scorecardresearch

पश्चिम वऱ्हाडात मंत्रिपदावर कुणाची वर्णी?

अकोला, वाशीम व बुलढाणा जिल्ह्यातून अनेक इच्छुक आमदारांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

Eknath Shinde

प्रबोध देशपांडे

नव्या शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळात स्थान मिळण्यासाठी पश्चिम वऱ्हाडातील सत्ताधारी पक्षांच्या आमदारांमध्ये चढाओढ लागली आहे. अकोला, वाशीम व बुलढाणा जिल्ह्यातून अनेक इच्छुक आमदारांनी मोर्चेबांधणी सुरू केली. या भागातून भाजपसह शिंदे गटाकडूनही प्रबळ दावेदार आहेत. त्यामुळे मंत्रिमंडळात कुणाला संधी मिळणार? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

एकनाथ शिंदे व शिवसेना आमदारांच्या बंडखोरीच्या राजकीय नाट्यानंतर अखेर महाराष्ट्रात नवे सरकार अस्तित्वात आले आहे. अनपेक्षितपणे मुख्यमंत्री पदावर एकनाथ शिंदे, तर उपमुख्यमंत्री पदी देवेंद्र फडवणीस विराजमान झाले. आता मंत्रिमंडळावरून चर्चा सुरू झाली आहे. मंत्रिमंडळात वर्णी लागण्यासाठी इच्छुकांची मोठी गर्दी आहे. त्यातून मंत्रिमंडळ निवडतांना नेत्यांसह पक्षांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे. पश्चिम वऱ्हाडातील अकोला, वाशीम व बुलढाणा जिल्ह्यांत भाजपचे नऊ, तर शिवसेनेचे तीन आमदार आहेत. शिवसेनेच्या तीनपैकी बुलढाणा जिल्ह्यातील दोन आमदार शिंदे गटासोबत गेले. त्यामुळे भाजप व शिंदे गटाकडून मंत्रिपदासाठी दावेदार आहेत. अकोला जिल्ह्यात फडणवीस सरकारच्या कार्यकाळात पदवीधर मदारसंघाचे आमदार डॉ. रणजीत पाटील यांना गृहराज्यमंत्री पद मिळाले होते. पूर्ण पाच वर्ष जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची देखील जबाबदारी त्यांच्यावर होती. ‘मविआ’ सरकारमध्ये अकोला जिल्ह्याला मंत्रिमंडळात प्रतिनिधित्व न मिळाल्याने बच्चू कडूंकडे अडीच वर्षे पालकमंत्री पद होते. आता नव्या सरकारमध्ये अकोला जिल्ह्यातून अकोला पूर्वचे आमदार तथा भाजप जिल्हाध्यक्ष रणधीर सावरकर यांचे नाव चर्चेत आहे. अभ्यासू आमदार म्हणून त्यांची ओळख असून देवेंद्र फडणवीसांचे देखील ते निकटवर्तीय आहेत. कॅबिनेट किंवा राज्यमंत्री पदावर त्यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातून अनेक वर्षांपासून विधानसभेत प्रतिनिधित्व करणारे आ.गोवर्धन शर्मा, आ. प्रकाश भारसाकळे, आ. हरीश पिंपळे यांच्या नावाचा विचार होऊ शकतो. फडणवीस सरकारच्या कार्यकाळातील मंत्र्यांना पुन्हा संधी देण्याचा विचार झाल्यास डॉ. रणजीत पाटील यांचे देखील नाव समोर येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

बुलढाणा जिल्ह्यातील मेहकरचे शिवसेना आमदार डॉ. संजय रायमुलकर व बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड हे सुरुवातीपासून एकनाथ शिंदे यांच्यासोबत बंडात सहभागी झाले. विविध वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत राहणारे संजय गायकवाड यांची पहिलीच टर्म आहे. त्यामुळे त्यांना संधी मिळण्याची शक्यता अत्यल्प आहे. डॉ. संजय रायमुलकर यांची महाविकास आघाडी सरकारमध्ये १३ जानेवारी २०२१ मध्ये पंचायतराज समितीच्या प्रमुखपदी त्यांची वर्णी लागली. मात्र, त्यांना मंत्रिपदाची अपेक्षा असल्याने ते नाराज असल्याची चर्चा होती. त्यातच त्यांनी अगदी सुरुवातीपासून एकनाथ शिंदे यांना साथ दिली. त्यामुळे आता नव्या सरकारमध्ये त्यांना मंत्रिपद मिळण्याची आशा आहे. बुलढाणा जिल्ह्यात माजी मंत्री डॉ. संजय कुटे, जिल्हाध्यक्ष आ. ॲड. आकाश फुंडकर, आ.श्वेता महाले हे तीन भाजपचे आमदार आहेत. सत्तापरिवर्तनात डॉ. संजय कुटे यांनी महत्त्वाची जबाबदारी पार पाडली. शिवाय ते देवेंद्र फडणवीसांच्या निकटवर्तीयांपैकी एक असल्याने त्यांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडणार असल्याचे जवळपास निश्चित समजले जात आहे. बुलढाणा जिल्ह्याला दोन मंत्रिपद मिळण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही. वाशीम जिल्ह्याला गेल्या १० वर्षांपासून मंत्रिपद मिळाले नाही. आता शिंदे सरकारमध्ये कारंजाचे आमदार राजेंद्र पाटणी यांच्या नावाची राज्यमंत्री पदासाठी चर्चा सुरू आहे. धक्कातंत्राचा वापर करणारा भाजप कुणाला संधी, तर कुणाला धक्का देणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण ( Politics ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Many mlas from western vidarbha wants to become minister in eknath shindes cabinet print politics pkd