West Bengal Election Result 2026 Counting Update : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आपल्या पक्षातील कार्यकर्त्यांना ईव्हीएम स्ट्राँग रूमवर करडी नजर ठेवण्याचे आवाहन केल्यानंतर गुरुवारी रात्री कोलकात्यात मोठा राजकीय ड्रामा पाहायला मिळाला. मतमोजणीआधीच ईव्हीएममध्ये फेरफार झाल्याच्या आरोप करीत तृणमूल काँग्रेसचे उमेदवार कुणाल घोष आणि शशी पंजा यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी नेताजी इनडोअर स्टेडियमजवळील खुदीराम अनुशीलन केंद्राबाहेर धरणे आंदोलन केले. या घटनेची माहिती मिळताच भाजपाचे उमेदवारही घटनास्थळी पोहोचले, त्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. खुद्द ममता बॅनर्जी भवानीपूर मतदारसंघातील ईव्हीएम ठेवण्यात आलेल्या शाळेबाहेर मध्यरात्रीपर्यंत तळ ठोकून होत्या. यादरम्यान परिसरात तृणमूल काँग्रेस आणि भाजपाच्या कार्यकर्त्यांची मोठी गर्दी जमली होती. परिस्थिती तणावपूर्ण असल्याने परिसरात मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
पश्चिम बंगालमध्ये कोणाचे सरकार?
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या आणि अंतिम टप्प्यातील मतदान बुधवारी पार पडल्यानंतर अनेकांनी निकालाबाबत कयास बांधण्यास सुरुवात केली आहे. ७ पैकी ५ मतदानोत्तर चाचण्यांनी भाजपा बहुमताचा जादूई आकडा पार करण्याची शक्यता वर्तवली असली, तरी दोन चाचण्यांनी मात्र सत्ताधारी तृणमूल काँग्रेसलाच पूर्ण बहुमत मिळण्याचे भाकीत केले आहे. त्यामुळे पश्चिम बंगालमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी सलग चौथ्यांदा सत्ता स्थापन करणार की, भाजपाच्या परिवर्तनाच्या हाकेला जनता प्रतिसाद देणार, याबाबत कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे. यादरम्यान मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आपल्या पक्षातील कार्यकर्त्यांना ईव्हीएम स्ट्राँग रूमवर पाळत ठेवण्याचे आवाहन केले आहे. भाजपाकडून मतमोजणीआधी ईव्हीएमची फेरफार केली जाऊ शकते, असा त्यांना संशय आहे.
ममता बॅनर्जी काय म्हणाल्या?
स्ट्राँग रूमच्या बाहेर तळ ठोकून बसलेल्या ममता बॅनर्जी यांनी गुरुवारी मध्यरात्री माध्यमांशी संवाद साधला. “तृणमूल काँग्रेसच्या उमेदवारांना आणि निवडणूक प्रतिनिधींना योग्य सुविधा देण्याची विनंती आम्ही केली आहे. आमचे ईव्हीएम या केंद्रात ठेवण्यात आल्याने मी येथे जवळपास चार तासांपासून थांबून आहे. नेताजी इनडोअर स्टेडियमजवळील स्ट्राँग रूममध्ये ठेवण्यात आलेले ईव्हीएम उघडले जात असल्याची खात्रीशीर माहिती आम्हाला मिळाली होती. त्यामुळेच मी स्वत:पडताळणी करण्यासाठी येथे आले आहे. सुरुवातीला आम्हाला केंद्राबाहेरच रोखण्यात आले; परंतु त्यानंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी मला आत जाण्याची परवानगी दिली. लोकशाही व्यवस्थेत आम्ही अजिबात मतचोरी होऊ देणार नाही. मी हजारो लोकांना येथे आणू शकले असते, पण तसे केले नाही”, असे ममता यांनी स्पष्ट केले.
तृणमूल काँग्रेसचा आरोप काय?
