छत्रपती संभाजीनगर : आरक्षण मागणी तसेच पुढे कुणबी प्रमाणपत्राच्या सुलभतेसाठी करण्यात आलेल्या गेल्या १० आंदोलनांमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उल्लेख करताना आडनावाच्या मागे शेवटी ‘साहेब’ लावून बोलणारे मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे आता त्यांचा उल्लेख एकेरी करू लागले आहेत. परभणीचे खासदार संजय जाधव आणि समाजकल्याण मंत्री संजय शिरसाठ यांना धारेवर धरत एवढे दिवस भाजप विरोधात असणारा सूर आता शिंदे यांच्या शिवसेनेच्या विरोधात सरकत आहे. जरांगे यांच्या आंदोलनास शिवसेनेच्या शिंदे गटाकडून मिळणाऱ्या पाठबळामुळे जरांगे यांच्या निष्पक्षतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ लागले होते. या प्रतिमेतून ही सुटका व्हावी, म्हणून ही आक्रमक भाषा आहे का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
अजित पवार यांच्या आकस्मिक निधनाने मराठवाड्यातील मराठा नेते सैरभैर झाले आहेत. यातील काही जणांनी थेट भाजपमध्ये जाण्याऐवजी शिवसेनेच्या शिंदे गटाला प्राधान्य दिले. मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे यांनी शिंदे समिती नेमली. या समितीच्या कामकाजामुळे कुणबी प्रमाणपत्रे मिळू लागली. परिणामी मिळालेल्या प्रमाणपत्राचे श्रेय शिवसेना नेते आपल्या पदरात पाडून घेत होते.
जिल्हा परिषदेच्या राजकारणातील काही प्रमाणपत्राच्या वैधतेवरून जरांगे यांनी पुन्हा एकदा आंदोलन सुरू केले. मात्र, आठव्या उपोषणापासून भाजप नेते जरांगे यांचे उपोषण सोडविण्यासाठी आघाडीवर आहेत. राधाकृष्ण विखे यांनीच जात पडताळणी समित्या अन्य राज्यात नाहीत, असे आपणास सांगितले होते. ती मागणी आता सराकारने पूर्ण करावी, असा पवित्रा जरांगे यांनी घेतला. यावेळी आंदोलनास धार देताना शिवसेना मंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे टीकेच्या केंद्रस्थानी राहवेत असे प्रयत्न गेल्या दोन – तीन दिवसांपासून सुरू आहेत.
संजय जाधव यांनी कार्यक्रम रद्द करावा, अशी मागणी जरांगे यांनी केली आणि शिवसेना विरोधाचा सूर उंचावला. तो टीपेला नेताना परभणी येथील एकनाथ शिंदे यांच्या कार्यक्रमात काही जणांनी काळे झेंडे फडकावले. मात्र, ही आपलीच माणसे आहेत, असे म्हणत एकनाथ शिंदे यांनी वेळ निभावून नेली. मात्र, जरांगे यांच्या उपोषणादरम्यान होणाऱ्या कार्यक्रमावर आक्षेप घेत जरांगे यांनी शिवसेना विरोध टाेकदार केल्याप्रमाणे उदय सामंत यांनी पुन्हा एकदा जरांगे यांना समजावण्याचा प्रयत्न केला. सुरुवातीच्या टप्प्यात राधाकृष्ण विखे, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर होणारी टीका आता शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाठ आणि खासदार संजय जाधव यांच्यापर्यंत पोहोचली आहे. टीकेचा सूर जरांगे यांनी अचानक कसा बदलला, याची चर्चा आता राजकीय पटलावर रंगू लागली आहे.
मुंबईतल्या आंदोलनाबद्दल उत्सुकता
कार्यक्रमास येऊ नये असे सुनावल्यानंतरही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कार्यक्रम घेतला. विशेष म्हणजे आंदोलकही आपलेच आहेत असे म्हणत आंदोलकांस आपलेसे केले, असा दावाही शिंदे गटाच्या वतीने करण्यात येत आहे. जरांगे यांचा बदलेला सूर आणि शिवसेना विरोधाच्या सुरामुळे या आंदोलनाचा पुढचा टप्पा मुंबईत होईल का आणि कसा होईल याची उत्सुकता वाढली आहे. दरम्यान मराठा आंदोलकांनी मुंबईत आधीच पोहोचावे, असे निर्देश जरांगे यांनी दिले आहेत.
