आजच्या महत्वाच्या राजकीय घडामोडी : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मंत्री राधाकृष्ण विखे यांना पुन्हा इशारा दिला… उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे ‘ऑपरेशन टायगर’ तुर्तास फेल झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली… कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांच्याबाबत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी खळबळजनक दावा केला… विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी आठवडाभराचा कालावधी शिल्लक असताना अमरावतीत काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद उफाळून आला… भाजपाने साताऱ्यातील दोन्ही राजेंना विचारात न घेता विधान परिषदेच्या उमेदवाराबाबत निर्णय घेतला, असा चिमटा जयंत पाटील यांनी काढला. या सर्व घडामोडी सविस्तर जाणून घेऊ…
मनोज जरांगे यांचा फडणवीसांना इशारा
मराठा आरक्षण आणि कुणबी प्रमाणपत्रांच्या मागण्यांवरून मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारवर पुन्हा टीका केली. मराठा समाजाने वारंवार आपल्या न्याय व हक्कासाठी आंदोलन करायचे आणि सरकारने ते हलक्यात घ्यायचे, हे आता खपवून घेणार नाही. मराठा समाजाचा अवमान करणार्यांना आम्ही २०२९ च्या निवडणुकीत पाडणार, असा इशारा जरांगे यांनी दिला. तसेच, राज्य सरकार जर आम्हाला आणि आमच्या आंदोलनाला हलक्यात घेत असेल तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राधाकृष्ण विखे पाटलांना पुढचा काळ जड जाईल, असेही जरांगे पाटील म्हणाले. आम्ही इतर मागासवर्गीय समाजाचे आरक्षण काढून आम्हाला द्या, असे म्हणत नाही. आम्ही केवळ आमच्या हक्काच्या आरक्षणाची मागणी करत आहोत. बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यात कुणबी नोंदी सापडल्या, पण तेथील तहसीलदारांनी आणि उपविभागीय अधिकाऱ्यांनी या नोंदी परस्पर उडवल्या, असा आरोपही जरांगे यांनी केला.
शिंदेंचे ‘ऑपरेशन टायगर’ तुर्तास फेल?
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे ‘ऑपरेशन टायगर’ तुर्तास फेल झाल्याचे वृत्त ‘एनडीटीव्ही मराठी’ या वृत्तवाहिनीने सूत्रांच्या हवाल्याने दिले. राज्यात गेल्या काही दिवसांपासून शिंदेसेनेच्या ऑपरेशन टायगरची जोरदार चर्चा होती. त्याद्वारे ठाकरे गटाकडे असलेल्या नऊपैकी एक तृतीयांश खासदार फोडण्याच्या हालचाली शिंदेसेनेकडून होत असल्याचे सांगितले जात होते. त्या संदर्भात उपमुख्यमंत्री शिंदे यांनी काही खासदारांची दिल्लीत बैठक घेतल्याचेही वृत्त काही प्रसारमाध्यमांनी दिले. मात्र, काही खासदारांनी शिंदे गटात विलीन होण्यास नकार दिल्यामुळे शिंदेसेनेचे ‘ऑपरेशन टायगर’ तुर्तास फेल गेल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. विशेष बाब म्हणजे, काही दिवसांपूर्वी भाजपानेही शिंदेंच्या ऑपरेशन टायगरला ब्रेक लावल्याचे वृत्त समोर आले होते. ठाकरेंच्या खासदारांना आपल्या गोटात खेचून केंद्रातील दोन मंत्रिपदे आपल्या पदरात पाडून घेण्याची शिंदे यांची तयारी होती. पण, या सगळ्याला भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी अचानक रेड सिग्नल दिल्याचे चर्चा रंगली होती.
संजय राऊत यांचा खळबळजनक दावा
कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांच्याबाबत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी खळबळजनक दावा केला. अमेरिकेतून भारतात येण्यापूर्वी अभिजीत दिपके यांची पंतप्रधान मोदींबरोबर बैठक झाली आणि त्याचे फोटो आपल्याकडे असल्याचा आरोप राऊत यांनी केला. आम्ही त्यांच्या भूमिकेला पाठिंबा दिला, मात्र जी काही माहिती या सगळ्यासंदर्भात समोर येत आहे, ती माध्यमांसमोर मांडणे आवश्यक आहे. कोणत्याही राजकीय पक्षाचा नेता त्या आंदोलनाला गेला नाही. तरुणांचे प्रश्न आणि तरुणांना आम्ही पाठिंबा दिला, असेही राऊत म्हणाले. दरम्यान अभिजीत दिपके यांनी संजय राऊत यांचा आरोप फेटाळून लावला असून तो एआयद्वारे तयार केला असल्याचे म्हटले आहे. पंतप्रधान मोदी यांना एवढी सुरक्षा असते. सहज जाऊन भेटणे अशक्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर
विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी केवळ आठवडाभराचा कालावधी शिल्लक असताना अमरावतीत काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद उफाळून आला. काँग्रेसचे उमेदवार हर्षजीत देशमुख हे रुग्णालयात दाखल झाल्यानंतर यशोमती ठाकूर यांनी ते ‘मॅनेज’ झाल्याचा आणि त्यांनी १५ ते २० कोटी रुपये घेतल्याची चर्चा असल्याचा गंभीर आरोप केला होता. त्यावर आता हर्षजीत देशमुख यांनी प्रत्युत्तर दिले आहे. मी कोणताही व्यवहार केला नाही, उलट माझी बदनामी करून अप्रत्यक्षपणे समोरच्या पक्षाला मदत करण्यासाठी आणि मला निवडणुकीत माघार घेण्यास भाग पाडण्यासाठी हे षडयंत्र रचले जात आहे, असा खळबळजनक गौप्यस्फोट हर्षजीत देशमुख यांनी केला. मी आजारी असताना, माझी कोणतीही चौकशी न करता किंवा मला भेटायला न येता परस्पर अशा प्रकारचे बिनबुडाचे आणि निराधार आरोप करणे अत्यंत लाजीरवाणे आहे, अशा शब्दांत त्यांनी यशोमती ठाकूर यांच्यावर टीका केली. त्यावर प्रतिक्रिया देताना ‘उल्टा चोर कोतवाल को डांटे,’ अशा शब्दांत यशोमती ठाकूर यांनी हर्षजीत देशमुख यांना टोला लगावला.
जयंत पाटील यांचा साताऱ्यातील राजेंना टोला
विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांच्या पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सातारा येथील राष्ट्रवादी भवनात पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेतून त्यांनी उदयनराजे भोसले आणि मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना चिमटा काढला. सातारा-सांगली विधानपरिषद मतदारसंघात भाजपच्या उमेदवार निवडीबाबत दोन्ही आग्रही होते, पण भाजपाने त्यांना विचारत न घेता उमेदवारी दिल्यामुळे त्यांचा स्वाभिमान दुखावला असेल असा माझा अंदाज आहे. असल्या गोष्टी खपवून घ्यायचा उदयनराजे भोसले यांचा स्वभाव नाही, असा टोला जयंत पाटील यांनी लगावला. शिंदेसेना व राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना भेटून त्यांना आम्हाला अडचणीत आणायचे नाही. मात्र, त्यांच्या समर्थकांनी सदसद्विवेकबुद्धीने ठाम भूमिका घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले. त्यांच्या या विधानाची जिल्ह्यात जोरदार चर्चा रंगली आहे.
