छत्रपती संभाजीनगर : कुणबी प्रमाणपत्र मिळण्यात येणाऱ्या अडचणी सोडवाव्यात यासह पुन्हा विविध मागण्यांसाठी गेल्या चार दिवसांपासून उपोषण करणारे मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांच्या उपोषणाला आता राजकीय नेते भेटी देऊ लागले आहेत. यात जालन्याचे कॉंग्रेसचे खासदार कल्याण काळे, माजलगावचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार प्रकाश सोळुंके , बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी उपोषणस्थळी भेटी दिल्या; पण ज्यांच्या मतदारसंघात आंतरवली सराटी हे गाव येते, त्या मतदारसंघाचे शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे आमदार हिकमत उढाण उपोषणस्थळी फिरकले नाहीत. जरांगे यांच्या आंदोलनाबाबत त्यांचे समर्थन किंवा विरोधाचे विधानही पुढे आले नाही. केवळ आमदारच नाही, तर विरोधक राजेश टाेपेही आंदोलनस्थळी येत नसल्याचे निरीक्षण मराठा कार्यकर्ते आवर्जून सांगतात.
जरांगे यांच्या आंदोलनावर पोलिसांचा लाठीमार झाल्याच्या दुसऱ्या दिवशी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते शरद पवार पोहोचले होते. पुढे नेत्यांची रांगच उपोषणस्थळी होती. या घटनाक्रमानंतर जरांगे हे कसे राष्ट्रवादीचेच असल्याची चर्चा सुरू झाली. या काळात घनसावंगीचे आमदार असणारे राजेश टोपे जरांगे यांच्या उपोषणस्थळी दोन – तीन वेळा दिसले. पुढे मात्र ते उपोषणस्थळी दिसले नाहीत.
या मतदारसंघात राजेश टोपे यांच्या विरोधात हिकमत उढाण यांना उमदेवारी देण्यात आली. उढाण यांना ९८ हजार ४९६ मते मिळाली.ते राजेश टोपे यांना पराभूत करून निवडून आले. राजेश टोपे यांना ९६,१८७ मते मिळाली होती. उढाण आमदार झाले; पण या मतदारसंघाचे साखरेचे गणित राजेश टोपे यांच्या हाती आहे.
तालुक्याचे राजकारण वेगळे आणि जरांगे यांचे उपोषण वेगळे असे प्रारूप घनसावंगी मतदारसंघात विकसित होत गेले. आंतरवली सराटी हे गाव परभणी लोकसभा मतदारसंघात आहे. त्यामुळे उपोषणादरम्यान जरांगे यांनी परभणीचे खासदार संजय जाधव यांचा एकेरी उल्लेख करून आपण त्यांच्यासाठी खूप काम केल्याचा दावा केला. शिवसेनेच्या शिंदे गटानेही त्याला थेट विरोध केला नाही; पण मेळावा घेऊन उत्तर दिले. पुढे हा वाद वाढू नये म्हणून खासदार संजय जाधव यांनी दहीहंडी महोत्सव रद्द केला.
दरम्यान, मराठा म्हणून असणारी मतदारसंघातील ओळख अधिक गडद व्हावी आणि उपोषणातील मागण्यांबरोबर आम्ही आहोत, हे दर्शविण्यासाठी राजकीय नेते उपोषणाला हजेरी लावत आलेले आहेत. घनसावंगीचे लोकप्रतिनिधी मात्र दिसतच नसल्याचे आवर्जून सांगण्यात येत आहे. या आंदोलनास सहकार्य करण्यास कोण पुढे येत नाही, याची नावे सांगा असे जरांगे जाहीरपणे सांगत आहेत. मात्र, मतदारसंघाचे आमदार या आंदोलनापासून दूर आहेत. शिवसेना एकनाथ शिंदे समर्थक नेते मात्र एरवी धावपळ करीत असतात.
