आजच्या महत्वाच्या राजकीय बातम्या : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्याविरोधात आपण थेट ईडीकडे तक्रार केल्याचा दावा मराठा आरक्षण अभ्यासक अजय बारसकर यांनी केला… शिवसेना ठाकरे गटापाठोपाठ शिंदेसेनेलाही मोठा धक्का बसला असून ठाण्यातील नगरसेविका सुलेखा चव्हाण यांचे पद रद्द करण्यात आले… मुंबईचे महत्त्व कमी करण्याचा खटाटोप सुरू असताना दिल्लीचेही महत्त्व संपवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा संताप राज ठाकरे यांनी व्यक्त केला… भाजपा आपल्याच मित्रपक्षातील नेत्यांना कसे अडचणीत आणते हे पार्थ पवारांना आता कळेल, असा घणाघात आमदार रोहित पवार यांनी केला… मराठे ठरवल्याप्रमाणे मुंबईत जाणारच असून १२ सप्टेंबरला आंदोलनाची पुढील आरपारची दिशा जाहीर करणार, असे मनोज जरांगे यांनी स्पष्ट केले… या सर्व घडामोडी सविस्तर जाणून घेऊ…

मनोज जरांगे यांच्याविरोधात ईडीकडे तक्रार?

मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी मराठा आंदोलनाच्या नावाखाली प्रचंड मोठा भ्रष्टाचार केल्याचा आरोप मराठा आरक्षण अभ्यासक अजय बारसकर यांनी केला. त्यांचे कारनामे उघड करण्यासाठी आपण थेट सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीकडे अधिकृतरीत्या तक्रार केली असल्याचे बारसकर यांनी सांगितले. या संदर्भात मुंबईतील ईडीच्या कार्यालयाबाहेरून त्यांनी समाजमाध्यमांवर एक व्हिडीओही शेअर केला. मला ईडीच्या कार्यालयाकडून बोलवणे आले होते. त्यामुळे सर्व कागदपत्रे घेऊन मी आज ईडीच्या अधिकाऱ्यांकडे सुपूर्त केले. कमीत कमी एक हजार कोटी रुपयांचा हा भ्रष्टाचार आहे. याबाबत सविस्तर चौकशी करून तातडीने गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी आपण केल्याचे बासरकर यांनी स्पष्ट केले आहे. त्यांच्या आरोपांवर आता मराठा समाजाच्या मागण्यांसाठी अंतरवाली सराटीत उपोषणाला बसलेले मनोज जरांगे काय प्रत्युत्तर देणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

ठाकरे गटापाठोपाठ शिंदेसेनेलाही धक्का

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्या तथा मुंबईच्या माजी महापौर विशाखा राऊत यांचे नगरसेवकपद नुकतेच रद्द करण्यात आले. मुंबईच्या महापौर रितू तावडे महापालिकेच्या सभागृहात त्यासंदर्भातील माहिती दिली होती. नगरसेवक पद रद्द होण्यासोबतच त्यांना पुढील सहा वर्षांसाठी निवडणूक लढवण्यास बंदी घालण्यात आली. ठाकरेंच्या शिवसेनेसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील पक्षालाही जबर धक्का बसला आहे. ठाणे महानगरपालिकेतील प्रभाग क्रमांक ५ (अ) मधील नगरसेविका सुलेखा सुधाकर चव्हाण ऊर्फ सुलेखा शिवाजी सूर्यवंशी यांचेही नगरसेवक पद रिक्त झाल्याचे महापालिका प्रशासनाने जाहीर केले. धुळे येथील अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समितीने १६ जून २०२६ रोजी दिलेल्या आदेशाच्या आधारे त्यांचे नगरसेवक पद आपोआप संपुष्टात आले, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

राज ठाकरे यांचा भाजपा सरकारवर संताप

मुंबईचे महत्त्व कमी करण्याचा खटाटोप सुरू असताना दिल्लीचेही महत्त्व संपवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा संताप मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केला. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्याची सात दशकांची दिल्लीतील परंपरा यंदा प्रथमच खंडित होणार आहे. ७२ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचे वितरण दिल्लीऐवजी गुजरातमधील एकता नगर येथे स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या भव्य परिसरात होणार असल्याचे वृत्त आहे. यावरून राज ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर जोरदार टीका केली. तसेच गुजराती बांधवांनी मोदी शहांच्या नादी लागून उगाच वाहवत जाऊ नका, असे आवाहनही राज यांनी केले आहे. याआधी देशात अनेक पंतप्रधान होऊन गेले, ज्यांची जन्मभूमी, कर्मभूमी असलेली राज्य त्यांनी ओढूनताणून मोठी करण्याचा कधीच प्रयत्न केला नाही, असेही ते म्हणाले.

आमदार रोहित पवार यांचा घणाघात

पुण्यातील मुंढवा जमीन व्यवहारप्रकरणी दाखल गुन्ह्यात पार्थ पवार यांना आरोपी का करण्यात आले नाही, अशी विचारणा उच्च न्यायालयाने पोलिसांकडे केली. त्या संदर्भात प्रतिक्रिया देताना हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने त्यावर भाष्य करता येणार नाही. मात्र, भाजपा मित्रपक्षातील नेत्यांना कसे अडचणीत आणते, हे पार्थ पवारांना आता कळेल, असा घणाघात आमदार रोहित पवार यांनी केला. पार्थ पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणातील वस्तुस्थिती आणि परिस्थिती जनतेसमोर मांडावी, असा सल्लाही त्यांनी दिला. अजित पवार जिवंत असताना ते माध्यमांसमोर येऊन आपली वस्तुस्थिती मांडत होते. त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले, त्यावेळीही त्यांनी माध्यमांसमोर येऊन आपली भूमिका स्पष्ट केली होती, अशी आठवणही त्यांनी करून दिली. दरम्यान पार्थ पवार याबाबत काय भूमिका मांडणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

मनोज जरांगे पाटील यांची ठाम भूमिका

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाला गुरुवारी तेरावा दिवस उजाडला. प्रकृती स्थिर असली तरी अशक्तपणा जाणवत असतानाच जरांगे यांनी बैल पोळा सणानिमित्त राज्यातील तमाम शेतकरी व समाजबांधवांना शुभेच्छा देत माध्यमांशी संवाद साधला. सरकारने शिष्टमंडळ पाठवायचे असेल तर पाठवावे, मी कोणाचीही वाट पाहत बसलेलो नाही. आम्ही ठरवल्याप्रमाणे मुंबईत जाणारच असून १२ सप्टेंबरला आंदोलनाची पुढील आरपारची दिशा जाहीर करणार, असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले. मी सरकारला नाही, तर अन्याय करणाऱ्या व्यक्तींवर कठोर टीका केली आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी मराठ्यांची फसवणूक केली तर मी गप्प बसणार नाही. मी कोणत्याही पक्षाचा नाही, केवळ माझ्या मराठा जातीच्या बाजूने बोलणार आहे, असा इशाराही जरांगे यांनी दिला.