आजच्या महत्वाच्या राजकीय बातम्या : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर अत्यंत आक्रमक शब्दांत टीका केली… शिंदेसेनेच्या मंत्र्याने केलेल्या सूचक विधानानंतर राज्यात ऑपरेशन टायगरची पुन्हा चर्चा रंगली असून ठाकरेंचे आमदार फुटणार असल्याची कुजबूज सुरू झाली… मनोज जरांगे यांनी पुन्हा उपचार घेण्यास नकार देऊन टोकाचे पाऊल उचलू नये, असे आवाहन मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे यांनी केले… शिवसेना ठाकरे गटाचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी आज केलेल्या एका गौप्यस्फोटामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली… मंत्री गुलाबराव पाटील यांनी आरक्षणाच्या प्रश्नाबाबत बोलताना कुणाच्या ताटातले घेऊ नये, हक्कावर गदा आल्यास ओबीसीही शांत बसणार नाही, असे वक्तव्य केले… या सर्व घडामोडी सविस्तर जाणून घेऊ…
मनोज जरांगेंची शिंदे-फडणवीसांवर टीका
मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा अंतरवाली सराटीत उपोषण सुरू केले. आज त्यांच्या उपोषणाला आठ दिवस पूर्ण झाले असून याबाबत सरकारकडून तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे समजते. यादरम्यान माध्यमांशी संवाद साधताना जरांगे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर अत्यंत आक्रमक शब्दांत हल्लाबोल केला. माझ्या नादी लागू नका, तुम्हाला लय महागात पडेल. फडणवीसांनी महाराष्ट्र सोडून जाताना काडी लावून जाऊ नये. तसेच मराठ्यांना मुंबईत येण्यापासून रोखण्याच्या भानगडीत सरकारने पडू नये, असा इशारा जरांगे यांनी दिला. उपोषणादरम्यान प्रकृती स्थिर असली तरी जरांगे यांनी उपचारांवर बहिष्कार टाकण्याचे संकेत दिले. मराठ्यांचे प्रश्न सुटेपर्यंत मला सरकारकडून दिली जाणारी सलाईन आणि पाणीही नको. दोन-तीन दिवस झाले, आता आम्ही आरपारच्या भूमिकेत आहोत, असेही ते म्हणाले.
शिवसेना ठाकरे गटाचे आमदारही फुटणार?
शिवसेना नाव आणि पक्षचिन्ह याबाबत सर्वोच्च न्यायालयात अंतरिम सुनावणी सुरू असतानाच राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा ऑपरेशन टायगरची चर्चा रंगू लागली आहे. त्याबाबतचे संकेत मंत्री गुलाबराव पाटील आणि उदय सामंत यांनी नुकतेच दिले होते; तर शिवसेनेतील एकदेखील आमदार फुटणार नाही, असा विश्वास ठाकरेंच्या शिवसेनेतील आमदारांनी व्यक्त केला होता. यादरम्यान शिंदेसेनेचे मंत्री भरत गोगावले यांनी सांगोल्यातील मेळाव्यात केलेल्या पुन्हा याच मुद्द्याचा पुनरुच्चार केला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राजकीय ऑपरेशन करतात ते कुणालाही कळत नाही. तसेच राज्यात लवकरच दुसरे एक ऑपरेशन होईल. याबाबत आताच सांगत नाही, नाहीतर माध्यमांना त्याची कल्पना मिळेल, असे वक्तव्य गोगावले यांनी केले आहे. त्यांच्या या विधानानंतर ठाकरे गटाचे १४ आमदार फुटणार असल्याची कुजबूज राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. त्यामुळे या राजकीय घडामोडींकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे.
