Mamata Banerjee Net Worth West Bengal Assembly Election 2026 : निवडणुका जवळ येताच राजकीय नेत्यांच्या आर्थिक ताकदीची जोरदार चर्चा होऊ लागते. सध्या पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीचा रणसंग्राम सुरू आहे. त्यानिमित्ताने विविध राजकीय पक्षांकडून उमेदवारी मिळविणाऱ्या नेत्यांच्या संपत्तीचा विषय चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची सूत्रे आणि तिजोरीची चावी सध्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याकडे आहे. मात्र, यंदाच्या निवडणुकीतील श्रीमंत उमेदवारांच्या यादीत त्यांचे नाव कुठेही नसल्याचे स्पष्ट झाले आहे. या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालमधील सर्वांत श्रीमंत उमेदवार कोण? अशी चर्चा रंगू लागली आहे. त्याविषयीचा हा आढावा…
ममता बॅनर्जी यांच्याकडे किती संपत्ती?
ममता बॅनर्जी या कोलकाता येथील भवानीपूर मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. हा त्यांचाच पारंपरिक मतदारसंघ असून त्या सध्या विधानसभा सदस्य म्हणून याच मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. ममता यांनी नुकताच आपला उमेदवारी अर्ज दाखल केला असून, त्यासोबत जोडलेल्या प्रतिज्ञापत्राने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. निवडणूक प्रतिज्ञापत्रानुसार, तीन वेळा राज्याचे मुख्यमंत्रिपद भूषवणाऱ्या ममता यांच्याकडे स्वतःच्या मालकीचे घर, गाडी किंवा कोणतीही मोठी स्थावर मालमत्ता नाही. प्रतिज्ञापत्रात नमूद केलेली त्यांची एकूण संपत्ती आणि वार्षिक उत्पन्न हे इतर अनेक कोट्यधीश उमेदवारांच्या तुलनेत अत्यंत कमी आहे. ममता यांनी त्यांच्या एकूण मालमत्तेची किंमत १५.४ लाख रुपये असल्याचे जाहीर केले आहे.
ममता बॅनर्जी यांच्या संपत्तीचा आलेख
ममता बॅनर्जी यांच्या उत्पन्नाचा आलेख पाहिला असता, २०२४-२५ या आर्थिक वर्षात त्यांचे वार्षिक उत्पन्न २३,२१,५७० रुपये होते, जे २०२३-२४ मधील २०,७२,७४० रुपयांच्या तुलनेत काहीसे वाढले. विशेष म्हणजे २०२१-२२ मध्ये ममता यांचे उत्पन्न सर्वोच्च स्तरावर म्हणजे ३८,१४,४१० रुपयांपर्यंत पोहोचले होते. यादरम्यान ममता यांच्या साध्या आर्थिक स्थितीची तुलना सध्या निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या इतर धनदांडग्या उमेदवारांशी केली जात आहे. पहिल्या टप्प्यातील निवडणुकीत तृणमूल काँग्रेसचे जंगीपूर विधानसभा मतदारसंघातील उमेदवार झाकीर हुसेन हे सर्वांत श्रीमंत उमेदवार ठरले आहेत. एकीकडे कोट्यवधींची मालमत्ता, दागिने आणि शस्त्रसाठा असलेले उमेदवार चर्चेत असताना ममता यांचा हा साधेपणा राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे.
आणखी वाचा : मतदारसंघ पुनर्रचनेवरून संसदेत जम्मू-काश्मीरचा दाखला; विरोधकांनी भाजपाला कसे कोंडीत पकडले?
बंगालमधील सर्वांत श्रीमंत उमेदवार कोण?
