पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेस पक्षात पराभवनंतर फूट पडल्याचे समोर आले. ६० आमदारांनी बंड करत ममता बॅनर्जी यांच्या निर्णयाला विरोध केला. आमदारांमध्ये फूट पडल्यानंतर लोकसभेत खासदारांमध्येही फूट पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर ममता बॅनर्जी यांनी तृणमूल काँग्रेस पक्षात फेरबदल केले आहेत. शुक्रवारी (५ जून) ममता बॅनर्जी यांनी कोलकातामधील कालिघाट येथील निवासस्थानी बैठक घेतली. तृणमूल काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणी समितीच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.

अभिषेक बॅनर्जींबाबत पक्षाने काय निर्णय घेतला?

पक्षातील निष्ठावान व जुन्या नेत्यांवर महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली. ममता बॅनर्जी यांचे भाचे अभिषेक बॅनर्जी यांच्याविरोधात पक्ष नेत्यांमध्ये रोष आहे. अभिषेक यांच्यावर नेत्यांनी टीका केली आहे. तृणमूल काँग्रेसच्या राष्ट्रीय सरचिटणीस पदावर अभिषेक कायम असतील, परंतु, त्याचबरोबर डेरेक ओब्रायन व डोला सेन या दोन ज्येष्ठ नेत्यांची राष्ट्रीय सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. यापुढे हे दोन नेते अभिषेक बॅनर्जी यांना निर्णय घेण्यात मदत करतील, असे तृणमूल काँग्रेसकडून बंडखोर आमदारांना सांगण्यात आले. अभिषेक बॅनर्जी हे स्वत:च्या मनाने पक्षाचे निर्णय घेणार नाहीत, असा संदेश ममतांनी दिला आहे.

दोन दिवसांपूर्वी तृणमूल काँग्रेसच्या आमदारांमध्ये फूट पडली. नव्याने निवडून आलेल्या ८० पैकी ६० आमदारांनी ममता बॅनर्जी व अभिषेक बॅनर्जी यांच्या निर्णयाला धुडकावून लावले. ममता बॅनर्जी यांनी विरोधी पक्षनेते पदासाठी सुचवलेल्या नावाला विरोध करत आमदारांनी पक्षातून हकालपट्टी झालेल्या ऋतब्रता बॅनर्जी यांना विरोधी पक्षनेते केले. त्यामुळे तृणमूल काँग्रेसमधील फूट जाहीरपणे समोर आली. त्यानंतर काही मिनिटांतच टीएमसीच्या नेतृत्वाने पक्षातील सर्व समित्या, संघटना विसर्जित केल्या. एक निवेदन जारी करत पक्ष नेत्यांच्या कामगिरीचा आढावा, संघटनात्मक अभ्यास केला जाईल, असे सांगण्यात आले.

तृणमूल काँग्रेसमध्ये फेरबदल

तृणमूल काँग्रेसने पश्चिम बंगालमध्ये अंतर्गत फेरबदल केले आहेत. त्यानुसार पश्चिम बंगाल टीएमसीचे प्रदेशाध्यक्ष सुब्रत बक्षी यांना पदावरून हटवण्यात आले. त्यांच्या जागी माजी मंत्री व ममता बॅनर्जी यांच्या कट्टर समर्थक असलेल्या चंद्रिमा भट्टाचार्य यांची प्रदेशाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली. बक्षी यांची पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच, साजिदा अहमद, ममता ठाकूर, नयना बंडोपाध्याय आणि स्वाती खांडेकर यांची प्रदेश उपाध्यक्षपदी, तर अरुप बिस्वास, राजीव बॅनर्जी, बाबर अली, पुलक रॉय आणि अशिमा पात्रा यांची प्रदेश सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य पातळीवर कार्यकारी सदस्यांमध्ये ज्योतिप्रिय मल्लिक, राणा चॅटर्जी, बिदेश बोस, त्रिणांकुर भट्टाचार्य, जया दत्ता, तापस चॅटर्जी, वसुंधरा गोस्वामी आणि गौतम देब यांचा समावेश असेल.

