आजच्या महत्वाच्या राजकीय बातम्या : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी येथून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अत्यंत कडक शब्दांत इशारा दिला… मनोज जरांगे पाटील हे गळ्यातील फास झाल्याने राज्य सरकारला त्यांना मारायचे आहे, असा खळबळजनक दावा संजय राऊत यांनी केला… भाजपाची साथ सोडा आपण एकत्र संघर्ष करू असे आवाहन आमदार रोहित पवार यांनी अजित पवार गटातील आमदारांना केले… मुंबईत भाजपाला मोठा धक्का बसला असून युवामोर्चाच्या शेकडो पदाधिकाऱ्यांनी राज ठाकरे यांच्या मनसेत प्रवेश केला… मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या टीकेवरून शिंदेसेनेच्या मंत्र्यांनी तीव्र संताप व्यक्त केला… या सर्व घडामोडी सविस्तर जाणून घेऊ…

मनोज जरांगे यांचा शिंदेंना इशारा

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटीत घेतलेल्या पत्रकार परिषदेतून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना अत्यंत कडक शब्दांत इशारा दिला. शिंदे यांनी मंत्री संजय शिरसाट यांच्याकडून मराठ्यांचे कुणबी प्रमाणपत्र रद्द करून घेतल्याचा आरोपही त्यांनी केला. माध्यमांशी संवाद साधताना जरांगे म्हणाले की, शिंदे यांनी मराठ्यांनाच मराठ्यांच्या अंगावर सोडण्याचे काम करू नये. त्यांनी वेळेत सुधारावे नाहीतर ते एका फटक्यात संपतील. मंत्री उदय सामंत आणि संजय शिरसाट यांच्यात फोनवर झालेल्या संभाषणाची आम्हाला सर्वांना माहिती आहे. सत्ताधाऱ्यांनी गुंड पाळले असून ते आमच्या अंगावर सोडण्याचा प्रयत्न करत आहेत. यादरम्यान शिंदे यांची बाजू उचलून धरणाऱ्या उदय सामंत आणि शंभूराज देसाई या दोन्ही मंत्र्यांनाही जरांगे यांनी लक्ष्य केले. तुम्ही एकनाथ शिंदेंचे समर्थक झालात म्हणून जातीला विसरणार का? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

संजय राऊत यांचा खळबळजनक आरोप

मनोज जरांगे पाटील हे गळ्यातील फास झाल्याने राज्य सरकारला त्यांना मारायचे आहे, असा खळबळजनक आरोप शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला. जरांगे पाटील यांचा उपयोग सरकारसाठीचा संपला आहे. सरकारने त्यांच्या उपोषणाचा आणि लढ्याचा स्वत:च्या फायद्यासाठी वापर करून घेतला आणि आता त्यांना वाऱ्यावर सोडले आहे. मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आज १२ वा दिवस आहे. या काळात त्यांची प्रकृती प्रचंड खालावली आहे. हे अत्यंत अमानुष असल्याची खंतही राऊत यांनी व्यक्त केली. सरकारच्या कुणीतरी प्रमुख माणसाने जरांगे पाटील यांच्याकडे जाऊन चर्चा केली पाहिजे. मराठा आरक्षण असो किंवा ओबीसी आरक्षण असो, देवेंद्र फडणवीस यांनी या राज्यातील सर्व पक्षातील प्रमुख नेत्यांशी चर्चा करून यातून मार्ग काढला पाहिजे, असेही राऊत यांनी नमूद केले.

“भाजपाची साथ सोडा आपण एकत्र संघर्ष करू”

भाजपाची साथ सोडा आपण एकत्र संघर्ष करू असे आवाहन आमदार रोहित पवार यांनी अजित पवार यांच्या पक्षातील आमदारांना केले. अजितदादांच्या निधनानंतर प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी एकत्र येऊन पक्षावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला होता. त्यासंदर्भातील पुरावेही आपणच दिले असल्याचे ते म्हणाले. आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली आज गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माध्यमांनी त्यांना राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत प्रश्न विचारला. त्यावर उत्तर देताना रोहित पवारांनी दोन्ही राष्ट्रवादी कधीच एकत्र येणार नसल्याचे स्पष्ट करताना एक शक्यताही बोलून दाखवली. जर सत्तेत असलेल्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी भाजपाची साथ सोडण्याचा विचार केला तरच आमचे कदाचित विलीनीकरण होऊ शकते, असे त्यांनी स्पष्ट केले. रोहित पवार यांच्या या विधानाची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे.

भाजपा युवा मोर्चाचे शेकडो पदाधिकारी मनसेत

मुंबईत भाजपाला मोठा धक्का बसला असून पक्षाची युवक संघटना असलेल्या भाजयुमोच्या शेकडो पदाधिकाऱ्यांनी राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला. मनसेचे युवा नेते अमित ठाकरे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. विशेष बाब म्हणजे- अगदी आठवडाभरापूर्वी भाजपा युवामोर्चाच्यावतीने अमित ठाकरे यांच्याविरोधात मुंबईत आंदोलन केले होते. त्यावरून मोठा राजकीय वादंग निर्माण झाला होता. त्यावेळी मनसेच्या अनेक प्रमुख पदाधिकाऱ्यांनी राज ठाकरे यांच्या शिवतीर्थाबाहेर तळ ठोकून भाजपाच्या पदाधिकाऱ्यांना तिथे येण्याचे आवाहन केले होते. या प्रकरणाला आठवडाभराचा कालावधी लोटला असतानाच भाजयुमोच्या शेकडो पदाधिकाऱ्यांनी थेट मनसेत प्रवेश केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

शिंदेसेनेच्या मंत्र्यांचा मनोज जरांगेंवर संताप

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी येथील आंदोलनादरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर सडकून टीका केली. त्यांच्या या आक्रमक भूमिकेवर शिंदेसेनेचे मंत्री शंभुराज देसाई आणि भरत गोगावले यांनी तीव्र संताप व्यक्त केला. जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्र्यांचा केलेला एकेरी उल्लेख हा मराठा समाजाला फारसा रुचलेला नाही. गेल्या दोन दिवसांत मला मराठा समाजातील मुलांचे फोन आले, मेसेज आले. एकनाथ शिंदे साहेबांवर एकेरी टीका केल्यामुळे मराठा आंदोलनाला लागलेले राजकीय वळण बरोबर नाही, असे त्यांचे म्हणणे होते. त्यामुळे जरांगे पाटील यांनी पुन्हा एकेरी उल्लेख करू नये, असे देसाई यांनी म्हटले आहे. दुसरीकडे- आमच्या नेत्याला लक्ष्य केले जात असेल तर आम्ही गप्प बसणार नाही, असा इशाराच मंत्री गोगावले यांनी जरांगे यांनी दिला आहे. जर ते पुन्हा असे बोलले तर एकही मराठा नेता गप्प बसणार नाही, असा संतापही गोगावले यांनी व्यक्त केला.