आजच्या महत्वाच्या राजकीय बातम्या : १) मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी येथे घेतलेल्या जाहीर पत्रकार परिषदेत शिवसेना शिंदे गटावर गंभीर आरोप केला… २) माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या तब्बल १६ नगरसेवकांच्या विजयाला थेट न्यायालयात आव्हान देण्यात आले… ३) मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर आज राज्य सरकारने मराठा समाजासाठी चार मोठे निर्णय घेतले… ४) छत्रपती शिवरायांनी अफझल खानाचा कोथळा काढला तेव्हा डीजे वाजवून आनंद साजरा केला नव्हता, असे वक्तव्य संजय राऊत यांनी केले… ५) अडीच वर्षांनंतर आपण पुन्हा आमदार होणार, असा ठाम विश्वास मनसे नेते आणि माजी आमदार राजू पाटील यांनी व्यक्त केला. या सर्व घडामोडी सविस्तर जाणून घेऊ…

मनोज जरांगेंचा शिंदे गटावर गंभीर आरोप

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी येथे घेतलेल्या जाहीर पत्रकार परिषदेत शिवसेना शिंदे गटावर गंभीर आरोप केला. शिंदेंचे दोन मंत्री आणि दोन प्रवक्त आपले आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न करीत असल्याची आम्हाला माहिती मिळाली आहे. मुंबईकडे निघाल्यानंतर मराठ्यांवर हल्ला करून मुख्यमंत्री फडणवीसांना बदनाम करण्याचा त्यांचा डाव आहे. भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे आणि त्यांच्या माणसांचा पण हाच प्रयत्न आहे, असे जरांगे यांनी म्हटले आहे. मुंबईत एकाही मराठा आंदोलकाचे रक्त निघाले तर १० मिनिटांत महाराष्ट्र बंद झालाच पाहिजे. पोलिसांनी हल्लाच केला तर पळू नका, चेंगराचेंगरी होते. येत्या १२ तारखेला राज्यभरातील मराठा बांधवांनी अंतरवाली सराटीत यावे, असे आवाहनही जरांगे यांनी केले.

शिवसेना ठाकरे गटाचे १६ नगरसेवक गोत्यात?

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेसमोर मुंबईत नवे आव्हान उभे राहिले आहे. दोन नगरसेवकांचे पद रद्द झाल्यानंतर आता ठाकरे गटाच्या आणखी १६ नगरसेवकांच्या विजयाला न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. विशेष म्हणजे, शिंदे गटाच्या प्रतिस्पर्धी उमेदवारांनी या नगरसेवकांविरोधात याचिका दाखल केल्या आहेत. निवडणूक अर्जात जात प्रमाणपत्र, संपत्तीची माहिती, शिक्षण आणि गुन्हेगारी प्रकरणांशी संबंधित माहिती लपवल्याचे आरोप या याचिकेत करण्यात आले आहेत. काही प्रकरणांमध्ये मतमोजणीवेळी निवडणूक अधिकाऱ्यांसोबत संगनमत केल्याचाही दावा करण्यात आला आहे. त्यामुळे या १६ नगरसेवकांचे भवितव्य न्यायालयाच्या निर्णयावर अवलंबून असणार. मुंबईतील या राजकीय आणि कायदेशीर घडामोडींमुळे ठाकरे गटासमोरील अडचणी आणखीनच वाढण्याची शक्यता आहे.

मराठा समाजासाठी सरकारचे ४ महत्वाचे निर्णय

मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर आज राज्य सरकारने मराठा समाजासाठी चार महत्वाचे निर्णय घेतले. त्यानुसार, शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ओबीसींप्रमाणे शैक्षणिक सुविधा देण्यात येणार आहेत. त्याबरोबरच या विद्यार्थांना आता वसतीगृहाचा लाभ घेता येणार आहे. तसेच मराठा समाजातील विद्यार्थ्यांना परदेशात शिकण्यासाठी शिष्यवृत्ती मिळणार आहे. सारथीच्या माध्यमातून मराठा समाजातील तरुणांना वाहन चालवण्याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्याबरोबरच कुणबी प्रमाणपत्राबाबत आज एक महत्त्वपूर्ण बैठक झाली असून, शिंदे समितीला सापडलेल्या कुणबी नोंदी ग्रामपंचायतींमध्ये लावण्याचा निर्णय आज घेण्यात आला आहे. तसेच संबंधित अधिकाऱ्यांना या संदर्भातील आदेश देण्यात आले आहेत. सरकारच्या या निर्णयावर मनोज जरांगे पाटील काय भूमिका घेतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

डीजेबाबात खासदार संजय राऊत यांचे विधान

छत्रपती शिवरायांनी अफझल खानाचा कोथळा काढला तेव्हा डीजे वाजवून आनंद साजरा केला नव्हता, असे वक्तव्य शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केले. लोकमान्य टिळकांची मंडालेच्या तुरुंगातून सुटका झाली आणि ते पुण्यात आले तेव्हाही त्यांच्या स्वागतासाठी डीजे वाजला नव्हता, असेही राऊत म्हणाले. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या संस्कृतीबाबत जी भूमिका मांडली ती योग्यच आहे. महाराष्ट्राच्या संस्कृतीवर उत्तरेचं अतिक्रमण होता कामा नये. ठाण्यात दहीहंडीच्या व्यासपीठावर गौतमी पाटीलला कुणी नाचवले? लावणी ही महाराष्ट्राची संस्कृती आहे; पण दहीहंडीच्या व्यासपीठावर हिडिस नृत्य सुरू होते ते कुणी केले याकडे जरा देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष दिले पाहिजे. संस्कृती रक्षकांच्या नावाखाली जे सुपारी किलर्स फिरत आहेत त्यांना फडणवीसांनी आवरले पाहिजे, असा सल्लाही संजय राऊत यांनी दिला आहे.

“अडीच वर्षांनी मी पुन्हा आमदार होणार”

‘अडीच वर्षांनंतर आपण पुन्हा आमदार होणार,’ असा ठाम विश्वास मनसे नेते आणि कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार राजू पाटील यांनी व्यक्त केला. आगामी निवडणुकीच्या तयारीला सुरुवात करतानाच त्यांनी कार्यकर्त्यांना निवडणूक आयोगाची एसआयआर मोहीम आणि मतदार यादीबाबत सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या. २०२४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत बोगस मतदान झाल्याची माहिती आपल्याला होती; पण हा प्रकार पकडण्यात आपण अयशस्वी ठरलो, असेही राजू पाटील म्हणाले. त्यामुळे आता सुरू असलेल्या एसआयआरमध्ये कार्यकर्त्यांनी अधिक सावध राहून मतदार यादीतील प्रत्येक नोंदीची पडताळणी करावी, असे आवाहन त्यांनी केले. यादरम्यान राजू पाटील यांच्या या विधानाची सध्या कल्याण परिसरासह ठाणे जिल्ह्यात जोरदार चर्चा रंगली आहे.