Mamata Banerjee TMC Suffered ‘Curse Of House No. 77’ In West Bengal Election 2026 : बिहारपाठोपाठ पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीत ऐतिहासिक कामगिरी करीत भाजपाने आपल्या विजयाची मालिका पुढे चालू ठेवली. एकेकाळी तृणमूल काँग्रेसच्या अभेद्य मानल्या जाणाऱ्या या राज्यात पक्षाने २९४ पैकी तब्बल २०० हून अधिक जागांवर दणदणीत विजय मिळवला. भाजपाच्या या विजयी लाटेत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील अनेक दिग्गज नेत्यांना दारुण पराभवाचा सामना करावा लागला. यादरम्यान तृणमूल काँग्रेसच्या या पराभवाला कोलकात्यातील ‘घर क्रमांक ७७ चा शाप’ लागल्याची चर्चा तेथील राजकीय वर्तुळात रंगली आहे, त्याविषयी…

‘घर क्रमांक ७७’ कुठे आहे? त्याची ऐतिहासिक पार्श्वभूमी काय?

कोलकात्यातील भवानीपूर विधानसभा मतदारसंघातील ‘घर क्रमांक ७७’ हा पत्ता ऐतिहासिकदृष्ट्या अत्यंत महत्वाचा मानला जातो. हे घर डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी आणि त्यांचे वडील ‘बंगालचा वाघ’ म्हणून ओळखले जाणारे आशुतोष मुखर्जी यांचे वडिलोपार्जित निवासस्थान होते. या घराचे बांधकाम १८७३ मध्ये डॉ. गंगा प्रसाद मुखर्जी यांनी केले. त्यानंतर सर आशुतोष, तसेच श्यामा प्रसाद मुखर्जी अनेक वर्षें तेथे वास्तव्यास होते. पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर, रवींद्रनाथ टागोर व डॉ. महेंद्रलाल सरकार यांसारख्या दिग्गज व्यक्तींनीही या घराला भेट दिली होती. सध्या येथे ‘आशुतोष मुखर्जी मेमोरियल इन्स्टिट्यूट’ कार्यरत आहे. या वास्तूत मुखर्जी कुटुंबाचा वारसा, एक विशाल ग्रंथालय आणि त्यांच्या वैयक्तिक वस्तू जतन करून ठेवण्यात आल्या आहेत. कोलकाता महानगरपालिकेने या घराला ‘ग्रेड-१ हेरिटेज प्रॉपर्टी’ म्हणून दर्जा दिला आहे. निवडणुकांच्या काळात हे ठिकाण प्रतीकात्मकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे ठरते.

डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी कोण होते?

नुकत्याच पार पडलेल्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत भाजपाला अभूतपूर्व यश मिळाले. त्यानंतर पक्षातील अनेक नेत्यांनी या ऐतिहासिक निवासस्थानी जाऊन श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या वारशाचे स्मरण केले. भाजपासाठी हे घर केवळ एक स्मारक नसून, त्यांच्या विजयाचा आणि संघर्षाचा वैचारिक केंद्रबिंदू ठरले आहे. डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांनी ऑक्टोबर १९५१ मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पाठिंब्याने भारतीय जनसंघाची स्थापना केली होती आणि पुढे १९८० मध्ये याच पक्षातून माध्यमातून भाजपाचा उदय झाला. भारतीय राष्ट्रवाद, जम्मू-काश्मीरचे एकीकरण आणि पश्चिम बंगालच्या निर्मितीच्या विचारांमध्ये मुखर्जी यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. १९५३ मध्ये जम्मू-काश्मीरला दिलेल्या विशेष दर्जाच्या विरोधात आंदोलन केल्याप्रकरणी त्यांना तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली होती, यादरम्यान शिक्षा भोगत असताना मुखर्जी यांचे तुरुंगातच निधन झाले. भारतीय जनता पक्षाने त्यांच्या निधनाला राष्ट्रीय एकात्मतेसाठी बलिदान म्हणून गौरवले. १९४७ च्या फाळणीदरम्यान बंगालचा महत्त्वाचा भाग हा भारतात राहावा यासाठी श्यामा प्रसाद मुखर्जी यांनी निर्णायक भूमिका बजावल्याचेही मानले जाते.

ऐतिहासिक वास्तू ठरली सत्ता परिवर्तनाचे केंद्र

कोलकात्यातील आशुतोष मुखर्जी रोडवरील घर क्रमांक ७७ हे भारतीय राजकारणातील एक महत्त्वपूर्ण अध्याय मानले जाते. या घराशी डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या वारशाचा संबंध जोडला जातो. काहींच्या मते, बंगालमधील सत्ताधारी पक्षांनी या वारशाकडे दीर्घकाळ दुर्लक्ष केले. यंदाच्या निवडणुकीत भाजपाने मुखर्जी यांच्या वारशाशी निकाल जोडण्याचा प्रयत्न केला आणि त्याला काही मतदारांकडूनही जोरदार प्रतिसाद मिळाला. निवडणुकीच्या प्रचारादरम्यान ममता बॅनर्जी यांच्यासह तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांनी ज्या भाजपाच्या विचारसरणीला ‘बाहेरचे’ असे संबोधले, त्याच वारशाशी संबंधित वास्तूचा त्यांना ‘शाप’ लागला असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. विशेष बाब म्हणजे, ममता बॅनर्जी आणि डॉ. मुखर्जी यांचे निवासस्थान भवानीपूरमध्येच असून, दोन्ही घरांचा क्रमांक ‘७७’ आहे. दोन्ही नेत्यांच्या घरांमधील अंतर कमी असले तरी त्यांच्या विचारसरणीतील दरी मोठी होती, असे मानले जाते.

ममता बॅनर्जी यांना ‘त्याच’ वारशाचा शाप?

डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांचे विचार बंगाली संस्कृतीच्या विरोधात असल्याची टीका ममता बॅनर्जी यांनी अनेकदा केलेली आहे. यादरम्यान तृणमूल काँग्रेसला राज्यातील सत्ता गमावावी लागल्यानंतर कोलकात्यातील जनतेत एक वेगळीच चर्चा सुरू आहे. काहींच्या मते, ममता बॅनर्जी यांना’घर क्रमांक ७७ चा शाप’ लागला आहे, तर ममतांच्या पराभवाचे मुख्य कारण त्यांचा अहंकार असल्याचे म्हटले आहे. ज्या व्यक्तीने बंगालची ओळख घडवली आणि राज्यासाठी बलिदान दिले, त्यांच्यावर टीका करण्याची चूक तृणमूलला महागात पडली, असे सांगितले जात आहे. कोलकात्यातील ‘घर क्रमांक ७७’ चा अदृश्य प्रभाव पश्चिम बंगालच्या राजकारणात एक नवीन दिशा घेऊन आला आहे, जिथे जुन्या वारशाचा सन्मान हेच सत्तेचे नवे गमक मानले जात आहे. दरम्यान, भाजपाने पश्चिम बंगालमध्ये मिळवलेल्या दणदणीत विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी भाजपाच्या दिल्ली मुख्यालयातून कार्यकर्त्यांना संबोधित केले. यावेळी त्यांनी डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या आठवणींना उजाळा दिला. आज श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या आत्म्याला नक्कीच शांती लाभली असेल, असे मोदी यांनी म्हटले आहे.