राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा जम्मू काश्मीरमध्ये आहे. बनिहाल या ठिकाणी राहुल गांधी यांच्या सुरक्षेत चूक झालेली पाहण्यास मिळाली. त्यानंतर आता काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहिलं आहे. राहुल गांधी यांची सुरक्षा वाढवण्याची मागणी मल्लिकार्जुन खरगे यांनी केली आहे. येत्या काही दिवसांमध्ये लोक मोठ्या संख्येने भारत जोडो यात्रेत सहभागी होऊ शकतात. अशात सुरक्षेच्या नियमांमध्ये काही हेळसांड होऊ नये म्हणून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी स्वतः लक्ष घालावं असं मल्लिकार्जुन खरगे यांनी म्हटलं आहे.

जम्मूसारखीच घटना पंजाबमध्ये

राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेदरम्यान जम्मूमध्ये जशी चूक झाली तशीच पंजाबमध्येही झाली होती. एका माणसाने थेट येऊन राहुल गांधी यांना मिठी मारली. त्यावेळी तुमच्या सुरक्षेत काही कमतरता राहिली आहे का? त्यामुळे असं घडलं का? असं राहुल गांधी यांना विचारलं असता त्यांनी ही सुरक्षा पुरवणाऱ्यांची चूक नव्हती. त्या माणसाला वाटलं तो येऊन भेटला असंही राहुल गांधी यांनी म्हटलं होतं. आता मल्लिकार्जुन खरगे यांनी राहुल गांधी यांच्या सुरक्षेच्या विषयात गृहमंत्री अमित शाह यांनी स्वतः लक्ष घालावं अशी मागणी केली आहे. त्यावर अमित शाह काय उत्तर देणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

मल्लिकार्जुन खरगे यांनी काय म्हटलं आहे पत्रात?

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना लिहिलेल्या पत्रात खरगे म्हणतात की भारत जोडो यात्रा लोकांसाठी आकर्षण ठरते आहे. भारत जोडो यात्रा ज्या ठिकाणी जाईल तिथे मोठ्या संख्येने लोक त्यात सहभागी होत आहेत. या यात्रेत सहभागी झालेल्या आणि होणाऱ्या सगळ्याच लोकांच्या दृष्टीने सुरक्षा हा महत्त्वाचा मुद्दा आहे. त्याचप्रमाणे राहुल गांधी यांचीही सुरक्षा महत्त्वाची आहे. येत्या दोन दिवसांमध्ये या यात्रेत आणखी गर्दी होऊ शकते. तसंच ३० जानेवारीला श्रीनगरमध्ये जो समारंभ होणार आहे त्यातही मोठ्या प्रमाणावर लोक सहभागी होतील यात शंकाच नाही. त्यामुळे या दृष्टीने सुरक्षा पुरवावी. तसंच या गोष्टीत अमित शाह यांनी जातीने लक्ष द्यावं अशीही मागणी मल्लिकार्जुन खरगे यांनी केली आहे.

राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा ११ राज्यांमधून गेली आहे. कन्याकुमारी ते काश्मीर असं या यात्रेचं स्वरूप आहे. ही यात्रा ज्या ज्या ठिकाणी गेली तिथे यात्रेला चांगला प्रतिसाद मिळाला. जम्मूमध्ये जेव्हा ही यात्रा पोहचली तेव्हा शिवसेना खासदार संजय राऊतही राहुल गांधी यांच्यासोबत या यात्रेत सहभागी झाले होते. आता या यात्रेत ३० जानेवारीला जम्मूमध्ये तिरंगा फडकवला जाणार आहे. अशावेळी सुरक्षा व्यवस्था चांगली असावी आणि कुठलीही चूक त्यात होऊ नये अशी मागणी मल्लिकार्जुन खरगे यांनी केली आहे.