छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर शहरानजीक असणाऱ्या पळशी या गावी प्रचारासाठी आलेल्या रावसाहेब दानवे यांना मराठा आरक्षणाची मागणी करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले. त्यामुळे दानवे यांना प्रचार न करता परतावे लागले. फुलंब्रीचे आमदार हरिभाऊ बागडे हेही त्यांच्यासमवेत होते. रावसाहेब दानवे, पंकजा मुंडे, अशोक चव्हाण,त्यांच्या पत्नी अमिता चव्हाण प्रकाश सोळंके, रमेश आडसकर, अशा भाजप नेत्यांना अडवून त्यांच्यासमोर ‘ एक मराठा लाख मराठा’ अशी घोषणा बाजी करण्यात आली. एका बाजूला मराठा समाजाच्या रोषाला सामोरे जात असताना रावसाहेब दानवे यांनी पिसादेवी येथे केलेल्या भाषणा दरम्यान बऱ्याच खुर्च्या रिकाम्या असल्याचे चित्र दिसून आले.

अलीकडेच पंकजा मुंडे यांना माजलगाव तालुक्यातील लऊळ या गावी आरक्षण आंदोलक समर्थकांनी घेराव घातला होता. बीड लोकसभेतील पंकजा मुंडे यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार बजरंग सोनवणे यांचा कारखाना असणाऱ्या केज तालुक्यातील औरंगपूर गावातही पंकजा मुंडे यांच्यासमोर मराठा आंदोलकांनी घोषणाबाजी केली होती. तत्पूर्वी शिरुर तालुक्यातील खालापूरी गावात त्यांच्या गाड्याचा ताफा अडवला होता. याशिवाय प्रकाश सोळंके, रमेश आडसकर यांनाही आंदोलक कार्यकर्त्यांनी प्रचार करताना थांबवले होते. पहिल्या टप्प्यातील निवडणुकांमध्ये भाजपमध्ये गेल्यानंतर राज्यसभेवर निवडून आलेल्या खासदार अशोक चव्हाण यांना अर्धापूर तालुक्यातील कोंढा या गावी प्रचार करण्यापासून रोखले होते. त्यांच्या पत्नी अमिता यांना महाळकौठा या गावी मराठा आंदोलकांना सामोरे जावे लागले होते. मराठवाड्यात सत्ताधारी भाजप विरोधातील रोष प्रचारा दरम्यान व्यक्त करण्यात मराठा समाजाचे कार्यकर्ते पुढाकार घेत आहेत. ७ मे रोजी होणाऱ्या मतदानापूर्वी पुन्हा एकदा आंदोलक एकवटले असल्याचे चित्र आहे. लातूर आणि उस्मानाबाद या दोन लोकसभा मतदारसंघात मात्र आरक्षण आंदोलनातील रोष दिसून आला नव्हता. मात्र, लातूर जिल्ह्यातील निवडणुकीला लिंगायत मतपेढीचे संदर्भ जोडले गेलेले आहेत.

हेही वाचा…अमेठी, रायबरेली आणि वायनाडबाबतच्या निर्णयातून काँग्रेसला नेमके काय साधायचे आहे?

जालना जिल्ह्यातील माऊजपुरी या गावात मारुतीची शपथ घेऊन मराठा जातीशिवाय अन्य कोणालाही मतदान न करण्याची शपथ देण्यात आली आहे. अशा घटना अनेक गावात घडू लागल्या आहेत.

हेही वाचा…“सरकारे येत-जात राहतील, पण देश वाचला पाहिजे”, अजरामर ठरलेलं हे भाषण वाजपेयींनी केव्हा केलं होतं? काय होती राजकीय परिस्थिती?

गर्दीअभावी रावसाहेबांची सभा अडीच तास लांबली

गर्दीअभावी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची जाहीरसभा अडीच तास लांबली. पिसादेवी येथे शनिवारी सायंकाळी ७ वाजता आयोजित केलेल्या सभास्थळी रात्री नऊपर्यंत अर्ध्यावर खुर्च्या रिकाम्याच होत्या. त्यानंतर ९.३५ वाजता रावसाहेब दानवे आले आणि ९.४० ते रात्री १० पर्यंत त्यांनी भाषण केले. तत्पूर्वी ९ वाजता ज्येष्ठ नेते हरिभाऊ बागडे यांनी येऊन भाषणाला सुरुवात केली होती. पिसादेवी हे रावसाहेबांचे निवडणुकीतील प्रतिस्पर्धी काँग्रेस नेते डॉ. कल्याण काळे यांचे गाव आहे. डॉ. काळेंच्या मैदानात रावसाहेबांसाठी खास स्थानिक भाजप पदाधिकाऱ्यांनी आयोजित केलेल्या सभेला किती गर्दी जमते आणि ते काय बोलतात, याविषयी ग्रामस्थांमध्ये उत्सुकता होती. जवळपास २० ते २२ हजार लोकसंख्येच्या या गावातील स्मशानभूमीजवळील पुलाच्या एका लहानशा कोपऱ्याचा भाग सभेसाठी निवडला होता. मात्र, त्यातही लोक जमवण्यासाठी स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या नाकेनऊ आले. बरीच कसरत केल्यानंतर जेमतेम २५० च्या आसपास श्रोतेच खुर्च्यांवर होते.

Story img Loader