तृणमूल काँग्रेसच्या (टीएमसी) खासदार महुआ मोईत्रा दुसऱ्यांदा विवाहबंधनात अडकल्या आहेत. त्यांनी बिजू जनता दलाचे (बीजेडी) ज्येष्ठ नेते आणि पुरीमधून चार वेळा खासदार राहिलेल्या पिनाकी मिश्रा यांच्याशी जर्मनीत विवाह केल्याचे वृत्त आहे. हा विवाह ३ मे रोजी पार पडला, परंतु दोन्ही नेत्यांनी याबाबत अधिकृत माहिती दिली नाही. पक्षातील काही सूत्रांनीही याबद्दल कुठलीही माहिती नसल्याचा दावा केला आहे, असे वृत्त ‘टेलिग्राफ इंडिया’ने दिले आहे.

जर्मनीमध्ये गुपचूप झालेल्या लग्नाच्या वृत्ताने अनेकांना आश्चर्यात टाकले आहे. अगदी तृणमूल काँग्रेसच्या सदस्यांनीही याची माहिती नसल्याचे सांगितले आहे. जर्मनीहून ‘टेलिग्राफ इंडिया’ने घेतलेल्या फोटोंमध्ये मोइत्रा सोन्याच्या दागिन्यांमध्ये आणि हसताना पाहायला मिळत आहेत. या फोटोमुळे या वृत्ताला दुजोरा मिळाला आहे. या दोन्ही नेत्यांनी किंवा त्यांच्या संबंधित पक्षांनी याबाबत कोणतेही अधिकृत विधान केलेले नाही. तसेच, या जोडप्याने सार्वजनिकरित्या या वृत्ताला दुजोरा किंवा नकारही दिलेला नाही. त्यांचे पती पिनाकी मिश्रा नक्की कोण आहेत? जाणून घेऊयात.

महुआ मोईत्रा यांच्या जर्मनीमध्ये गुपचूप झालेल्या लग्नाच्या वृत्ताने अनेकांना आश्चर्यात टाकले आहे. (छायाचित्र-इंडियन एक्सप्रेस)

महुआ मोईत्रा यांची संसदेत केलेल्या भाषणांची कायम चर्चा असते. त्या भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सातत्याने टीका करताना दिसतात. महुआ मोईत्रा या पश्चिम बंगालमधील कृष्णानगर येथून दोन वेळा लोकसभेच्या खासदार आहेत. महुआ मोईत्रा यांचा लोकसभेचा पहिला कार्यकाळ वादात होता. त्यांच्यावर एका उद्योगपतीच्या सांगण्यावरून उद्योगपती गौतम अदानी यांच्याबाबत प्रश्न उपस्थित केल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यानंतर त्यांची खासदारकी रद्द करण्यात आली होती. मात्र त्या निवडणुकीत पुन्हा निवडून आल्या.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कोण आहेत पती पिनाकी मिश्रा?

  • महुआ मोईत्रा यांचे पती पिनाकी मिश्रा हेदेखील बीजेडीचे ज्येष्ठ नेते आहेत.
  • पिनाकी मिश्रा यांचा जन्म १९५९ मध्ये झाला. त्यांनी १९९६ मध्ये तत्कालीन केंद्रीय मंत्री ब्रज किशोर त्रिपाठी यांचा पराभव करून आपल्या संसदीय प्रवासाची सुरुवात केली.
  • पिनाकी मिश्रा हे सर्वोच्च न्यायालयातील वरिष्ठ वकीलदेखील आहेत.
  • मिश्रा यांची जवळजवळ तीन दशकांची राजकीय आणि कायदेशीर कारकीर्द आहे.
  • त्यांनी पुरी येथून बीजेडीचे प्रतिनिधित्व केले आहे.
  • मिश्रा हे वित्तविषयक स्थायी समिती आणि व्यवसाय सल्लागार समितीसह अनेक उच्च-प्रोफाइल समित्यांचे सदस्य म्हणूनही काम करतात.
  • ते त्यांच्या कायदेशीर अंतर्दृष्टी आणि लोकसभेत शांत व प्रेरक शैलीतील भाषणांसाठी ओळखले जातात.

महुआ मोइत्रा यांचे पूर्वीचे नाते

महुआ मोइत्रा या त्यांच्या राजकीय करकीर्दीमुळेच नव्हे तर वैयक्तिक आयुष्यामुळेदेखील चर्चेत असतात. त्यांचे हे दुसरे लग्न आहे. त्यांचे लग्न पूर्वी डॅनिश फायनान्सर लार्स ब्रॉर्सन यांच्याशी झाले होते. वकील जय अनंत देहदराय यांच्याशी असणारे त्यांचे संबंधदेखील चर्चेचा विषय ठरले होते. लार्स ब्रॉर्सन यांच्याशी त्यांचे लग्न फार काळ टिकले नाही आणि त्यांनी घटस्फोट घेतला.