influential role of Mamata Banerjee and her women-led political force in West Bengal: पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या विधानसभा निवडणुकांना सामोरे जात आहेत. कॉटनची पांढरी शुभ्र साडी आणि पायात चप्पल असे अत्यंत साधे राहणीमान असलेल्या ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालमध्ये विजयी घोडदौड मागील काही वर्षांपासून सुरू ठेवली आहे. महिलांना प्राधान्य देणाऱ्या ‘कन्याश्री प्रकल्प’, ‘लक्ष्मीर भंडार’ आणि ‘स्वास्थ्य साथी’ या योजना त्यांनी सुरू केल्या. पश्चिम बंगालमधील महिलांमध्ये ममता बॅनर्जी यांच्याप्रति विशेष आदरभाव आहे. त्यांना प्रेमाने ‘दीदी’ (मोठी बहिण) आणि ‘मेयेकी’ (लेक) या नावांनीही ओळखले जाते.
ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसमध्ये महिला नेत्यांची एक साखळी तयार झालेली आहे. तृणमूल काँग्रेसच्या आंदोलनांमध्ये महिलांची संख्या मोठी असते. निवडणुकीत जवळपास ४० टक्के तिकिटे महिलांना दिली जातात. कोलकातातील रस्त्यांपासून ते दिल्लीपर्यंत तृणमूल काँग्रेसमधील महिला नेत्या सक्रिय आहेत. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी ह्या त्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या ‘चौथ्या टर्म’साठी निवडणूक लढवत आहेत. भाजपाशी दोन हात करणाऱ्या ममता बॅनर्जी यांच्या पाठीशी कोणत्या रणरागिणी आहेत? ममता बॅनर्जींना रणनीती आखण्यात त्या कशा मदत करतात? सविस्तर जाणून घेऊयात.
चंद्रिमा भट्टाचार्य, ७०
७० वर्षीय चंद्रिमा भट्टाचार्य या पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष व प्रवक्त्या आहेत. तसेच पक्षातील वरिष्ठ नेत्या आहेत. ममतांच्या सरकारमध्ये त्या राज्यमंत्री असून त्यांनी याआधी महत्वाच्या खात्यांच्या मंत्रिपदाचा कार्यभार सांभाळला आहे. त्यात वित्त, आरोग्य, कुटुंब कल्याण, शरणार्थींचे पुनर्वसन या खात्यांचा समावेश आहे.
ममता बॅनर्जी यांनी तृणमूल काँग्रेसची स्थापना केली त्यावेळी भट्टाचार्य काँग्रेसमध्ये होत्या. सिंगूर व नंदिग्राममध्ये ममता बॅनर्जी यांनी २००९ मध्ये आंदोलन करून बंगालमधील माकप (CPI-M) पक्षाला हादरा दिला होता. त्यानंतर ममतांना बंगालच्या राजकारणात उभारी मिळाली. या आंदोलनानंतर भट्टाचार्य ममता बॅनर्जी यांच्या संपर्कात आल्या व त्यांनी तृणमूल काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
दम दम उत्तर मतदारसंघातून भट्टाचार्य या पहिल्यांदा २०११ मध्ये विधानसभेत निवडणूक गेल्या. त्या आधी त्या कोलकाता उच्च न्यायालयात वकिली करत होत्या. २०१६ मध्ये भट्टाचार्य यांचा माकपच्या तन्मय भट्टाचार्य यांनी पराभव केला. परंतु, भट्टाचार्य या ममता बॅनर्जींच्या अत्यंत विश्वासू असल्याने त्यांना २०१७ मध्ये दक्षिण कांथी पोटनिवडणुकीत उतरवण्यात आले. भट्टाचार्य यांचा विजय झाला. ममतांनी त्यांनी तात्काळ राज्यमंत्री पद दिले.
