छत्रपती संभाजीनगर : मराठा आरक्षण मागणी आणि या अनुषंगाने काढलेल्या शासन निर्णयातील दुरस्त्यांसाठी करण्यात आलेल्या ११ उपोषणांमध्ये मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांच्याशी चर्चा करण्यासाठी आलेल्या शिष्टमंडळातून एकेक व्यक्ती वजा हाेत गेली. एकेरी आणि जहाल भाषेमुळे मंत्र्यांनी आंतरवली सराटीला जाणे टाळले. परिणामी, मंत्री भेटीविना जरांगे यांनी जलप्राशन केले. या उपोषणातील चर्चेदरम्यान एकेक मंत्री, अधिकार पदावरील व्यक्ती वजा होत गेली. यापूर्वी एकदा गावातील महिलांच्या हस्ते आणि आता सरकारच्या वतीने आमदार प्रसाद लाड यांनी दिलेल्या आश्वासनानंतर जरांगे यांनी भूमिका थोडी सौम्य केली.

जरांगे यांच्या उपोषणादरम्यान झालेल्या लाठीमारानंतर सर्वांत पहिल्यांदा पोहोचणाऱ्या व्यक्तींमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार होते. तेव्हा पवार यांनाही काही तरुणांचा विरोध होता. पुढे आरक्षण मागणीच्या आंदोलनास प्रतिसाद वाढत गेला. धुळे – सोलापूर हा राष्ट्रीय महामार्ग बंद करावा लागावा, अशी परिस्थिती निर्माण झाली, तेव्हा उपोषण सोडविण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच पुढाकार घेतला होता.

पहिल्या टप्प्यात जरांगे यांच्याशी स्वत: तत्कालीन मुख्यमंत्री शिंदे दूरध्वनीवरून चर्चा करत. यामुळे शिष्टमंडळाचे स्वरूप मोठे असले, तरी चर्चा थेट सुरू होती. पुढे शिवसेनेचे नेते आणि भाजपचे काही नेते शिष्टाचाराचा भाग म्हणून आंदोलनस्थळी जात. या शिष्टमंडळातील नेत्यांना चर्चा करणे सोपे व्हावे म्हणून तत्कालीन मंत्री आणि आताचे छत्रपती संभाजीनगरचे खासदार संदीपान भुमरे पुढाकार घेत. तेव्हा जरांगे यांच्या उपोषण व्यासपीठावर ‘ भुमरे’ यांना मामा म्हणून आदर मिळत असे. मंत्री उदय सामंत, दादा भुसे, शंभुराज देसाई यांच्यासह ओबीसी कल्याण मंत्री अतुल सावे आणि आमदार नारायण कुचे हेही जात.

मागण्या मान्य करता याव्यात आणि मार्ग काढता यावा म्हणून माजी न्यायमूर्तींसह वरिष्ठ अधिकाऱ्यांचे एक शिष्टमंडळ उपोषणस्थळी आले होते. यामध्ये निवृत्त न्यायमूर्ती एम. जी. गायकवाड, न्या. सुनील शुक्रे आणि तत्कालीन जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ भेटले होते. पुढे या आंदोलनात जरांगे यांच्या कानात आपण काही गोष्टी बाेलू शकतो, असे आमदार बच्चू कडू यांचे दृश्य दिसू लागले. मग जरांगे आणि सरकार यांच्यामध्ये बच्चू कडू यांनी मध्यस्थ म्हणून भूमिका निभावली. महायुती सरकारमध्ये शिंदे मुख्यमंत्री असल्याने पुढील काळात उदय सामंत हे शिष्टमंडळाच्या केंद्रस्थानी होते. पुढे जरांगे यांचे आंदोलन नसतानाही उदय सामंत यांनी भेट घेतली. जरांगे हे आपले मित्र आहेत, असेही ते एकदा जाहीरपणे म्हणाले होते. पुढे बहुतांश आंदोलनात उदय सामंत हेच जरांगे यांच्याबरोबर चर्चेच्या केंद्रस्थानी होते. नंतर भाजपचे आमदार शिष्टाचार म्हणूनही जात नसत.

खासदार अशोक चव्हाण यांनी मात्र एकदा मध्यरात्री जरांगे यांची भेट घेतली होती. अशीच एक भेट माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही घेतली होती. पुढे मुख्यमंत्रीपद फडणवीस यांच्याकडे आले आणि टीकेच्या केंद्रस्थानी ते आले. शिवराळ भाषेतील टीकेमुळे प्रसाद लाड यांच्यासह प्रवीण दरेकर, ओबीसी समाजाचे नेते जरांगे यांच्या भूमिकेवर टीका करत. अचानक एके दिवशी आपण मराठा असल्याचे सांगत प्रसाद लाड यांनी जरांगे यांच्याबरोबर चर्चा करू असे जाहीर केले आणि शिवसेनेचे प्राबल्य असणाऱ्या या शिष्टमंडळात भाजपचे आमदार प्रसाद लाड हेही आले.

मराठा आरक्षण उपसमितीचे प्रमुख म्हणून जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे जरांगे यांच्याबरोबर चर्चा करत होते. दरम्यानच्या काळात बच्चू कडू शिवसेनेचे आमदार झाले; पण आता शिष्टमंडळात दिसून येत नाहीत. दादा भुसे पुढे आलेच नाहीत. भाजपचे मंत्री आंतरवली सराटीमध्ये कधी आले नाहीत आणि चुकून आले, तरी माध्यमांसमोर भूमिका मांडण्याच्या फंदात ते पडले नाहीत.

गेल्या काही दिवसांत प्रसाद लाड यांचा उल्लेख जरांगे ‘लाड भाऊ’ असे करू लागले. ११ व्या उपोषणात नरमाई यावी म्हणून लाड यांनी शिष्टाई केली. ती काही प्रमाणात यशस्वी झाली. अजूनही तिढा पूर्णपणे सुटलेला नाही. पण, शिष्टमंडळातील एकेक सदस्य वजा होत गेला.

हा गुंता सोडवताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर व्यक्तिगत पातळीवर टीका करण्यात आली. अशीच टीका एकनाथ शिंदे यांच्यावर झाली. वैधता प्रमाणपत्रावरून मंत्री संजय शिरसाट, खासदार संदीपान भुमरे यांच्यावर टीका झाली आणि तेही वजा झाले. जरांगे टीका करत गेले आणि शिष्टमंडळातील एकेक सदस्य कमी होत गेला. आता प्रसाद लाड तेवढे शिष्टाईसाठी पुढे आले आणि त्यांच्यामुळे जरांगे यांनी जलप्राशन केले. हे करण्यापूर्वी जिल्हाधिकारी म्हणून अशिमा मित्तल याही चर्चा करण्याच्या शिष्टमंडळात पाठवल्या गेल्या. रणनीती म्हणून आता शिष्टमंडळ मंत्र्याचे असणार नाही, असा संदेश जरांगे व त्यांच्या समर्थकांना देण्यात सरकारला यश आले.