पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस पक्षाचा पराभव झाला. त्यानंतर तृणमूल काँग्रेसचे पश्चिम बंगालमधील वर्चस्व कमी होताना दिसत आहे. नुकत्याच पार पडलेल्या फालटा विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक निकालातूनही हे दिसून आले. फालटामध्ये भाजपाचा उमेदवार विजयी झाला, तर दुसऱ्या क्रमांकावर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष (माकप), तिसऱ्या क्रमांकावर काँग्रेस व चौथ्या क्रमांकावर तृणमूल काँग्रेसचा उमेदवार होता.
फालटामधील निकालानंतर एक महत्त्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. तो म्हणजे तृणमूल काँग्रेसला पश्चिम बंगालमध्ये पुन्हा एकदा वर्चस्व निर्माण करता येईल का? किंवा तृणमूल काँग्रेसमुळे निर्माण झालेली पोकळी काँग्रेस व माकप भरून काढू शकतात का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. दरम्यान, काँग्रेस व माकप हे दोन पक्ष तृणमूल काँग्रेसमुळे निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यासाठी पुन्हा एकत्र येण्याचीही शक्यता व्यक्त केली जात आहे.
माकप व काँग्रेस आघाडीला फायदा कसा?
२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत पश्चिम बंगालमध्ये काँग्रेस व माकप आघाडीने एकत्र येऊन निवडणूक लढली होती. त्या निवडणुकीत २९४ विधानसभा मतदारसंघांपैकी १२ विधानसभा मतदारसंघांमध्ये काँग्रेस व माकप आघाडीने आघाडी घेतली होती. त्यापैकी काँग्रेसने ११ जागांवर तर माकपने एका जागेवर आघाडी घेतली होती. बहरामपूर लोकसभा मतदारसंघातील बहरामपूर व जांगीपूर लोकसभा मतदारसंघातील सुती या दोन विधानसभा मतदारसंघांमध्ये काँग्रेसच्या उमेदवाराला आघाडी मिळाली होती. तर माकपचा उमेदवार मुर्शिदाबाद लोकसभा मतदारसंघातील राणीपूर विधानसभा मतदारसंघातून आघाडीवर होता. मुर्शिदाबाद लोकसभा मतदारसंघातीलच फराक्का आणि समसेरगंज विधानसभा मतदारसंघांत काँग्रेसच्या उमेदवारांना आघाडी मिळाली होती. याशिवाय मोथाबारी, सुजापूर, रतुआ, मालतीपूर, हरिशचंद्रपूर, मालदा जिल्ह्यातील चंचल आणि उत्तर दिनाजपूर जिल्ह्यातील चाकुलिया या मतदारसंघांमध्ये काँग्रेसच्या उमेदवारांना आघाडी मिळाली होती.
२०२६ च्या विधानसभा निवडणुकीनंतर पश्चिम बंगालच्या राजकारणात एक प्रश्न चर्चेत आला आहे. तो म्हणजे २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस व माकपला किती टक्के मतदान मिळाले होते. दरम्यान, पश्चिम बंगालमधील राजकीय समीकरण देखील बदलेल का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला फक्त दोन तर माकपला फक्त एका जागेवर विजय मिळाला आहे.
तृणमूलची अल्पसंख्याक मतपेढी धोक्यात?
पराभवानंतर काळजी व्यक्त करताना तृणमूल काँग्रेसचे एक वरिष्ठ नेते म्हणाले, “आमचा पक्ष निवडणुकीच्या निकालानंतर ढासळेल याची आम्ही कल्पनाही केली नव्हती. ममता बॅनर्जी व अभिषेक बॅनर्जी हे दोघेही त्यांच्या घरातून बाहेर पडत नाहीत. फालटा विधानसभा निवडणुकीच्या निकालातून आमची मुख्य मतपेढी असलेली अल्पसंख्याक मते काँग्रेस व माकपला मिळाल्याचे स्पष्ट झाले. जर ही परिस्थिती अशीच राहिली तर माकप आणि काँग्रेसला तळागाळातून पाठिंबा मिळेल. विशेषत: अल्पसंख्याक मतपेढी त्यांना मिळेल.”
डाव्या पक्षांना पश्चिम बंगालमध्ये सुगीचे दिवस येणार?
