Dispute in Mahayuti: विधानसभा निवडणुकीला अवघे दोन महिने उरले असताना महायुतीमध्ये श्रेयवादावरून धुसफूस असल्याचे समोर आले आहे. २८ जून रोजी राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर करत असताना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी पुरवणी मागण्याद्वारे निधीची तरतूद केली. राज्यातील २१ ते ६५ वयोगटात मोडणाऱ्या आर्थिक दुर्बल घटकातील महिलांना प्रति महिना १,५०० रुपये देण्याची तरतूद या माध्यमातून करण्यात आली. या योजनेसाठी अडीच कोटी महिला लाभार्थी ठरू शकतात असा अंदाज असून त्यासाठी दरवर्षी ४६ हजार कोटी रुपयांचा भार सरकारच्या तिजोरीवर पडणार आहे.
अजित पवार यांनी अर्थसंकल्पात निधीची तरतूद करताच २४ तासांच्या आतच मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची जाहिरात करणारे फलक लावले गेले. या फलकांवर फक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोटो दिसला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अर्थमंत्री अजित पवार यांचा फलकावर उल्लेखही नव्हता. ही जाहिरताबाजी उस्फुर्त होती की, ठरवून केलेल्या धोरणाचा भाग होती, हे अद्याप कळू शकले नाही. मात्र या जाहिरातीमुळे भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाराजीची लाट पसरली. फक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच पुढे करणे, इतर दोन्ही पक्षांना मान्य नव्हते.
मंत्रिमंडळ बैठकीत जाहिरातीवरून खटके
वरील घटनेच्या बरोबर दोन महिन्यानंतर पुन्हा एकदा या योजनेवरून वाद उफाळला. अजित पवार गटाने सोशल मीडियावर आणि जनसन्मान यात्रेमधून लाडकी बहिण योजनेचा प्रचार करण्यावर भर दिला आहे. यावेळी त्यांनीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोटो छापणे टाळले. तसेच जाहिरातीमध्ये फक्त ‘माझी लाडकी बहीण योजना’ असा उल्लेख करत मुख्यमंत्री शब्द टाळला. याचे पडसाद ५ सप्टेंबर रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत पाहायला मिळाले. शिंदे गटाच्या मंत्र्यांनी जाहिरातीवर आक्षेप घेतल्यानंतर मुख्यमंत्र्यांसमोरच शाब्दिक खटके उडाले. अखेर मुख्यमंत्री शिंदे यांनी हस्तक्षेप करत वाद शमवला आणि सरकारी योजनांची जाहिरात करत असताना त्यात साम्य ठेवावे, असे आवाहन केले.
चोराच्या उलट्या बोंबा – राष्ट्रवादीच्या मंत्र्याचा पलटवार
द इंडियन एक्सप्रेसला प्रतिक्रिया देत असताना नाव न उघड करण्याच्या अटीवर अजित पवार गटाच्या एका ज्येष्ठ मंत्र्यांने मंत्रिमंडळात झालेल्या वादाबाबत सांगितले की, हा प्रकार म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा असा आहे. शिवसेनेनेच पहिल्यांदा योजना स्वतःच्या नावावर खपविण्याचा प्रयत्न केला. मुख्यमंत्र्यांनीच योजनेची संकल्पना मांडली, नियोजन केले आणि अंमलबजावणी केली, हे सांगण्याचा सर्वतोपरी प्रयत्न शिंदे गटाने केला. अगदी सुरुवातीला फक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेच फोटो वापरून योजनेची जाहिरात केली गेली. आता आम्ही अजित पवारांचा फोटो वापरल्यामुळे ते नाराज झाले आहेत.