“मनोज जरांगेंनी टोकाचे पाऊल उचलू नये”
मनोज जरांगे यांनी पुन्हा उपचार घेण्यास नकार देऊन टोकाचे पाऊल उचलू नये, असे आवाहन मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे यांनी केले. मराठा आरक्षणाच्या प्रश्नाबाबत जरांगे पाटील यांनी केलेल्या सर्व मागण्यांची दखल राज्य सरकारने घेतली आहे. न्यायालयीन प्रक्रियेत सर्व निर्णय टिकावेत म्हणून कायदेशीर बाबी तपासून त्यावर कार्यवाही सुरू करून त्यांना आश्वासित केले आहे, असेही त्यांनी नमूद केले. प्रवरानगर येथे माध्यमांशी संवाद साधताना मंत्री विखे म्हणाले की, अंतरवाली सराटी येथे जाऊन जरांगे पाटील यांच्या प्रत्येक मागण्यांवर सरकारने त्यांच्याशी चर्चा केली आहे. प्रशासकीय स्तरावर त्याची प्रक्रियाही सुरू झाली असून, निवृत्त न्यायमूर्ती शिंदे यांच्या दौऱ्यांचे नियोजनही करण्यात आले आहे. या माध्यमातूनही जात प्रमाणपत्रांच्या अडचणी दूर करण्यात उपलब्धता होईल. त्यामुळे मी जरांगे पाटील यांना पुन्हा विनंती करतो की टोकाचे पाऊल उचलू नये. ओबीसींच्या आरक्षणाला कुठेही धक्का लागणार नाही, त्यांच्या कुठलीही योजना बंद होणार नाही, हीच आमची भूमिका आहे, असेही विखे यांनी स्पष्ट केले.
संजय राऊत यांचा सनसनाटी गौप्यस्फोट
शिवसेना ठाकरे गटाचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी आज केलेल्या एका गौप्यस्फोटामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली. तुरुंगवासात असताना माझ्यावर विषप्रयोग झाला असण्याची शक्यता आहे, असे वक्तव्य राऊत यांनी केले. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांनीही आपल्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त करून लवकरात लवकर टॉक्सिकॉजली टेस्ट करण्याचा सल्ला दिला आहे, असे त्यांनी सांगितले. या संदर्भात माहिती देताना राऊत म्हणाले की, सुमारे १० दिवसांपूर्वी दिल्लीमध्ये माझी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यासोबत भेट झाली. त्यावेळी त्यांनी माझ्या प्रकृतीची विचारपूस केली. तेव्हा मी तुरुंगवासात असतानापासूनच माझी प्रकृती बिघडायला सुरुवात झाली होती, असे त्यांना सांगितले. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर प्रकृती बिघडलेला मी काही एकटा माणूस नाही. काही इतर नेत्यांची प्रकृतीसुद्धा तुरुंगातून बाहेर आल्यानंतर बिघडली आहे. अशा प्रकरणांची चौकशी होण्याची आवश्यकता आहे. यादरम्यान राऊत यांनी केलेल्या या दाव्याला स्वतंत्रपणे दुजोरा मिळू शकलेला नाही.
आरक्षणाबाबत गुलबाराव पाटील काय म्हणाले?
मराठा समाजाला कुणबी नोदींच्या आधारे प्रमाणपत्र मिळावे, या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषण सुरू केले. आज त्यांच्या उपोषणाचा आठवा दिवस असून याबाबत सरकारकडून तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरू आहे. या आंदोलनाच्या संदर्भात मंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ओबीसींच्या हक्कावर गदा आली तर, ओबीसी देखील शांत बसणार नाही. आपल्या हक्काचे घ्यावे, कुणाच्या ताटातले घेऊ नये अशी ओबीसींची भूमिका असल्याचं मत त्यांनी व्यक्त केले आहे. राज्य सरकार मराठा आरक्षणाबाबत सकारात्मक आहे, मागच्या काळात देखील एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असताना त्यांनी दहा टक्के आरक्षण देऊ केले होते. आतादेखील सरकार सकारात्मक आहे. सध्या सण उत्सवांचा काळ असल्याने शांततेच्या मार्गाने सरकारकडे मागणी करावी असे आवाहनही त्यांनी मनोज जरांगे पाटील यांना केले आहे.