शशी पांजा, ६३
शशी पांजा या व्यवसायाने डॉक्टर होत्या. तसेच त्या माजी केंद्रीय मंत्री अजित पांजा यांच्या स्नुषा आहेत. अजित पांजा यांनी काँग्रेस सोडून ममता बॅनर्जी यांच्याबरोबर तृणमूल काँग्रेसची स्थापना केली होती. २०११ मध्ये ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालमध्ये पहिल्यांदा सरकार स्थापन केले, तेव्हा शशी पांजा यांना मंत्रिपद देण्यात आले नव्हते. त्या श्यामपुकुर मतदारसंघातून आमदार झाल्या होत्या. पण, २०१३ मध्ये ममता बॅनर्जी यांनी शशी पांजा यांना महिला व बाल कल्याण विभागात राज्य मंत्री पद दिले. त्यानंतर ममता बॅनर्जी यांनी सुरू केलेल्या ‘कन्याश्री’ योजनेला पांजा यांनी दिशा दिली. सध्या त्या ममतांच्या सरकारमध्ये उद्योग मंत्री व महिला व बालकल्याण विभागाच्या प्रमुख आहेत. शशी पांजा यांचे बंगाली व इंग्रजी भाषेवर प्रभुत्व आहे. त्यामुळे त्या तृणमूल काँग्रेसच्या महत्वाच्या प्रवक्त्या आहेत. श्यामपुकुर मधून त्या पुन्हा निवडणूक लढवत आहेत.
काकोली घोष दस्तीदार, ६६
पश्चिम बंगाल मधील बारासतच्या खासदार असलेल्या काकोली घोष दस्तीदार यांनी शशी पांजा यांच्याप्रमाणेच डॉक्टरीचे शिक्षण घेतले आहे. त्या राजकीय कुटुंबातून येतात. त्यांच्या कुटुंबातील काही सदस्य काँग्रेसमध्ये तर काही माकपमध्ये होते. काकोली घोष दस्तीदार या ममता बॅनर्जी यांच्या अत्यंत विश्वासू मानल्या जातात. त्यांनी १९९८ मध्ये तृणमूल काँग्रेसची स्थापना करण्यासाठी ममता बॅनर्जीं यांना समर्थन दिले होते.
काकोली घोष दस्तीदार या चार वेळेस खासदार राहिल्या आहेत. नरादा प्रकरणात त्यांचे नाव समोर आल्याने त्या विवादात अडकल्या होत्या. नरादा प्रकरणात “बलात्कार झाला नाही” , “एका महिलेत व तिच्या ग्राहकात गैरसमज झाला”, अशी टीका घोष यांनी केली होती. त्यावरून त्यांच्यावर टीकेची झोड उठली होती.
डोला सेन, ५९
राज्यसभेच्या खासदार डोला सेन या ममता बॅनर्जी यांच्या विश्वासू मानल्या जातात. ममता बॅनर्जी यांच्यानंतर डोला सेन यांच्याकडेच पाहिले जाते. डोला सेन सुरूवातीच्या काळात व्यापारी संघटनेच्या नेत्या होत्या. कनोरिया जूट मिलमध्ये झालेल्या आंदोलनातून त्यांना ओळख मिळाली. नक्षल चळवळीबद्दल त्यांना सहानुभूती होती. मेधा पाटकर तसेच इतर सामाजिक कार्यकर्त्यांना त्यांनी आंदोलनात सहभागी केले होते. त्यानंतर त्यांनी तृणमूल काँग्रेस पक्षात प्रवेश केला. ममता बॅनर्जी यांनी २०२१ मध्ये नंदीग्राम मधून सुवेंदु अधिकारी यांच्याविरोधात निवडणूक लढवली होती. त्यात त्यांचा पराभव झाला होता. नंदीग्राममध्ये प्रचाराची जबाबदारी डोला सेन यांच्यावर होती. पण, डोला सेन यांनी केलेल्या प्रयत्नांचे कौतुक करण्यात आले होते. २०१४ मध्ये डोला सेन आसनसोल मधून लोकसभेची निवडणूक हरल्या. त्यानंतर त्यांना पक्षाकडून राज्यसभेत पाठवण्यात आले.
