तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव ( केसीआर ) यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचं कौतुक करत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला आहे. जनतेने काँग्रेसच्या नेतृत्वाखालील संयुक्त पुरोगामी आघाडीचा पराभव करून भाजपाला मतदान केलं होतं. पण, भाजपाचे सरकार आल्यापासून देश आगीतून फुफूट्यात पडला असून, मोदी हे देशाचे सर्वात अकार्यक्षम पंतप्रधान असल्याचं सिद्ध झालं, अशी टीका केसीआर यांनी केली. तेलंगणाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी बोलताना केसीआर म्हणाले की, "माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी मोंदीपेक्षा उत्तम कार्य केलं होतं. त्यांनी कधीच आपल्या कामाचा गवगवा केला नाही. शांतपणे आपलं काम करत राहिले. तरीही, जनतेने मोदींच्या नेतृत्वाखाली चांगल्या सरकारच्या अपक्षेनं मतदान केलं होतं. पण, हे आगीतून उठून फुफूट्यात पडण्यासारखं होतं." हेही वाचा : बिहारमध्ये मंत्रिमंडळ विस्तारावरून राजकारण तापलं, प्रश्न विचारताच मुख्यमंत्री नितीशकुमार म्हणाले; “हा निर्णय…” पत्रकार पूजा मेहरा यांच्या 'द लॉस्ट डिकेट' यांच्या पुस्तकाचा हवाला देत केसीआर यांनी सांगितलं की, "मोदी सरकारच्या कार्यकाळात देशाची कामगिरी ढासळत आहे. तरी सुद्धा सरकार आपली बढाई मारण्यात मग्न आहे. मनमोहन सिंग यांचं सरकार असतं, तर तेलंगणाचं उत्पन्न १३ लाख कोटींऐवजी १६ लाख कोटी झालं असतं. भाजपाच्या सरकारमुळे राज्याचं ३ लाख कोटी रुपयांचं नुकसान झालं आहे." "२०२३-२४ साली भारताची अर्थव्यवस्था ५ ट्रिलियन डॉलर करण्याचं सरकारचं लक्ष्य असून, हे मुर्खपणाचं आणि विनोदी आहे. ५ ट्रिलियन डॉलर हे उद्दिष्ट खूप कमी आहे. पण, आतापर्यंत फक्त ३.५ ट्रिलियन डॉलरचं लक्ष्य गाठणं शक्य झालं आहे. तसेच, दरडोई उत्पन्नाच्याबाबतीत श्रीलंका, बांग्लादेश आणि भूटान भारतापेक्षा पुढं आहेत. याबद्दल संसदेत चर्चा व्हायला हवी," असं केसीआर यांनी म्हटलं. हेही वाचा : दिल्ली, महाराष्ट्रानंतर आता तामिळनाडूमध्येही सरकार-राज्यपाल वाद! आरएन रवी यांच्या दलितांवरील विधानामुळे राजकारण तापण्याची शक्यता अदाणी प्रकरणावर पंतप्रधान मोदींनी भाष्य केलं नाही. यावरून केसीआर यांनी टीका करत सांगितलं की, "भारतीय जीवन विमा निगम ( एलआयसी ) ने अदाणींच्या कंपन्यांत मोठी गुंतवणूक केली आहे. अदाणी प्रकरणावर केंद्र सरकार कोणती कारवाई करणार, याकडे सर्वाचं लक्ष लागून राहिलं होतं. पण, मोदींनी संसदेतील आपल्या भाषणात या विषयावर बोलणं टाळलं," असं केसीआर म्हणाले.