पश्चिम बंगालच्या राजकारणात आपले पुनरूज्जीवन होऊ शकते अशी आशा आता माकपच्या नेत्यांनाही दिसत आहे. माकपच्या पश्चिम बंगाल राज्य कार्यकारिणीतील सदस्याने सांगितले, “या विधानसभा निवडणुकीत आमच्याशी आघाडी न करण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला होता. काँग्रेसला दोन जागा मिळाल्या, तर माकप व त्याचा मित्रपक्ष इंडियन सेक्युलर फ्रंटला (आयएसएफ) प्रत्येकी एक जागा जिंकता आली. जर डावे, काँग्रेस आणि आयएसएफ एकत्र लढले असते तर आम्हाला किमान १५ विधानसभेच्या जागा जिंकता आल्या असत्या. परंतु, दुर्दैवाने तसे घडले नाही. आगामी रेजीनगर आणि नंदिग्राम विधानसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीत आघाडी करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. आम्ही एकत्र आलो तर आम्ही दुसऱ्या क्रमांकाची ताकद असू अशी आम्हाला खात्री आहे.”
माकप नेता पुढे म्हणाला, “फालटामध्ये आम्ही केवळ दुसऱ्या स्थानावरच नव्हतो, तर अल्पसंख्याकांचा प्रभाव असलेल्या ५८ बूथवर आम्ही भाजपाचा पराभव केला. तसेच मतमोजणीवेळी एका फेरीत आम्ही भाजपाच्या पुढे होतो. त्यामुळे नजीकच्या काळात नंदिग्राम व रेजीनगर विधानसभा पोटनिवडणुकीत आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये अल्पसंख्याक व हिंदूंची मते मिळवण्यावर आमचा भर असेल. तसेच तृणमूल काँग्रेसला मागे पाडण्याचे प्रयत्न केले जातील.”
माकपच्या केंद्रीय समितीचे सदस्य सुजान चक्रवर्ती म्हणाले, “तृणमूल काँग्रेसने फालटा मधून पळ काढला. त्यामुळे तृणमूल काँग्रेस भाजपाशी लढण्याऐवजी त्यांचा मार्ग मोकळा करताना दिसत आहे. आम्ही भाजपाच्या बुलडोझर आणि विभाजनाच्या राजकारणाविरोधात लढा देऊ. लोकांना त्यांच्या नोकरी व कामासाठी लढावे लागेल आणि आम्ही त्यांना पाठिंबा देऊ. कारण तृणमूल काँग्रेसने या लढाईतून पळ काढला आहे.”
काँग्रेसची माकपबरोबर जाण्याबाबतची भूमिका काय?
पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस पक्ष ढासळत असताना माकपला संधी दिसत आहेत. त्यावर काँग्रेसचे एक वरिष्ठ नेते म्हणाले, “तृणमूल काँग्रेसचे आता पतन होत आहे आणि आम्हाला त्यांची जागा घ्यावी लागणार आहे, हे सत्य आहे. आम्हाला विशेषत: मालदा आणि मुर्शिदाबादवर लक्ष केंद्रीत करावे लागेल कारण आम्ही तिथे मजबूत स्थितीत आहोत. तृणमूल काँग्रेसमधील जे नेते प्रामाणिक आहेत पण भाजपाच्या राजकारणाला समर्थन देऊ शकत नाहीत, ते आम्हाला येऊन सामील होतील हेही सत्य आहे. या परिस्थितीत आम्ही डाव्यांबरोबर आघाडी करावी की नाही याबाबतचा निर्णय काँग्रेसचे पक्षश्रेष्ठी घेतली.”
पश्चिम बंगाल काँग्रेसचे प्रवक्ते सौम्या ऐच रॉय म्हणाले, “राजकारणात पुढे काय होईल हे कोणीच सांगू शकत नाही. पण, आपल्या देशात भाजपासारख्या जातीयवादी शक्तींविरोधात काँग्रेस व डावे पक्ष सातत्याने लढा देत आहेत. भाजपाविरोधात लढा द्यायचा असेल तर आपल्याला एकत्र येऊन जोरदार प्रतिकार करावा लागेल. अन्यथा आपला लढा कमकुवत होईल. त्याचा फायदा जातीयवादी शक्तींना होईल.”