झाकीर हुसेन हे पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद जिल्ह्यातील जांगीपूर मतदारसंघाचे विद्यमान आमदार आणि तृणमूल काँग्रेसचे नेते आहेत. ते एक यशस्वी उद्योजक असून, त्यांचा विडी निर्मिती, तांदूळ गिरण्या आणि खाद्यतेल असा मोठा व्यवसाय आहे. यापूर्वी त्यांनी पश्चिम बंगाल सरकारमध्ये कामगार राज्यमंत्री म्हणूनही जबाबदारी सांभाळली आहे. हुसेन यांनी आपल्या प्रतिज्ञापत्रात दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्याकडे १३३ कोटी रुपयांहून अधिक मालमत्ता आहे. त्यामध्ये ७४ कोटींची जंगम मालमत्ता आणि ५८.६ कोटी रुपयांच्या स्थावर मालमत्तेचा समावेश आहे. त्याशिवाय हुसेन यांच्याकडे ७४.३८ लाख रुपये, तर त्यांच्या पत्नीकडे ६९.१२ लाख रुपये रोख आहेत.
सोन्याची नाणी आणि महागडी बंदूक
झाकीर हुसेन यांच्या प्रतिज्ञापत्रातील सर्वांत धक्कादायक बाब म्हणजे त्यांच्याकडे कोणतीही स्वतःची गाडी, विमान किंवा नौका नाही; पण इतर मौल्यवान वस्तू आहेत. झाकीर यांच्याकडे तब्बल ६८,७०,५०० रुपये किमतीची एक बंदूक आहे. त्याशिवाय दोन किलो वजनाची सोन्याची नाणी असून, त्याची बाजारपेठ किंमत २८.९१ कोटी रुपये आहे. हुसेन यांनी शेअर बाजारातही कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक केलेली आहे. कोलकाता आणि बासुदेवपूर यांसारख्या मोक्याच्या ठिकाणी हुसेन यांच्या नावावर मोठ्या प्रमाणावर जमीन, निवासी इमारती आणि व्यावसायिक संकुले आहेत. दुसरीकडे दक्षिण २४ परगणा जिल्ह्यातील रायदिघी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणारे भाजपाचे उमेदवार पलाश राणा हे पश्चिम बंगाल निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील सर्वांत श्रीमंत उमेदवार ठरले आहेत.
हेही वाचा : सामूहिक राजीनाम्यांमुळे शिंदे गटात खळबळ; बच्चू कडूंना विधानपरिषदेची ऑफर? वाचा ५ घडामोडी…
कोण आहेत भाजपाचे उमेदवार पलाश राणा?
पलाश राणा हे भाजपाचे सक्रिय नेते असून, दक्षिण २४ परगणा जिल्ह्यातील रायदिघी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवीत आहेत. व्यावसायाने उद्योजक असलेल्या राणा यांची कृषी आणि नेटवर्क सेवा क्षेत्रातील कंपन्यांमध्ये मोठी भागीदारी आहे. ‘मथुराबाद ॲग्रो इंडिया प्रायव्हेट लिमिटेड’मध्ये त्यांचा ९९.८९ टक्के हिस्सा असून, त्याचे मूल्य १६.४६ कोटी रुपये आहे. पलाश राणा यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रानुसार, त्यांच्याकडे १० लाख रुपयांची रोख रक्कम आहे. राणा आणि त्यांच्या पत्नीच्या नावे विविध बँकांमध्ये सुमारे ७० लाख रुपयांच्या मुदत ठेवी आहेत. त्यांच्याकडे पाच महागड्या बोटी आणि दोन आलिशान चारचाकी गाड्याही आहेत. त्याशिवाय राणा यांच्याकडे जवळपास तीन किलो सोन्याचे दागिने असून, त्याची किंमत कोट्यवधींच्या घरात आहे. पलाश राणा यांच्या जंगम मालमत्तेबाबत दोन वेगवेगळ्या आकडेवारी समोर येत आहेत. ‘असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स’च्या अहवालानुसार, त्यांची जंगम मालमत्ता सुमारे २१.५७ कोटी रुपये आहे. मात्र, राणा यांनी आपल्या अधिकृत प्रतिज्ञापत्रात चार कोटी रुपयांची जंगम मालमत्ता जाहीर केली आहे. त्यादरम्यान दुसऱ्या टप्प्यातील मतदानात भाजपाच्या या धनदांडग्या उमेदवाराच्या संपत्तीचा मुद्दा मतदारांवर काय परिणाम करतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
