संतोष प्रधान

राज्य मंत्रिमंंडळाच्या विस्ताराकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट आणि भाजपमधील आमदारांचे डोळे लागले आहेत. भाजपमध्ये दिल्लीतच निर्णय होणार असला तरी शिंदे गटातील बहुसंख्य आमदारांची मंत्रिपद मिळावे ही इच्छा लपून राहिलेली नाही.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शिवसेनेतील ४० आमदारांनी पाठिंबा दिला. त्यात शिवसेनेच्या सात मंत्र्यांचा समावेश होता. शिंदे गटात प्रवेश करताना या मंत्र्यांनी आपल्याला पुन्हा मंत्रिपद मिळावी ही अपेक्षा व्यक्त केली होती व त्यानुसार शिंदे यांनी त्यांना आश्वासन दिल्याचे समजते. एकनाथ शिंदे यांच्यासह संदीपान भुमरे, दादा भुसे, गुलाबराव पाटील, उदय सामंत, अब्दुल सत्तार आणि शंभुराज देसाई या सात माजी मंत्र्यांनी शिंदे यांना साथ दिली होती. पैकी सत्तार व देसाई हे राज्यमंत्री होते. त्यांना आता कॅबिनेट मंत्री म्हणून बढतीची अपेक्षा आहे.

भाजपबरोबर युतीत शिंदे गटाला किती मंत्रिपदे येतात हे अद्याप तरी जाहीर झालेले नाही. मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात याबाबत चर्चा झाली असावी. कदाचित शिंदे व फडणवीस यांच्या नवी दिल्ली भेटीनंतर मंत्र्यांची संख्या आणि खातेवाटपावर शिक्कामोर्तब केले जाईल. शिंदे गटातील बहुतांश आमदारांना आपण मंत्री व्हावे असे वाटत असल्याने युतीत जास्तीत जास्त मंत्रिपदे मिळावीत, असा शिंदे यांचा प्रयत्न असेल. पण मुख्यमंत्रीपद शिंदे यांच्याकडे असल्याने जास्तीत जास्त मंत्रिपदे घेण्यावर भाजपचा भर असेल. 

उद्धव ठाकरे सरकारमधील नऊ जणांनी शिंदे यांना साथ दिली. त्यातील सात शिवसेनेचे तर बच्चू कडू आणि राजेंद्र येड्रावरकर हे अपक्ष आहेत. या नऊ जणांना पुन्हा संधी दिल्यास शिंदे गटातील किती जणांना संधी मिळते हा प्रश्न आहेच. शिंदे यांच्या गटातील ठाण्यातील एक आमदार मंत्रिपदासाठी प्रयत्नशील आहे. मराठवाड्यातील दोघांना मंत्रिपद मिळावे, असे वाटते. रायगडमधील शिवसेनेच्या तिन्ही आमदारांनी शिंदे यांना साथ दिली. भरत गोगावले हे आता मुख्य प्रतोद आहेत. यामुळे गोगावले यांना संधी मिळू शकते. कोकणातील उदय सामंत यांनी शिंदे यांना साथ दिली. त्यामुळे त्यांची वर्णी लागू शकते. दीपक केसरकर यांनी शिंदे गटाची बाजू सत्तानाट्याच्या काळात प्रभावीपणे मांडली. त्यांच्या नावाचा विचार होऊ शकतो. उत्तर महाराष्ट्रातून गुलाबराव पाटील यांचे मंत्रिपद नक्की मानले जाते.

किती मंत्रिपदे वाट्याला येतात यावरच शिंदे गटाचे सारे गणित अवलंबून असेल. मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर शिंदे गटातही नाराजीचे सूर उमटू शकतात. यातूनच मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर सरकार कोसळण्याची प्रक्रिया सुरू होईल, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केली होती. तसेच या अंतर्गत मतभेदातून हे सरकार जास्त काळ टिकणार नाही, असे भाकीत पवार यांनी व्यक्त केले.