How BJP Defeated Mamata Banerjee in Her Stronghold : सगळ्या देशाचे लक्ष लागून असलेल्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत भाजपाने मोठी मुसंडी मारली. पूर्व भारताचे सत्ताकेंद्र मानल्या जाणाऱ्या या राज्यात भाजपाने २९४ पैकी तब्बल २०० पेक्षा जास्त जिंकून दणदणीत विजय मिळवला, तर गेल्या १५ वर्षांपासून बंगालवर एकहाती वर्चस्व ठेवणाऱ्या तृणमूल काँग्रेसचा या निवडणुकीत दारुण पराभव झाला. विशेष बाब म्हणजे, पक्षाच्या अध्यक्षा व विद्यमान मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनादेखील भवानीपूर विधानसभा मतदारसंघातून पराभवाचा सामना करावा लागला. त्यांच्या पराभवानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दिलेली प्रतिक्रिया सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आहे, त्याविषयी…
भाजपाच्या ‘चक्रव्यूहात’ ममता कशा अडकल्या?
पाच वर्षांपूर्वी पश्चिम बंगालमधील नंदीग्राम विधानसभा मतदारसंघातून भाजपाचे नेते सुवेंदू अधिकारी यांनी ममता बॅनर्जी यांचा पराभव करत सर्वांनाच चकित केले होते. यंदाच्या विधानसभा निवडणुकीतही अधिकारी यांनी पुन्हा तीच किमया साधली आहे. गेल्या काही निवडणुकांमध्ये भाजपाने भवानीपूरमध्ये ममतांच्या विरोधात तुलनेने नवखे उमेदवार दिले होते. मात्र, २०२६ मध्ये ही रणनीती बदलण्यात आली. ज्या सुवेंदू अधिकारी यांनी गेल्या वेळी ममतांना नंदीग्राममध्ये पराभूत केले होते, त्याच अधिकारी यांना पुन्हा एकदा त्यांच्याविरोधात निवडणुकीच्या मैदानात उतरवण्यात आले. विशेष म्हणजे, यावेळी ममता बॅनर्जी यांचा पराभव हा नंदीग्राममध्ये नव्हे तर त्यांचा गड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भवानीपूर मतदारसंघात झाला. सलग १५ मुख्यमंत्रीपदावर असलेल्या ममता यांचा हा पराभव अनेक प्रश्न उपस्थित करणारा ठरत आहे. त्यांच्या पराभवामागील कारणांची राजकीय वर्तुळात मोठी चर्चा होत आहे.
ममता यांची १९,००० मतांची कशी कमी झाली?
सोमवारी झालेल्या मतमोजणीत भवानीपूर मतदारसंघात अनेक राजकीय वळणे पाहायला मिळाली. पोस्टल बॅलेटच्या मोजणीत सुवेंदू अधिकारी यांनी सुरुवातीला आघाडी घेतली होती, पण सातव्या फेरीच्या सुमारास ममता बॅनर्जी यांनी जोरदार मुसंडी मारली. दुपारनंतर तब्बल १९,००० मतांची आघाडी घेतल्याने त्यांचा विजय निश्चित मानला जात होता. मात्र, सायंकाळी साडेसहा वाजेनंतर ममता यांची आघाडी अचानक कमी होऊन केवळ २,९०० मतांवर आली. रात्री ९ वाजेपर्यंत २० पैकी १८ फेऱ्या पूर्ण झाल्यावर सुवेंदू अधिकारी यांनी ११,००० मतांची निर्णायक आघाडी घेतली. सरतेशेवटी, १५,००० मतांच्या फरकाने त्यांनी ममता यांना त्यांच्याच बालेकिल्ल्यात पराभवाची धूळ चारली. सुवेंदू अधिकारी यांना एकूण ७३,९१७ मते, तर ममता बॅनर्जी यांना ५८,८१२ मते मिळाली.
ममता बॅनर्जी यांच्या पराभवाची कारणे कोणती?