राज्यात दुसऱ्या आणि अंतिम टप्प्यातील मतदान पार पडल्यानंतर सर्व ईव्हीएम मशीन स्ट्राँग रूममध्ये सीलबंद ठेवण्यात आल्या असून, सोमवारी (४ मे) त्या मतमोजणी केंद्रावर नेण्यात येणार आहेत. तृणमूल काँग्रेसने आपल्या अधिकृत एक्स अकाउंटवरून शेअर केलेल्या एका निवेदनात भाजपावर निवडणूक आयोगाशी संगनमत करून मतपेट्या आणि ईव्हीएममध्ये फेरफार केल्याचा आरोप केला आहे. पक्षाने या घटनेचे वर्णन दिवसाढवळ्या झालेली लोकशाहीची हत्या, असे केले आहे. राजकीय पक्षांच्या अधिकृत प्रतिनिधींच्या अनुपस्थितीत मतपेट्या उघडल्या जात असल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत असल्याचा दावाही पक्षाने केला आहे. दुसरीकडे, निवडणूक आयोगासह भाजपाच्या नेत्यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. कोलकाता येथील ईव्हीएम स्ट्राँग रूमबाहेर मध्यरात्री गुरुवारी मध्यरात्री झालेल्या राजकीय गदारोळानंतर राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी मनोज अग्रवाल यांनी माध्यमांशी संवाद साधला.
निवडणूक आयोगाने फेटाळले आरोप
“निवडणूक आयोगाच्या नियमांनुसारच सर्व प्रक्रिया पार पडली आहे. तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांनी केलेले सर्व आरोप निराधार आहेत, तरीही आम्ही याबाबतचा सविस्तर अहवाल मागवला आहे. कोणत्याही कायदेशीर प्रक्रियेचे उल्लंघन झाल्यास कडक कारवाई केली जाईल,” असे अग्रवाल यांनी स्पष्ट केले. उत्तर कोलकात्याच्या जिल्हा निवडणूक अधिकारी स्मिता पांडे यांनी सांगितले की, मतदानानंतर सर्व ईव्हीएम स्ट्राँग रूममध्ये सुरक्षितपणे सीलबंद ठेवण्यात आले असून त्याचे फुटेज सीसीटीव्ही कॅमेऱ्यात पाहिले जाऊ शकते. खुदीराम अनुशीलन केंद्रामध्ये सात विधानसभा क्षेत्रांतील ईव्हीएम ठेवण्यात आल्या आहेत. त्यातील एका खोलीत पोस्टल मतदान बॅलेटचे बॉक्सही आहेत. त्या पुढे म्हणाल्या की, आम्ही सर्व राजकीय पक्षांना दुपारी ४ वाजेपासून ही प्रक्रिया सुरू करणार असल्याची पूर्वकल्पना दिली होती. त्यामुळे हे आरोप चुकीचे आहेत. तक्रार आल्यानंतर आम्ही आंदोलक उमेदवारांना सोबत घेऊन गेलो आणि निवडणूक आयोगाच्या मानक कार्यप्रणालीनुसार सर्व काम सुरू असल्याचे तसेच स्ट्राँग रूमला कोणताही धक्का लागला नसल्याचे त्यांना दाखवून दिले. या संपूर्ण प्रक्रियेचे व्हिडीओ चित्रण करण्यात आले आहे.
मतमोजणीआधी सुरक्षा अधिकच कडक
राज्यातील मतमोजणी केंद्रांवरील सुरक्षा अधिकच मजबूत करण्यासाठी निवडणूक आयोगाने क्यूआर कोड-आधारित ओळख प्रणाली लागू केली आहे. निवडणूक आयोगाने एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे माहिती दिली की, मतमोजणी केंद्रांवर कोणत्याही अनधिकृत व्यक्तीचा प्रवेश रोखण्यासाठी ‘ECINET’ प्रणालीवर क्यूआर कोड आधारित फोटो ओळखपत्र मॉड्यूल सुरू करण्यात आले आहे. मतमोजणी केंद्रांवर ओळख पडताळणीसाठी तीन-स्तरीय सुरक्षा व्यवस्था लागू करण्यात आली आहे. पहिल्या आणि दुसऱ्या सुरक्षा स्तरावर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी जारी केलेल्या फोटो ओळखपत्रांची प्रत्यक्षात तपासणी केली जाईल. तिसऱ्या आणि सर्वात महत्त्वाच्या सुरक्षा स्तरावर क्यूआर कोड स्कॅनिंगद्वारे पडताळणी झाल्यानंतरच मतमोजणी केंद्रात प्रवेश दिला जाईल. क्यूआर कोड-आधारित फोटो ओळखपत्रे केवळ आयोगाने अधिकृत केलेल्या व्यक्तींनाच लागू असतील. त्यामध्ये निवडणूक निर्णय अधिकारी, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, मतमोजणी कर्मचारी, तांत्रिक कर्मचारी, उमेदवार, निवडणूक प्रतिनिधी आणि मतमोजणी प्रतिनिधी यांचा समावेश असेल, असेही आयोगाने स्पष्ट केले आहे.
