आजच्या महत्वाच्या राजकीय घडामोडी : “मी कोणाकडून एक रुपयाही घेतल्याचे दाखवून द्या… तसे आढळल्यास उद्या सकाळीच फाशी घेतो,” असे विधान मनोज जरांगे पाटील यांनी केले… राष्ट्रवादी काँग्रेसला उद्देशून केलेल्या विधानावरून उपमुख्यमंत्री शिंदे यांनी मंत्री शिरसाट यांची कानउघडणी केल्याची माहिती सूत्रांनी दिली… घरी बोलावून त्यांना मंत्रिपद दिले ही माझीच चूक झाली, असा प्रहार माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आमदार बच्चू कडूंवर केला… विधान परिषदेच्या सातारा-सांगली स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत जयंत पाटील यांचा गट फुटणार असल्याचा दावा भाजपा आमदाराने केला… राज्यातील खाकी यंत्रणा ही खादी घातलेल्या लोकांच्या इशाऱ्यावर काम करत असल्याचा असल्याची टीका शरद पवार गटाच्या नेत्याने केली. या सर्व घडामोडी सविस्तर जाणून घेऊ…

प्रसाद लाड यांनी घेतली जरांगेची भेट

भाजपाचे आमदार प्रसाद लाड यांनी आज मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची अंतरवाली सराटी येथे भेट घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये मराठा समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांवर आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर महत्त्वपूर्ण चर्चा झाली. या भेटीदरम्यान मनोज जरांगे यांनी विद्यार्थ्यांची अडकलेली शिष्यवृत्ती आणि आंदोलकांवर झालेला लाठीचार्ज या मुद्द्यांवरून महायुती सरकारला लक्ष्य केले. आम्ही मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्रांना काही वाईट बोललो का? मग अंतरवाली सराटीत लाठीमार का करण्यात आला होता? आम्ही पैशाने किंवा पदाने फुटत नाही… मी कोणाकडून एक रुपयाही घेतल्याचे दाखवून द्या… तसे आढळल्यास उद्या सकाळीच फाशी घेतो, असे खुले आव्हान जरांगे यांनी लाड यांना दिले. त्यावर मी फक्त मराठा समाजाचा कार्यकर्ता म्हणून तुमची भेट घेण्यासाठी आलो आहे. कृपया आपण आंदोलन मागे घ्यावे, मराठ्यांच्या मागण्या पूर्ण न झाल्यास मी स्वत:हून आमदारकीचा राजीनामा देईन, अशी विनंती लाड यांनी केली. त्यामुळे जरांगे यांच्या भूमिकेकडे सगळ्या राज्याचे लक्ष लागून आहे.

शिंदेंकडून शिरसाट यांची कानउघडणी?

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील सत्ताधारी महायुतीतील तिन्ही घटक पक्षांमध्ये अंतर्गत धुसफूस सुरू असल्याचे चित्र आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसचे काही आमदार फुटणार असून ते आमच्या संपर्कात असल्याचा दावा शिंदे गटाचे मंत्री संजय शिरसाट यांनी केला होता. त्यांच्या या विधानामुळे महायुतीत चांगलीच खळबळ उडाली होती. त्याबाबत राष्ट्रवादीच्या नेत्यांनी तीव्र आक्षेप नोंदवत उघडपणे नाराजी व्यक्त केली. यादरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतल्याचे सूत्रांनी सांगितले. महायुतीत फूट पडेल अशी विधाने करू नका… आपल्या तिन्ही मित्रपक्षांना एकत्र घेऊन सरकार चालवायचे आहे, अशा शब्दात शिंदे यांनी मंत्री शिरसाट यांची कानउघडणी केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

उद्धव ठाकरेंचा बच्चू कडूंवर प्रहार

प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक बच्चू कडू यांनी नुकताच त्यांचा पक्ष उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत विलीन केला. त्यानंतर शिंदे गटाने त्यांना बक्षीस म्हणून विधान परिषदेची उमेदवारीही दिली. या राजकीय घडामोडीवर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली. घरी बोलावून त्यांना मंत्रिपद दिले ही माझीच चूक झाली… लोभापायी गेलेत ते जाऊ द्या, असा प्रहार ठाकरे यांनी बच्चू कडू यांच्यावर केला. आज, सोलापूर, परभणी आणि धाराशिवमधील प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शिवसेना ठाकरे गटात जाहीर प्रवेश केला. या प्रवेशानंतर माध्यमांशी संवाद साधताना उद्धव ठाकरे यांनी बच्चू कडू यांना लक्ष्य केले. यादरम्यान त्यांच्या या टीकेला आमदार कडू काय उत्तर देणार, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

गोपीचंद पडळकर यांचा खळबळजनक दावा

विधान परिषदेच्या सातारा-सांगली स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांचा गट फुटणार, असा खळबळजनक दावा भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला. दिवा विझताना जसा मोठा होतो, तशीच जयंत पाटील यांची अवस्था झाली आहे, अशी टीकाही त्यांनी केली. सांगली जिल्हा बँकेच्या विविध विषयावरून आमदार पडळकर यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ते बोलत होते. सांगली महानगरपालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे दोन नगरसेवक भाजपामध्ये आलेत. यापुढेही अनेक गट जयंत पाटील यांची साथ सोडतील, असे पडळकर म्हणाले. कर्नाटकातील एका कारखान्याचे महाराष्ट्रात ऑफिस दाखवून त्यांना कर्ज देता, खासदार विशाल पाटील यांना कर्ज का देण्यात आले? पूर्वी थकीत असताना २७० कोटी कर्ज कसे देता? हे सारे प्रकार चौकशीत उघड होणार असल्यामुळे पळवाट शोधायला ते न्यायालयात गेले आहेत. जयंत पाटील यांचा पावडर लावलेला चेहरा उघडा पडणार आहे. रामाच्या मंदिरात हा रावण राहतो, हे लोकांच्या लक्षात येईल, अशी टीका पडळकर यांनी केली.

शशिकांत शिंदे यांचा महायुतीवर आरोप

शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते विकास लवांडे यांना गुरुवारी पोलिसांनी अटक केली. त्यांच्या या अटकेचा तीव्र निषेध करताना राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी राज्यातील पोलीस यंत्रणेसह महायुती सरकारला लक्ष्य केले. राज्यातील खाकी यंत्रणा ही खादी घातलेल्या लोकांच्या इशाऱ्यावर काम करत असल्याचा आरोप शिंदे यांनी केला. माध्यमांशी संवाद साधताना शिंदे म्हणाले की, राज्यात लोकशाहीची गळचेपी सुरू आहे. ज्या संग्राम भंडारे यांच्याविरोधात गुन्हा दाखल आहे, त्यांना अटक होत नाही. मात्र विकास लवांडे यांच्यावर तातडीने कारवाई केली जाते. पोलीस यंत्रणा ही वरच्या आदेशावर काम करत असल्याचे दिसत आहे. लवांडे यांना कोणतीही नोटीस न देता न्यायालयाच्या परिसरातून ताब्यात घेण्यात आले. ज्या पद्धतीने त्यांच्यावर कठोर कलमे लावण्यात आली, त्याच प्रकारे महापुरुषांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्यांवर कारवाई होणार का? असा प्रश्नही शिंदे यांनी उपस्थित केला.