आघाडीच्या संघटनांमध्ये अभिनेत्री ते खासदार बनलेल्या सायोनी घोष यांना तृणमूल युवा काँग्रेसच्या अध्यक्षपदी कायम ठेवण्यात आले आहे, तर माला रॉय यांची पक्षाच्या महिला आघाडीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. टीएमसी (TMC) सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या यादीत नंतर आणखी नावांचा समावेश केला जाईल.

२० खासदार भारतीय जनता पार्टीच्या संपर्कात?

तृणमूल काँग्रेसचे राज्यसभा खासदार सुखेन्दू शेखर रॉय यांच्या एका विधानानंतर दुसऱ्याच दिवशी पक्षात फेरबदलाची घोषणा करण्यात आली. पक्ष वरिष्ठ सभागृहात (राज्यसभेत) कदाचित सुरक्षित असू शकतो, परंतु लोकसभेबाबत असे म्हणता येणार नाही, असे रॉय म्हणाले होते. “निवडून आल्यानंतर इतक्या कमी कालावधीत जवळपास ६० आमदारांनी पक्ष सोडल्याचे मी कधीही पाहिले नव्हते. मी सांगू इच्छितो की, अशीच प्रतिक्रिया लोकसभेतही उमटण्याची शक्यता आहे”, असा इशारा रॉय यांनी दिला होता. तृणमूल काँग्रेसचे एक वरिष्ठ खासदार ‘द इंडियन एक्स्प्रेस’ला म्हणाले, “संसदीय पक्षात फूट पडण्यासाठी आता फक्त थोडाच अवधी शिल्लक राहिला आहे. तृणमूल काँग्रेसचे २० खासदार भारतीय जनता पार्टीच्या संपर्कात असल्याचे आम्ही आधीच ऐकले आहे. हा आकडा आणखी वाढेल.”

ममता बॅनर्जींच्या आंदोलनात फक्त ८ आमदार अन् ६ खासदार

ममता बॅनर्जी यांनी मंगळवारी (२ जून) केलेल्या आंदोलनात तृणमूल काँग्रेसच्या ८० आमदारांपैकी फक्त ८ आमदार, तर ४१ खासदारांपैकी फक्त ६ खासदार उपस्थित होते. तसेच विरोधी पक्षनेते पदासाठी ममता बॅनर्जी यांनी सुचवलेल्या नावाला ६० आमदारांनी जाहीरपणे विरोध केला. त्यामुळे तृणमूल काँग्रेस पक्षात पडलेली फूट उघडपणे जाहीर झाली आहे. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस पक्षाचा भाजपाने पराभव केला. त्यानंतर तृणमूल काँग्रेसमधील मतभेद उघड झाले आहेत. तृणमूल काँग्रेसचा पराभव झाल्यानंतर एक महिन्याच्या आतच पक्षाची अवस्था बिकट झाली आहे. ममता बॅनर्जी यांच्या बाजूने फारच थोडे आमदार, खासदार राहिले आहेत. त्यांपैकी अनेक नेते हे पक्षातील जुने नेते आहेत. तसेच पक्षाशी एकनिष्ठ आहेत.

लोकसभेचे खासदारही फुटणार?

ममता बॅनर्जी यांचे निकटवर्तीय असलेले तृणमूल काँग्रेसचे लोकसभेतील वरिष्ठ खासदार म्हणाले, बंडखोरांच्या कृतीने फक्त अभिषेक बॅनर्जी यांच्या विरोधातील रोष दिसून आला नाही, तर ममता बॅनर्जी यांच्या विरोधातही आमदार गेल्याचे दिसून आले. “आमदार ममता बॅनर्जींच्या नियंत्रणात नाहीत, हे घडलेल्या घडामोडींवरून दिसून आले”, असे टीएमसीचे खासदार म्हणाले. दरम्यान, बंडखोर आमदारांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. आमदारांप्रमाणेच टीएमसीचे लोकसभेतील खासदारही फुटू शकतात. “बारासातच्या खासदार काकोली घोष दस्तीदार यांनीही पक्षातील सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. तसेच टीएमसीच्या नेतृत्वावर टीका करत त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे”, असे तृणमूल काँग्रेसच्या खासदाराने सांगितले.