बिरभा हंसदा, ४३
बिरभा हंसदा या संथाली सिनेसृष्टीतील एक प्रसिद्ध चेहरा आहेत. त्यांचे आई व वडिल दोघेही आमदार राहिले होते. बिरभा हंसदा यांचा स्थानिक स्वराज्य संस्था, विधानसभा, लोकसभा निवडणूकीत पराभव झाला होता. २०२१ मध्ये त्या आमदार म्हणून निवडून आल्यानंतर ममता बॅनर्जींनी त्यांच्यावर राज्यमंत्रीपदाची धुरा सोपवली. हंसदा या चित्रपटसृष्टीत यशस्वी ठरल्या. त्यांनी १९ चित्रपटात काम केले आहे. तसेच त्यांना सात वेळा उत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार “अखिल भारतीय संथाली चित्रपट संघटने”कडून मिळाला आहे. बिनपूर मधून त्या सध्या निवडणूक लढवत आहेत.
लता बॅनर्जी, ६०
लता बॅनर्जी ह्या ममता बॅनर्जी यांच्या भावजय आहेत. त्या अभिषेक बॅनर्जी यांच्या मातोश्री आहेत. ममता बॅनर्जी यांचे वारसदार म्हणून अभिषेक बॅनर्जी यांच्याकडे पाहिले जाते. ममता बॅनर्जींच्या राजकीय प्रवासात लता बॅनर्जी या कायम त्यांच्यासोबत असतात. रेल्वे मंत्रीपासून ते मुख्यमंत्री बनेपर्यंत लता बॅनर्जींची ममता बॅनर्जींना साथ लाभली आहे. नुकतेच विदेश दौऱ्यावर गेलेल्या ममतांनी लता यांना सोबत नेले होते. पश्चिम बंगालमधील शालेय नोकरी घोटाळ्याच्या तपासादरम्यान ईडीने चौकशीसाठी इतरांबरोबरच लता आणि त्यांचे पती अमित यांना पाचारण केले होते. हे दांपत्य ‘लीप्स अँड बाउंड्स’ (Leaps & Bounds) या कंपनीचे संचालक असून ही कंपनी सध्या ईडीच्या रडारवर आहे.
कृष्णा चक्रवर्ती, ६१
चक्रवर्ती आणि ममता बॅनर्जी यांची साथ चार दशके जुनी आहे. १९८४ मध्ये, तत्कालीन युवा काँग्रेस नेत्या असलेल्या ममतांनी न्यू अलीपूर कॉलेजमधून त्यांची निवड केली होती. त्याच वर्षी, जेव्हा काँग्रेसने ममतांना पहिल्यांदा जाधवपूरमधून माकपचे दिग्गज नेते सोमनाथ चॅटर्जी यांच्या विरोधात लोकसभेची उमेदवारी दिली, तेव्हा चक्रवर्ती प्रत्येक प्रचारात ममतांच्या पाठीशी होत्या. ममता निवडून आल्यावर जेव्हा दिल्लीला गेल्या तेव्हा चक्रवर्ती देखील त्यांच्यासोबत गेल्या. पुढील पाच वर्षे त्या ममतांसोबतच राहिल्या.
चक्रवर्ती यांचे लग्न झाले तेव्हा ममता उपस्थित होत्या. तसेच जेव्हा चक्रवर्ती गरोदर होत्या, तेव्हा त्या ममतांसोबतच राहत होत्या. चक्रवर्ती यांनी अनेकदा त्यांच्या ममतांबरोबर असलेल्या नात्याचे वर्णन आई आणि मुलीचे नाते असे केले आहे. १९९८ मध्ये जेव्हा ममतांनी तृणमूल काँग्रेसची स्थापना केली, तेव्हा चक्रवर्ती यांच्याकडे कोणतेही अधिकृत पद नव्हते. आता त्या तृणमूल काँग्रेसच्या महिला आघाडीच्या उपाध्यक्ष, बिधाननगर महानगरपालिकेच्या अध्यक्षा आणि कोणत्याही राजकीय सभेत ममतांच्या अगदी जवळ असणाऱ्या व्यक्ती आहेत. चक्रवर्ती यांचे पती समीर हे हुगळी जिल्ह्यातील पांडुआ मतदारसंघातून तृणमूल काँग्रेसचे उमेदवार आहेत.
