आजच्या महत्वाच्या राजकीय घडामोडी : उद्योगमंत्री उदय सामंत मोठ्या गटासह भाजपात प्रवेश करणार असल्याचा दावा संजय राऊत यांनी केल्यानंतर शिंदेंच्या शिवसेनेत मोठी फूट पडणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली… मंत्री गिरीश महाजन यांच्याविरोधात ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करा, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केली… एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांच्या ‘महाराष्ट्र हिरवा करू’ या विधानाचा केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी चांगलाच समाचार घेतला… जालन्यातील वाढत्या गु्न्हेगारीला केवळ गुन्हेगारच जबाबदार असल्याचे विधान जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी केले… कोल्हापूरच्या महापौरपदावरून भाजपा व शिंदे गटात संघर्ष पेटला असून दोन्ही पक्षांच्या बॅनरबाजीने अनेकांचे लक्ष वेधून घेतले. या सर्व घडामोडी सविस्तर जाणून घेऊ…

शिंदेंच्या शिवसेनेत लवकरच मोठी फूट?

उद्योगमंत्री उदय सामंत मोठ्या गटासह भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याचा दावा शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला. त्यांच्या या दाव्यामुळे शिंदेंच्या शिवसेनेत लवकरच मोठी फूट पडणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली. संजय राऊत यांनी आज मुंबईत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी मंत्री उदय सामंत यांनी केलेल्या एका दाव्याविषयी पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारला. ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांना शिंदेसेनेत आणण्याची प्रक्रिया सुरू झाल्याचा दावा सामंत यांनी केला होता. त्यावर राऊत यांनी खळबळजनक प्रतिक्रिया दिली. अंबादास दानवे हे कडवड शिवसैनिक असून गेल्या अनेक वर्षांपासून ते एकाच पक्षात आहेत. त्यामुळे सामंत यांनी केलेल्या दाव्याला काहीच अर्थ नाहीत. उलट सामंत हेच आपल्या पक्षातील मोठ्या गटासह भाजपात चालले आहेत. दावोसमध्ये काय चर्चा झाली हे तुम्हाला माहिती आहे का? असा प्रश्न राऊत यांनी उपस्थित केला. त्यांच्या या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

भाजपाच्या मंत्र्यावर अ‍ॅट्रॉसिटीची मागणी

भाजपाचे तथा राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी नाशिक येथील प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमातील भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेणे टाळल्याने राज्यात नवीन वादाला सुरुवात झाली. आंबेडकरी चळवळीतील संघटना व कार्यकर्त्यांकडून महाजन यांचा निषेध व्यक्त केला. या वादानंतर गिरीश महाजन यांनी आपली भूमिका मांडून दिलगिरी व्यक्त केली. माझ्याकडून अनवधानाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव राहिले असेल तर त्याबाबत दिलगिरी व्यक्त करतो, असे गिरीश महाजन म्हणाले. यादरम्यान वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनीही या वादात उडी घेतली. मंत्री गिरीश महाजन यांच्याविरोधात ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करा, अशी मागणी त्यांनी केली आहे. जर ही चूक अनावधानाने झाली असेल, तर महाजन यांचे मंत्रीपदही अनावधानाने काढून टाकण्यात यावे. ही काही छोटी-मोठी चूक नाही, असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.

आणखी वाचा : नामोनिशाण मिटवून टाकू; गणेश नाईक आणि शिंदे गटात वाद कशामुळे पेटला?

केंद्रीय मंत्र्यांचा जलील यांना इशारा

महापालिका निवडणुकांचा निकाल लागताच राज्यात भगवा विरुद्ध हिरवा असा राजकीय वाद पेटला. या वादात एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी आणखीनच तेल ओतण्याचे काम केले. ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा येथील एमआयएमच्या नगरसेविका सहर शेख यांनी निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर संपूर्ण मु्ंब्रा हिरवा करण्याची भाषा केली होती. याप्रकरणी पोलिसांनी नोटीस बजावल्यानंतर त्यांनी माफीही मागितली. यादरम्यान इम्तियाज जलील यांनी सहर शेख यांची पाठराखण करण्यासाठी जाहीर पत्रकार परिषद घेऊन संपूर्ण महाराष्ट्र हिरवा करणार असल्याचे विधान केले. त्यांच्या या विधानाचा केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी चांगलाच समाचार घेतला. महाराष्ट्र कुणीही हिरवा करू शकत नाही, असे विधान करणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर दिले जाईल, असा इशारा मोहोळ यांनी दिला आहे.

वाढत्या गुन्हेगारीबाबत पंकजा मुंडे काय म्हणाल्या?

जालन्यातील वाढत्या गु्न्हेगारीला केवळ गुन्हेगारच जबाबदार असल्याचे विधान जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी केले. त्यांच्या या विधानावर समाजमाध्यमावर समिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. अनेकांनी मुंडे यांच्या विधानाचे समर्थक केले आहे, तर काहींनी त्याला गृह खात्याचे अपयश झाकण्याचा प्रयत्न असल्याचे म्हटले आहे. जालना जिल्ह्यात दोन दिवसांत दोन खून झाले. पोलिसांकडून गावठी कट्टे जप्त केली जातात; पण मुळापासून कारवाई होताना दिसत नाही, असा प्रश्न माध्यमांनी पंकजा मुंडे यांना विचारला. त्यावर उत्तर देताना वाढत्या गु्न्हेगारीला केवळ गुन्हेगारच जबाबदार असल्याचे विधान मुंडे यांनी केले. गुन्हेगारी होत असेल तर त्यास आणखी कोण जबाबदार असणार? पत्रकारांनी प्रश्न विचारले पाहिजेत. परंतु आपण ज्या भागातील आहोत त्या भागाची अनावश्यक बदनामी होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. केवळ प्रश्न विचारणे आणि सनसनी निर्माण करणे हा विषय नसावा, असेही पंकजा यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा : छगन भुजबळ कायद्याच्या कचाट्यातून कसे सुटले? त्यांच्यावरील आरोप काय होते?

महापौरपदासाठी भाजपा-शिंदेसेनेत रस्सीखेच

कोल्हापूर महापालिकेतील महापौरपदावरून भारतीय जनता पक्ष व शिंदे गटात संघर्ष पेटला आहे. दोन्ही पक्षांच्या वतीने शहरात करण्यात आलेल्या बॅनरबाजीने अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे. नुकत्याच पार पडलेल्या महापालिका निवडणुकीत शहरात महायुतीचा भगवा फडकला आहे. यादरम्यान पहिला महापौर कोणाचा यावरून सर्वाधिक जागा जिंकणारा भाजपा आणि पहिल्यांदाच दुहेरी आकडा गाठणाऱ्या शिवसेनेमध्ये संघर्ष रंगला आहे. महापौर शिवसेनेचाच, अशी फलकबाजी शहरभर केल्याने या वादात आणखीनच भर पडली आहे. दुसरीकडे- भाजपानेही बॅनरबाजी करून महापौरपदासाठी आपला दावा कायम ठेवला आहे. कोल्हापूर महापालिकेवर भगवा फडकावा, हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न होते, असा दावा करून शिंदे गटाचे आमदार राजेश क्षीरसागर यांनी पहिला महापौर शिवसेनेचाच, अशी आरोळी ठोकली आहे. त्यासाठी शहरभर पहिला महापौर शिवसेनेचा अशी फलकबाजी केली आहे. यातून भाजपाला आणि काँग्रेसलाही डिवचण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.