हे ही वाचा >> Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेमुळे अन्य योजना बंद? स्वयंस्पष्ट आदेशामुळे चर्चा; मुख्यमंत्री शिंदे म्हणाले…
महिला केंद्रीत योजनेचे श्रेय घेण्यावरून तीनही पक्षातील चढाओढ आता लपून राहिलेली नाही. नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीमधील तीनही पक्ष जोरदार तयारी करत असून या योजनेच्या माध्यमातून आपापल्या पक्षाचे मतदारसंघातील मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जात आहे. या योजनेचा आधार घेऊन तीनही पक्ष जाहीर सभा आणि यात्रा काढत आहे.
राष्ट्रवादीने अर्थमंत्री अजित पवारांना पुढे केले
अर्थमंत्री अजित पवार यांनी प्रस्तावाला मान्यता दिल्यामुळे या योजनेचे श्रेय अजित पवार यांचेच आहे, असे दाखविण्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रयत्न आहे. तसेच योजनेशी साधर्म्य दाखविण्यासाठी अजित पवारांनी ऑगस्ट महिन्यात पक्षाच्या जनसन्मान यात्रेमध्ये गुलाबी जॅकेट परिधान करण्यास सुरुवात केली आहे. तर लाडकी बहीण योजनेच्या नावातून मुख्यमंत्री शब्द वगळण्यात आला आहे. जनसन्मान यात्रेत फलक, बॅनरवर फक्त लाडकी बहीण योजना एवढाच उल्लेख केला जात आहे.
भाजपाकडूनही राष्ट्रवादीसारखाच प्रयत्न केला गेला आहे. पक्षाकडून घेतलेल्या काही जाहीर सभेत फक्त लाडकी बहीण योजना एवढाच उल्लेख केला गेला. तर देवेंद्र फडणवीस यांचा “देवा भाऊ” असा उल्लेख असलेले पोस्टर लावत लाडक्या बहिणींचा देवा भाऊ अशी जाहिरात करण्यात आली. देवेंद्र फडणवीस यांचा फोटो असलेले आणि देवा भाऊ असे शीर्षक असलेले अनेक बॅनर राज्यभर लागले आहेत. अजित पवार यांच्या बारामतीमध्येही हे बॅनर लावण्यात आले आहेत.
एका वृत्तवाहिनीवर मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांना याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. यावर ते म्हणाले की, मला आधीपासूनच लोक देवेंद्र भाऊ अशी हाक मारत आहेत. तर काही लोक आपुलकीने देवा भाऊ असेही म्हणतात. तसेच मंत्रिमंडळ बैठकीत योजनेच्या श्रेयवादावरून कोणताही वाद झाला नाही. फक्त योजनेची जाहिरात कशी करायची यावर चर्चा झाली, असेही ते म्हणाले.
लोकसभा निकालामुळे अजित पवारांबद्दल नाराजी?
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महायुतीला मोठा फटका बसला. तीनही पक्षांन केवळ १७ जागा जिंकता आल्या. तर महाविकास आघाडीमधील तीन पक्षांनी ३० जागा जिंकल्या. तसेच एका अपक्षाने काँग्रेसला पाठिंबा दिला. भाजपाला नऊ जागा आणि २६.१८ ट्क्के मते, शिवसेना शिंदे गटाला सात जागा आणि १२.९५ टक्के मतदान तसेच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला फक्त एक जागा आणि ३.६ टक्के मतदान मिळू शकले. अजित पवारांना महायुतीत घेऊन कोणताही फायदा झालेला नाही, असे भाजपाच्या काही नेत्यांचे म्हणणे आहे. भाजपाच्या एका वरिष्ठ नेत्याने म्हटले की, अजित पवारांना बरोबर घेतल्याने राष्ट्रवादीची मते तर आमच्याकडे वळली नाहीच आणि शरद पवारांना राजकीयदृष्ट्या संपविण्याचा उद्देशही अपूर्णच राहिला.
आता विधानसभेलाही महाविकास आघाडीकडून महायुतीला तगडे आव्हान मिळण्याची शक्यता आहे. लोकसभेप्रमाणेच यावेळीही जागावाटपाचा मुद्दा तापू शकतो.
© IE Online Media Services (P) Ltd