महुआ मोइत्रा, ५१
ममता बॅनर्जी आणि महुआ मोइत्रा यांची राजकीय शैली एकमेकींपासून पूर्णपणे भिन्न आहे. मोइत्रा या दिल्लीत ममतांचा आवाज मानल्या जातात. परदेशात काम केलेल्या ‘इन्व्हेस्टमेंट बँकर’ असलेल्या मोइत्रा यांना राहुल गांधींनी काँग्रेसमध्ये आणले होते, परंतु, त्यानंतर त्या तृणमूल काँग्रेसमध्ये (TMC) सामील झाल्या. २०१६ मध्ये नदिया जिल्ह्यातील करीमपूरमधून त्या आमदार म्हणून निवडून आल्या. त्यांची कौशल्ये दिल्लीच्या राजकारणासाठी अधिक योग्य असल्याचे लक्षात आल्यावर ममतांनी त्यांना २०१९ मध्ये कृष्णनगर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आणि त्या विजयी झाल्या.
संसदेत सततच्या गदारोळाला न जुमानता मोइत्रा यांनी दिलेले ‘फॅसिझमची सात सुरुवातीची लक्षणे’ हे भाषण खूप गाजले. तेव्हापासून भाजपचे वर्चस्व असलेल्या सभागृहात त्या विरोधी पक्षाचा एक प्रमुख आवाज बनून राहिल्या आहेत. नागरिकत्व दुरुस्ती कायद्यासारख्या (CAA) मुद्द्यांवरून त्यांनी सर्वोच्च न्यायालयातही सरकारला आव्हान दिले आहे. ८ डिसेंबर २०२३ रोजी, ‘पैसे घेऊन प्रश्न विचारल्याच्या’ कथित प्रकरणात मोइत्रा यांची खासदारकी रद्द करण्यात आली. परंतु २०२४ मध्ये, तृणमूलने त्यांना पुन्हा कृष्णनगरमधून उमेदवारी दिली आणि त्या पुन्हा खासदार म्हणून निवडून आल्या.
सागरिका घोष, ६१; मेनका गुरुस्वामी, ५१
सागरिका घोष व मेनका गुरुस्वामी या दोघीही राज्यसभेच्या खासदार आहेत. त्यांच्याकडे असलेल्या अनुभवामुळे व क्षमतेमुळे ममता बॅनर्जी यांनी त्यांची राज्यसभेत नियुक्ती केली. घोष या माजी पत्रकार आहेत. तर गुरस्वामी या सर्वोच्च न्यायालयातील वकिल आहेत. निवडणूक आयोगासोबत (ECI) झालेल्या तृणमूलच्या अलीकडील बैठकीत या दोन्ही नेत्या सहभागी होत्या. या बैठकीत दोन्ही बाजूंमध्ये शाब्दिक चकमक उडाली होती. घोष यांनी पत्रकारिता सोडून राजकारणात प्रवेश केला आणि २०२४ मध्ये त्या राज्यसभेवर गेल्या, तर गुरुस्वामी यांनी याच आठवड्यात शपथ घेतली. विशेष म्हणजे, घोष जेव्हा पत्रकार म्हणून काम करत होत्या, तेव्हा एका थेट (live) चर्चासत्रात त्यांचा ममतांशी वाद झाला होता, ज्यानंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी तो कार्यक्रम सोडून रागाने निघून गेल्या होत्या.
