ठाणे : लोकसभा निवडणुकीत राज्यातील वेगवेगळ्या प्रांतात पराभव सहन कराव्या लागलेल्या सत्ताधारी महायुतीला कोकण प्रातांने मात्र विजयाचा हात दिला. या निकालांचे महायुतीच्या गोटात अजूनही सविस्तर विश्लेषण केले जात असून ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यांतील विधानसभेच्या ३९ जागा या आगामी निवडणुकीत महायुतीच्या बाजूने निर्णायक ठरू शकतील, असा दावा भाजप नेत्यांच्या ठाण्यातील अंतर्गत बैठकीत करण्यात आला. ठाणे, पालघर जिल्हा तसेच संपूर्ण कोकण पदवीधर मतदारसंघातील पक्षाचे नेते, पदाधिकाऱ्यांची एक विशेष बैठक नुकतीच ठाण्यातील विभागीय कार्यालयात घेण्यात आली होती. या बैठकीत सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, कोकण पदवीधर मतदारसंघाचे निवनिर्वाचित आमदार निरंजन डावखरे, पक्षाचे नेते गणेश नाईक तसेच इतर प्रमुख पदाधिकारी, नेते उपस्थित होते. या बैठकीत ठाणे, पालघरातील विधानसभेच्या २४ जागांचा आढावा घेण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामुळे ठाणे जिल्ह्यातील प्रशासकीय आणि राजकीय वर्तुळात त्यांच्या पक्षाचा दबदबा जाणवत असला तरी जिल्ह्यातील भाजप आमदार असलेली एकही जागा मित्रपक्षासाठी सोडली जाणार नाही, अशी स्पष्टोक्ती यावेळी चव्हाण यांनी केली. ठाणे शहर, नवी मुंबईतील ऐरोली-बेलापूर या दोन विधानसभा मतदारसंघांपैकी एक, मिरा-भाईंदर तसेच कल्याण पूर्व या मतदारसंघावर शिंदे गटाने आतापासूनच दावा करण्यास सुरुवात केली आहे. असे असले तरी यापैकी एकही जागा शिंदे गटाला सोडली जाणार नाही, असा दावा चव्हाण यांनी यावेळी केला. हेही वाचा >>> VIDEO : ठाण्यातील महिलेने केलं पाकिस्तानात जाऊन लग्न; भारतात परतल्यावर म्हणाली, “फेसबुकवर…” महायुतीची ताकद कोकण प्रांतात भिवंडीचा अपवाद वगळला तर सहापैकी पाच लोकसभा मतदारसंघात महायुतीला यश मिळाले आहे. भिवंडीच्या जागेवरील पराभव हा अनपेक्षित होता. असे असले तरी या मतदारसंघातील मुरबाड आणि भिवंडी ग्रामीण विधानसभा क्षेत्रात भाजपला चांगली मते मिळाली आहेत. ठाणे आणि कल्याण लोकसभा मतदारसंघात १२ पैकी ११ विधानसभा क्षेत्रात महायुतीच्या उमेदवारांना मोठी आघाडी मिळाली आहे. रायगड जिल्ह्यातील पेण, अलिबाग, श्रीवर्धन, पनवेल येथेही महायुतीला मोठी आघाडी आहे. उरण आणि कर्जत मतदारसंघात महाविकास आघाडीला मताधिक्य मिळाले असले ती विधानसभा निवडणुकीत हे चित्र बदलू शकते. पालघर जिल्ह्यात डहाणूचा अपवाद वगळला तर पाच विधानसभा क्षेत्रात भाजपला मोठी आघाडी मिळाली आहे. कोकणात नारायण राणे यांचा विजय महायुतीसाठी दिलासादायक आहे. त्यामुळे या संपूर्ण पट्ट्यातील ३९ विधानसभा क्षेत्रात महायुतीला निर्णायक विजय मिळू शकतो असा निष्कर्ष ठाण्यातील या बैठकीत काढण्यात आला. ठाणे आणि कल्याण लोकसभा मतदारसंघात अनेक विधानसभा क्षेत्रात महाविकास आघाडीकडे उमेदवारही नाहीत ही चर्चाही झाल्याचे समजते. ‘ठाण्यात मित्रपक्षाच्या मदतीची अपेक्षा बाळगू नका’ संपूर्ण बैठकीत ठाणे विधानसभा मतदारसंघावर शिंदेसेनेचे नेते दावा सांगत असल्याच्या तक्रारी सातत्याने पुढे आल्या. चर्चेदरम्यान हा मतदारसंघ काहीही झाले तरी शिंदेसेनेला सोडण्याचा प्रश्नच येत नसल्याने निर्धास्त रहा असे चव्हाण यांनी उपस्थितांना सांगितले. ठाणे विधानसभा क्षेत्रात पाच वर्षांपूर्वी युती असतानाही मित्र पक्षाकडून संजय केळकर यांना पुरेशी मदत मिळाली नव्हती हे सर्वांना ज्ञात आहेच. त्यामुळे मित्र पक्षांच्या मदतीवर अवलंबून न रहाता स्वबळावर विजयाचा प्रयत्न करा, अशी सूचनाही बैठकीत देण्यात आल्याचे समजते.