आजच्या महत्वाच्या राजकीय घडामोडी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार आपटावेच लागेल, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला.. शिवसेना शिंदे गटात लवकरच खांदेपालट होणार असून काही मंत्र्यांना डच्चू दिला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली… ठाकरे गटाच्या खासदाराने उपमुख्यमंत्री शिंदे यांच्याबरोबर एकाच गाडीतून प्रवास केल्याने राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आले… मुख्यमंत्री फडणवीस यांच्यात काही माणुसकीच राहिली नाही, अशी टीका करीत खासदार प्रणिती शिंदे यांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली… साडेतीन वर्षांच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या ‘नराधमाला हालहाल करून संपवा’, असा संताप राज ठाकरे यांनी व्यक्त केला… या सर्व घडामोडी सविस्तर जाणून घेऊ…

फडणवीसांचे सरकार आपटावेच लागेल, जरांगेंचा इशारा

राज्यात महिलांवरील अत्याचाराच्या वाढत्या घटनांवरून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी तीव्र संताप व्यक्त केला. जोपर्यंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकार सत्तेत आहे, तोपर्यंत राज्यात खून आणि अत्याचाराच्या घटना घडत राहणार आहेत. फडणवीस यांच्या सरकारचे काम राक्षसी वृत्तीने सुरू आहे, त्यामुळे हे सरकार आपटावेच लागेल, असा इशाराही त्यांनी दिला. मनोज जरांगे पाटील सोमवारी रात्री अकलूज येथील धनाजी साखळकर यांच्या निवासस्थानी आले होते. त्यावेळी माध्यमांशी त्यांनी संवाद साधला. राज्यातील वाढत्या गुन्हेगारीच्या घटनांना मुख्यमंत्री, गृहमंत्री जबाबदार असल्याचा ठपका मनोज जरांगे यांनी ठेवला. बीडमधील मस्साजोगचे सरपंच देशमुख यांची हत्या करणाऱ्या आरोपींना तुरुंगात एसी आणि मोबाईलची सेवा दिली जात असल्याचा गंभीर आरोपही जरांगे यांनी केला. या हत्याकांडातील आरोपी कोणाच्या आशीर्वादाने चैनीत आहेत, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

एकनाथ शिंदे मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत?

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत लवकरच खांदेपालट होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. दिवाळीआधी शिंदे गटातील काही नेत्यांना मंत्रिपदावरून डच्चू देऊन त्याऐवजी नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाणार असल्याची माहिती समोर आली. यापूर्वी अधिवेशन काळातही शिंदेसेनेतील काही आमदारांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या भेटीसाठी पत्र दिले होते. या पत्रात स्वपक्षीय मंत्र्यांबरोबर अनेक आमदारांनी उघडपणे नाराजी बोलून दाखवल्याची चर्चा होती. त्याचबरोबर स्वपक्षीय मंत्र्यांशिवाय आम्हाला तुमची भेट घ्यायची असल्याची इच्छाही त्यांनी शिंदे यांना लिहिलेल्या पत्रात व्यक्त केली होती. यादरम्यान उपमुख्यमंत्री शिंदे हे लवकरच मोठा निर्णय घेणार असून मंत्रिमंडळात फेरबदल करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. पक्ष संघटना न वाढवणाऱ्या मंत्र्यांना दिवाळीआधी घरचा रस्ता दाखवला जाऊ शकतो, तसेच राज्यमंत्रिपदावर असलेल्या काही मंत्र्यांची थेट कॅबिनेटमध्ये वर्णी लागू शकते, अशी माहितीही सूत्रांनी दिली आहे.

शिंदेंनी घेतली ठाकरे गटाच्या खासदाराची भेट

ठाकरे गटाच्या खासदाराने उपमुख्यमंत्री शिंदे यांच्याबरोबर एकाच गाडीतून प्रवास केल्याने राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आले. ठाकरेंचा हा शिलेदार लवकरच शिंदेसेनेत प्रवेश करणार असल्याचे कयास अनेकांनी बांधण्यास सुरुवात केली. मात्र, त्याबाबतची खरी माहिती समोर आल्यानंतर या चर्चांना पूर्णविराम मिळाला. ठाकरे गटाचे खासदार संजय दिना पाटील यांच्या पत्नीचा काही दिवसांपूर्वी अपघात झाला होता, त्यांच्यावर मुंबईतील एका रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांच्या पत्नीच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गेले होते. एकनाथ शिंदे निघाले तेव्हा त्यांच्या गाडीत संजय दिना पाटील बसले होते. एकनाथ शिंदे यांनी यापूर्वीही अनेकदा राजकीय संघर्ष विसरून विरोधी पक्षातील नेत्यांच्या भेटी घेतल्याची अनेक उदाहरणे आहेत. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आजारी असताना शिंदे यांनी आमदार सुनील राऊत यांना फोन करून त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली होती. आता त्यांनी संजय दिना पाटील यांची भेट घेऊन त्यांच्या पत्नीच्या प्रकृतीविषयी विचारपूस केल्याचे सांगितले जात आहे.

देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी

मुख्यमंत्री फडणवीस यांच्यात काही माणुसकीच राहिली नाही, अशी टीका करीत काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. काही दिवसांपासून राज्यात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथे साडेतीन वर्षांच्या चिमुकलीवर एका नराधमाने अत्याचार करून तिची निर्घृणपणे हत्या केली. तसेच, सोलापुरात तीन दिवसांत १० जणांची हत्या झाल्याची घटना समोर आली. याच मुद्द्याला हाताशी धरून खासदार प्रणिती शिंदे यांनी मुख्यमंत्री फडणवीसांना लक्ष्य केले. सोलापूरसह संपूर्ण राज्याची कायदा आणि सुव्यवस्था बिघडली आहे, त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून गृहमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.

नसरापूर प्रकरणावर राज ठाकरेंचा संताप

साडेतीन वर्षांच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या ‘नराधमाला हालहाल करून संपवा’, असा संताप मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केला. पुणे जिल्ह्यातील नसरापूर परिसरात साडेतीन वर्षांच्या चिमुकलीवर एका व्यक्तीने अत्याचार करून तिची हत्या केली. या घटनेने पुण्यासह संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी समाजमाध्यमावर पोस्ट शेअर करीत या घटनेवर निषेध केला. अशा गुन्ह्यांमध्ये कायदेशीर प्रक्रियेची वाट पाहण्याऐवजी कठोर आणि तातडीची कारवाई व्हायला हवी. आरोपीने केवळ एका निरागस जीवावर अत्याचार केला नाही, तर समाजाच्या मनावर खोल जखम केली आहे. त्यामुळे अशा गुन्हेगारांना धडा शिकवण्यासाठी कठोर शिक्षा आवश्यक असल्याचे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केले. या प्रकरणातील आरोपीला सरकारने कायदा काय सांगतो किंवा अजून कोण काय म्हणेल याचा विचार न करता हालहाल करत संपवावे, असेही राज ठाकरे म्हणाले. ज्या महाराष्ट्राने देशाच्या स्त्री शिक्षणाचा, स्त्री सक्षमीकरणाचा पाया घातला त्या महाराष्ट्रात अशा घटना वारंवार का घडत आहेत याचा थोडा सर्वांगीण विचार व्हायला हवा की नको? असा प्रश्नही त्यांनी पोस्टमधून उपस्थित केला.