ममता बॅनर्जी यांच्या या धक्कादायक पराभवामागे अनेक कारणे असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. आरजी कर वैद्यकीय महाविद्यालयातील बलात्कार आणि हत्या प्रकरणामुळे महिलांच्या सुरक्षेबाबत ममता बॅनर्जी यांच्या प्रतिमेला मोठा तडा गेला होता. त्याशिवाय मतदार याद्यांमधून बोगस आणि दुबार मतदारांचे नावे वगळण्याची प्रक्रिया आणि कडक छाननीचा भारतीय जनता पक्षाला मोठा फायदा झाल्याचे दिसून आले. गेल्या १५ वर्षांच्या राजवटीनंतर राज्यातील वाढता असंतोष आणि भाजपाची आक्रमक रणनीती यामुळे तृणमूल काँग्रेसचा गड उद्ध्वस्त झाला. विशेष म्हणजे, सुवेंदू अधिकारी यांनी यंदा नंदीग्राम आणि भवानीपूर या दोन्ही जागांवर विजय मिळवून बंगालच्या राजकारणात स्वतःला ‘जायंट किलर’ म्हणून सिद्ध केले.
भवानीपूरमध्ये ममतांचा पराभव कशामुळे झाला?
दक्षिण कोलकात्यातील भवानीपूर हा मतदारसंघ त्याच्या संमिश्र लोकसंख्येमुळे ‘मिनी-इंडिया’ म्हणून ओळखला जातो. या मतदारसंघात सुमारे ४२ टक्के बंगाली हिंदू मतदार, तर ३४ टक्के बिगर बंगाली हिंदू मतदार आहेत. त्याशिवाय एक चतुर्थांश मुस्लीम मतदारही येथे निर्णायक भूमिका बजावतात. बिहार, ओडिशा आणि झारखंड येथून आलेले स्थलांतरित भवानीपूरमध्ये राहतात. यंदाच्या निवडणुकीत केवळ गुजराती आणि मारवाडी व्यापारी वर्गासारख्या बिगर-बंगाली हिंदू मतदारांनीच नव्हे तर बंगाली हिंदू मतदारांनी भाजपाला पाठिंबा दिल्याचे सांगितले जाते. त्याशिवाय निवडणुकीपूर्वी मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरावलोकन हे वादग्रस्त ठरले. भवानीपूर मतदारसंघातून ४७,००० ते ५१,००० नावे मतदार यादीतून वगळण्यात आल्याचे सांगितले गेले. त्यात विशेष करून मुस्लीम मतदारांचा मोठा मोठा समावेश होता, जो तृणमूल काँग्रेसचा मुख्य मतदार मानला जातो. या लक्षणीय बदलामुळे सुवेंदू अधिकारी यांच्या बाजूने सकारात्मक वातावरण तयार झाले आणि ममता यांना पराभवाचा धक्का बसल्याचा अंदाज आहे.
ममतांच्या पराभवानंतर अमित शाहांची प्रतिक्रिया
मता बॅनर्जी यांचा भवानीपूर मतदारसंघात पराभव झाल्यानंतर, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या निकालावर आपली पहिली प्रतिक्रिया दिली. भवानीपूरच्या जनतेने दिलेला कौल हा राज्यातील अराजक कारभाराला मिळालेला स्पष्ट नकार आहे, अशा शब्दांत शाह यांनी तृणमूल काँग्रेसवर टीकेची तोफ डागली. “भवानीपूरच्या जनतेला माझा सलाम! त्यांच्या या स्पष्ट कौलाने हे सिद्ध केले आहे की, एका अराजक शासकांचे पुढे नशीब काय असेल,” अशी पोस्ट अमित शाह यांनी आपल्या अधिकृत एक्स अकाउंटवरून केली, तर पश्चिम बंगालमध्ये परिवर्तन झाले असून बंगालच्या जनतेचा आता नवा प्रवास सुरू झाला आहे. हे राज्य आता भयमुक्त झाले असून ते विकासयुक्तही होईल, अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी दिल्लीतील भाजपाच्या मुख्यालयातील भाषणातून दिली. यादरम्यान अमित शाह आणि पंतप्रधान मोदी यांच्या टोकदार प्रतिक्रियेने भाजपा कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह संचारला आहे. आगामी काळात पश्चिम बंगालमधील राजकीय संघर्षाला अधिक धार चढण्याची शक्यता आहे.
