Mamata Banerjee Allegations BJP : पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीत दारुण पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मंगळवारी (५ मे) जाहीर पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली. या पत्रकार परिषदेतून त्यांनी भारतीय जनता पार्टीसह निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले. मतमोजणी केंद्रावर तैनात असलेल्या केंद्रीय सुरक्षा दलाच्या जवानांनी आपल्यासह तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना मारहाण केल्याचा दावा ममता यांनी केला. आम्ही ही निवडणूक हरलो नसून आम्हाला जाणीवपूर्वक हरवण्यात आले आहे, अशी टीकाही त्यांनी केली, त्याविषयी…

बिहारपाठोपाठ पश्चिम बंगाल आणि आसाम विधानसभा निवडणुकीत ऐतिहासिक कामगिरी करीत भाजपाने आपल्या विजयाचा सिलसिला कायम ठेवला. एकेकाळी तृणमूल काँग्रेसचा अभेद्य मानल्या जाणाऱ्या बंगालमध्ये भाजपाने २९४ पैकी तब्बल २०० हून अधिक जागांवर दणदणीत विजय मिळवला. गेल्या १५ वर्षांपासून पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस पक्षाची एकहाती सत्ता होती. यंदा मात्र भाजपाच्या विजयी लाटेत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील अनेक दिग्गज मंत्र्यांना दारुण पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवानंतर ममता यांनी कोलकात्यात जाहीर पत्रकार परिषद घेऊन भाजपासह राज्य निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले.

नेमक्या काय म्हणाल्या ममता बॅनर्जी?

पश्चिम बंगालमधील निवडणूक निकाल हे जनमताचे प्रत्यंतर नसून, ते निवडणूक आयोगाने भाजपाच्या साथीने रचलेले षड्यंत्र असल्याचा आरोप ममतांनी केला. हा संघर्ष रस्त्यावर नेणार असून, विरोधकांची ‘इंडिया’ आघाडी बळकट करण्याचा निर्धार त्यांनी पत्रकार परिषदेतून व्यक्त केला. ‘इंडिया’ आघाडीतील पक्षांच्या नेत्यांनीही ममतांच्या आरोपांना पाठिंबा दिल्याने नवा राजकीय संघर्ष निर्माण झाला आहे. एकीकडे भाजपाने विधानसभेच्या २०७ जागा जिंकून राज्यात सत्तास्थापनेची तयारी भाजपने सुरू केली आहे, तर दुसरीकडे ममता बॅनर्जी यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा न देण्याचा पवित्रा घेतला. ‘तृणमूल काँग्रेसने केवळ भाजपाविरोधात नव्हे तर, निवडणूक आयोगाविरोधात निवडणूक लढवली. आम्ही लोकमताद्वारे पराभूत झाले नसल्याने माझ्या राजीनाम्याचा प्रश्नच येत नाही असे ममता म्हणाल्या. मतमोजणीदरम्यान मोठ्या प्रमाणात अनियमितता झाली, तृणमूलच्या १०० जागा हडप करण्यात आल्या, कार्यकर्त्यांचे मनोधैर्य खच्ची करण्यासाठी मतमोजणी संथगतीने करण्यात आली, असेही आरोप ममतांनी केले. यादरम्यान निवडणूक आयुक्तांचा उल्लेख त्यांनी खलनायक असा केला.

मला त्यांनी लाथ मारली, ममता बॅनर्जी यांचा आरोप

बंगालच्या भवानीपूर मतदारसंघातून ममता बॅनर्जी यांना पराभवाचा सामना करावा लागला. भाजपाचे उमेदवार सुवेंदू अधिकारी यांनी १५ हजारांहून अधिक मताधिक्यांनी त्यांचा पराभव केला. त्यानंतर एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना ममता यांनी राज्यात तैनात असलेल्या केंद्रीय सशस्त्र दलावर गंभीर आरोप केला. त्या म्हणाल्या की, मतमोजणीच्या १६ व्या फेरीपर्यंत त्या भाजपाच्या सुवेंदू अधिकारी यांच्या विरोधात आघाडीवर होत्या आणि केवळ काही फेऱ्या शिल्लक होत्या. मात्र, निवडणूक प्रक्रियेत काही गुंडांनी हस्तक्षेप करण्यासाठी मतमोजणी केंद्रात प्रवेश केला. याची माहिती मिळाल्यानंतर मी मतमोजणी केंद्रात पोहोचले. तिथे तैनात असलेल्या सुरक्षा दलाच्या जवानांनी मला मारहाण केली आणि लाथ मारून बाहेर हाकलून लावले. ज्या मतमोजणी केंद्रावर ही घटना घडली, तेथील सीसीटीव्ही कॅमेरे बंद करण्यात आले होते. एक महिला म्हणून मला याचा तिरस्कार वाटतो. आमच्या बूथ अधिकाऱ्यालाही मारहाण झाली. त्याबाबत तक्रार केल्यानंतरही काहीच कारवाई झाली नाही, असा दावा ममता यांनी केला.

ममता यांचे आरोप निवडणूक आयोगाने फेटाळले

ममता बॅनर्जी यांनी केलेले मारहाणीचे आरोप पश्चिम बंगालचे मुख्य निवडणूक अधिकारी मनोज कुमार अग्रवाल यांनी फेटाळून लावले. मतमोजणीदरम्यान केंद्रावर असा कोणताही प्रकार घडला नसल्याचे स्पष्ट केले. याबाबत आपण संबंधित जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांशी चर्चा केली असून मतमोजणी केंद्रावर कोणत्याही प्रकारच्या हल्ल्याची नोंद झाली नाही, तसेच या प्रकरणात कोणतीही अधिकृत तक्रार किंवा एफआयआर दाखल झालेली नसल्याचेही त्यांनी नमूद केले. असा कोणताही प्रकार घडला असता, तर तक्रार किंवा एफआयआर दाखल झाली असती. तसे काहीही झालेले नाही,” असे अग्रवाल यांनी सांगत ममता बॅनर्जी यांच्या आरोपांचे खंडन केले.

ममता यांच्या आरोपांवर भाजपाची प्रतिक्रिया काय?

ममता बॅनर्जी यांच्या आरोपानंतर भाजपाचे प्रवक्ते देबजीत सरकार यांनी जाहीर पत्रकार परिषद घेतली. तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ज्या प्रकारच्या गोष्टी बोलत आहेत, त्यातून त्या स्वतःचेच हास्य करून घेत आहे. पराभवानंतर त्यांना काही दिवस प्रकाशझोतात राहायचे असल्याने त्या अशा गोष्टी बोलत आहेत. भारतीय जनता पार्टी किंवा संविधानावर विश्वास ठेवणारा कोणताही पक्ष अशा प्रकारच्या हास्यास्पद वक्तव्यांना उत्तर देऊ शकत नाही, असे सरकार यांनी स्पष्ट केले. पश्चिम बंगालसह दिल्लीतील भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनीही ममता यांच्या आरोपांवर प्रतिक्रिया देणे टाळले आहे. यादरम्यान ममता बॅनर्जी यांनी मुख्यमंत्रिपद सोडण्यास नकार दिल्यामुळे हा वाद आणखीनच चिघळण्याची शक्यता आहे. पश्चिम बंगालमध्ये घडणाऱ्या या राजकीय घडामोडींकडे सध्या सगळ्या देशाचे लक्ष लागून आहे.