दयानंद लिपारे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कोल्हापुरातून बड्या नेत्यांचा प्रतिसाद मिळाल्याने गलितगात्र झालेल्या शिवसेनेत उत्साहाची बीजे पेरण्याचे काम युवा नेते आदित्य ठाकरे यांच्या जिल्हा दौऱ्यांने साध्य झाले. तरुणाईचा उत्साहवर्धक प्रतिसाद होता. बंडखोरांना चिंता वाटायला लागेल अशी वातावरण निर्मिती झाली  असली तरी हेच वारे निवडणुकीपर्यंत टिकवण्याचे आव्हान शिवसेनेने समोर असेल.

एकनाथ शिंदे यांनी बंडाचा झेंडा घेतल्यावर शिवसेनेत उभी फूट पडली. शिवसेनेतील खासदार, आमदार मोठ्या संख्येने शिंदे यांच्यासोबत राहिले. याचा मोठा परिणाम म्हणून कोल्हापूर जिल्ह्यातील दोन्ही खासदार, माजी राज्यमंत्री, आमदार, माजी आमदार हे शिंदे यांच्या छावणीत दाखल झाल्याने बालेकिल्ला बनत चाललेल्या या जिल्ह्याला मोठे भगदाड पडले.

शिवसेनेला अनुकूल असलेल्या आजरा तालुक्यात ठाकरे यांनी जिल्ह्यातील पहिली सभा घेतल्याने स्वाभाविकच तरुणाई त्यांच्या भोवती उत्स्फूर्तपणे जमली.  साडेपाचशे कोटी रुपयांचा मोठा निधी देणे ही ठाकरे यांची चूक झाली का, असा प्रश्न उपस्थितीत करत आदित्य यांनी आमदार प्रकाश आबिटकर यांनी असे का केले, अशी विचारणा केली. जिल्ह्यात खासदार, आमदार फुटलेले असताना केवळ दोन दिवसांच्या दौऱ्यात ठाकरे यांनी केवळ आबिटकर यांचाच नामोल्लेख केला. इतर ठिकाणी सूचक विधान करीत फुटीरांवर शरसंधान केले. कोल्हापूर व जयसिंगपूर येथील भर पावसात झालेल्या सभेला लक्षणीय साथ मिळाली. हा प्रतिसाद बंडखोरांना चिंता वाटायला लावेल अशा स्वरूपाचा होता. यातून या दौऱ्यातून जिल्ह्यातील निस्तेज शिवसेनेत प्रेरणा देण्याचे काम ठाकरे यांनी केले.

तथापि ही ऊर्जा कायमपणे टिकवणे हे सेनेच्या अस्तित्वाच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरणार आहे. पक्षाची भीस्त जिल्हाप्रमुख आणि शहरात नवनियुक्त पदाधिकारी यांच्यावर आहे. या जिल्हाप्रमुखांचा लोकसभा, विधानसभा, महापालिका या निवडणुकीत सपाटून पराभव झाला आहे. त्यांच्या प्रतिमेवरही प्रश्नचिन्ह लावले जाते. अशा स्थितीत लोकसभेच्या दोन्ही जागा आणि शिवसेनेला अपेक्षित पूर्वीप्रमाणे सहा मतदार संघात भगवा फडकवण्यासाठी सक्षम उमेदवार शोधण्याचे कठीण आव्हान आहे. आपल्याच कोशात मग्न असणारे जिल्हाप्रमुख हे लोकसभेचे उमेदवार म्हणजे भलते साहस ठरण्याचा धोकाही आहे. खेरीज, माजी आमदारही निवडणुकीच्या रिंगणात उतरणार का हाही प्रश्न आहे. चंद्रदीप नरके यांनी ठाकरे यांच्या दौऱ्याकडे पाठ फिरवली. तर डॉ. सुजित मिणचेकर हे उपचारापुरते दिसले. सत्यजित पाटील व उल्हास पाटील यांना पर्याय नसल्याने शिवसेने सोबतच राहावे लागणार असून तुल्यबळ प्रतिस्पर्ध्यांचे आव्हान पेलणे सोपे असणार नाही.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही राज्याचा दौरा सुरू केला आहे. आदित्य ठाकरे यांच्या पाठोपाठ तेही कोल्हापुरात येणार असल्याचे येणार आहेत. एका अराजकीय दौऱ्याच्या निमित्ताने शिंदे कोल्हापुरात आले होते तेव्हा मिणचेकर, नरके हे माजी आमदार त्यांच्यासोबत दिसल्याने शंकेची पाल चुकचुकत आहे. शिवसेनेतून शिंदे यांना मिळणाऱ्या प्रतिसादाचे हे पुढचे पाऊल ठरले होते. शिंदे दौऱ्यावर येतील तेव्हा ‘ गद्दार ‘ असा उल्लेख केला गेल्याने डिवचले गेलेले जिल्ह्यातील शिंदे समर्थक लोकप्रतिनिधी मतदारसंघात जोरदार शक्ती प्रदर्शन करून शिवसेनेला तोडीस तोड उत्तर देण्याच्या तयारीत आहेत.त्यामुळे आता शिवसेनेत दिसू लागलेली ऊर्जा शिंदे दौऱ्यानंतर टिकून राहणार का, सेनेतील माजी आमदार पदाधिकारी हे ठाकरे यांच्या सोबतच राहणार का हाही प्रश्न आहे. ठाकरे यांच्या दौऱ्यानंतरही शिवसेनेची कोल्हापूर जिल्ह्यातील वाटचाल काटेरी असल्याचे दिसत आहे.