Mahua Moitra on Saayoni Ghosh: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर तृणमूल काँग्रेसला गळती लागली आहे. लोकसभेतील २० खासदार आणि विधानसभेच्या ६० आमदारांनी बंडखोरी केली आहे. ममता बॅनर्जी यांच्या कट्टर समर्थक असलेल्या ३३ वर्षीय लोकसभा खासदार सायोनी घोष यांनीही बंडखोरी केल्याचे समोर आले आहे. सायोनी घोष यांच्या सारख्या विश्वासूंनी बंडखोरी केल्याने तीव्र दु:ख झाल्याचे तृणमूल काँग्रेसच्या नेत्या व खासदार महुआ मोईत्रा यांनी म्हटले आहे. मोईत्रा यांनी बंडखोरांवर तीव्र शब्दांत टीका केली. तसेच पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांचे त्यांनी कौतुकही केले. ‘द इंडियन एक्स्प्रेस’ला दिलेल्या मुलाखतीत महुआ मोईत्रा काय म्हणाल्या? सविस्तर जाणून घेऊयात.
“भाजपाला विधेयकासाठी आणखी ४०-५० खासदारांची आवश्यकता”
पराभवानंतर तृणमूल काँग्रेसमध्ये बंडखोरांची संख्या वाढतच आहे. पक्षावर अशी परिस्थिती का उद्भवली? असा प्रश्न विचारला असता महुआ मोईत्रा म्हणाल्या, एक कारण म्हणजे लोभ आणि विश्वासघात करण्याला कोणतीही सीमा नाही. आणि दुसरे म्हणजे भाजपाचे लोकसभा मतदारसंघांची पुनर्रचना करण्याचे पडलेले विधेयक. एप्रिल महिन्यात लोकसभेच्या जागा वाढवण्यासाठी आणण्यात आलेले भाजपाचे घटना दुरूस्ती विधेयक लोकसभेत दोन-तृतियांश मतदान न मिळाल्याने पडले. त्यानंतर लोकसभेत आणखी ४०-५० खासदारांचे समर्थन आवश्यक असल्याचे भाजपाला जाणवले. त्यामुळे कोणत्याही मार्गाने ४०-५० खासदार जोडण्यासाठी भाजपाने प्रयत्न सुरू केले. निवडणुका लढवून हा खासदार मिळवता येणार नाहीत, हे त्यांना माहिती आहे. त्यामुळे त्यांनी पक्षांची जोड-तोड सुरू केली आहे. तृणमूल काँग्रेसला विधानसभा निवडणुकीत २.६ कोटी मते मिळाली, तर भाजपाला २.९ कोटी मते मिळाली. फक्त ३० लाख मतांचा फरक आहे. एसआयआरशी संबंधित ३० लाख प्रकरणे प्रलंबित आहेत. लोक तृणमूल काँग्रेसवर नाराज असल्याचे असत्य त्यांनी पसरवले.
तृणमूल काँग्रेसचे भवितव्य काय आहे?
तृणमूल काँग्रेसचे भवितव्यावर बोलताना महुआ मोईत्रा म्हणाल्या, गुणवत्ता आणि मेहनतीला महत्व आहे, पण निष्ठा सर्वात महत्वाची आहे. काही गोष्टींनी मी खरंच दु:खी झाले आहे. सायोनी मला मुलीसारखी आहे, बहिणीसारखी आहे. जर दुसरं कोणी सोडून गेलं असतं तर मला दु:ख झालं नसतं. पण, माझ्या मुलीप्रमाणे मी तिच्याकडे पाहत होते. मी तिच्यावर तसं प्रेमही केलं. तिचं भविष्य खूप उज्ज्वल असेल असा मला विश्वास आहे. ती खूप कष्टाळू आहे. तिच्यात गुणवत्ता आहे. ती लोकांमध्ये मिसळते. ती दयाळू आहे. विरोधकांचे नेतृत्व करताना मी तिला पाहिले आहे. तिचे वय फक्त ३३ आहे. सायोनी सारखी माणसं जेव्हा बदलतात तेव्हा तुम्ही विश्वास कोणावर ठेवावा? तिच्यासारख्यांना मी एवढंच सांगेन की, मला माहिती आहे तुम्ही घाबरले आहात. परंतु, त्या भीतीवर मात करून तुम्हाला पुढे यावे लागेल. भीती घालवली नाही, तर आपण काहीच मिळवू शकणार नाही.
कदाचित तिने भीती किंवा इतर काही गोष्टींमुळे अशी भूमिका घेतली असेल. तिला पैशांचा मोह नाही. तिचं आयुष्य खूप साधं आणि सरळ आहे. पक्षाने तिला मागच्या पाच वर्षांत काय काय दिलं ते तुम्ही पाहा. २०२१ मध्ये तिने पक्षात प्रवेश केला. तिला आमदारकीचे तिकिट दिले, तसेच पक्षाच्या युवा संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष केले. २०२४ मध्ये तिला ममता बॅनर्जी यांनी स्वत:चा जादवपूर हा बालेकिल्ला दिला. असे लोक जेव्हा सोडून जातात त्यावेळी अत्यंत तीव्र वेदना होतात. प्रत्येकाला स्वत:ची ध्येय आहेत. पण, मी तिला सांगेल की भीतीवर मात कर. पुढे अजून आयुष्य भरपूर बाकी आहे.
महुआ मोईत्रांनी सुवेंदू अधिकारींचे कौतुक का केले?
तृणमूल काँग्रेसच्या ६० आमदारांनी बंडखोरी केल्याबद्दल बोलताना महुआ मोईत्रा म्हणाल्या, जर ६० आमदारांना ममता दी आणि अभिषेक बॅनर्जी यांची अडचण होती तर त्यांनी सुवेंदू अधिकारींनी जे केले ते करायला हवे होते. आपण पक्षात दुसऱ्या क्रमांकाचे नेते बनू शकत नाही हे लक्षात आल्यावर सुवेंदू अधिकारी यांनी तृणमूल काँग्रेसचा राजीनामा देऊन भाजपामध्ये प्रवेश केला होता. २०२१ मध्ये त्यांनी ममता दिदींचा पराभव केला. त्यानंतर पुढील पाच वर्ष संघर्ष केला. आता ते मुख्यमंत्री आहेत. तुम्ही त्यांच्यावर प्रेम करा अथवा त्यांचा द्वेष करा, पण, त्यांनी जे केले त्यात काहीही चुकीचे नव्हते. दरम्यान, तृणमूल काँग्रेस काँग्रेसमध्ये विलीन होणार का? असे विचारले असता मोईत्रा म्हणाल्या, काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेस २०२९ ची निवडणूक एकत्रित लढतील. सध्यातरी आम्हाला एवढंच माहिती आहे.
महुआ मोईत्रांची पुढील भूमिका काय?
तृणमूल काँग्रेस पक्षात बंडखोरी वाढत असताना तुमची येत्या काळातील भूमिका काय असेल असे विचारले असता मोईत्रा म्हणाल्या, कोणताही पक्ष हा परफेक्ट नसतो. माझा पक्षही नाही. पण, फॅसिस्ट विचारसरणीला विरोध करण्यासाठी माझ्यासाठी तृणमूल काँग्रेसमध्ये राहणे हाच उत्तम पर्याय आहे. मार्गात कितीही अडथळे आले तरी त्यांच्याशी संघर्ष करू, पण मी तृणमूल काँग्रेसमध्येच राहणार असे महुआ मोईत्रा म्हणाल्या.
