानगरपालिकेत कोणाची काहीच खात्री देता येत नाही. ९० सदस्यीय महानगरपालिकेत सर्वाधिक ३० नगरेसवक हे काँग्रेसचे निवडून आले आहेत. भाजप २२, शिंदे गट १२, शरद पवार गट १२, इतर १४ जण निवडून आले आहेत. यापूर्वी काँग्रेसचे सर्वाधिक ४० नगरसेवक निवडून येऊनही पक्षात फूट पडून अपक्ष महापौर झाला होता. काँग्रेसने शरद पवार गट व अन्य पक्षांना बरोबर घेऊन ४५ चा आकडा गाठण्यासाठी संपर्क साधण्यास सुरुवात केली आहे. स्थानिक आघाड्यांचे पैशांचे राजकारण येथे अधिक प्रभावी ठरते. यामुळेच कोणत्या पक्षाचा महापौर निवडून येईल याबाबत काहीच स्पष्टता नाही.

महायुतीची सत्ता येणाऱ्या महानररपालिका :

मुंबई, नागपूर, पुणे, ठाणे, नवी मुंबई, उल्हासनगर, कल्याण- डोंबिवली, मीरा-भाईंदर, पनवेल, नाशिक, धुळे, जळगाव , अहिल्यानगर, पिंपरी-चिंचवड, सोलापूर, कोल्हापूर, सांगली- मिरजज-कुपवाडा , छत्रपती संभाजीनगर, नांदेड-वाघाळा, अमरावती, अकोला, इचलकरंजी, जालना

विरोधकांचे संख्याबळ अधिक असलेल्या महानगरपालिका :

लातूर, वसई-विरार, चंद्रपूर, मालेगाव, परभणी, भिवंडी-निजामपूर