छत्रपती संभाजीनगर : लिंगायत मतांवर प्रभाव असणाऱ्या बसवराज पाटील यांना भारतीय जनता पक्षाने लातूर – बीड – उस्मानाबाद मतदारसंघातून उमदेवारी दिली आहे. तर छत्रपती संभाजीनगर – जालना मतदारसंघातून माळी समाजास आणखी एक प्रतिनिधीत्व देण्यात आले आहे. या मतदारसंघातून सुहास शिरसाट यांना उमेदवारी देण्यात आली आहे. नांदेडमधून अमरनाथ राजूकर यांना उमेदवारी मिळाल्यानंतर ‘ बाहेरुन येणाऱ्यांना प्राधान्य ’ हे सूत्र राखले जात असल्याची प्रतिक्रिया उमटू लागली आहे. बसवराज पाटील आणि अमरनाथ राजूकर या दोघांनी पूर्वी काँग्रेसमध्ये काम केले आहे. तर सुहास शिरसाट हे राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये आले आहेत. या निवडीच्या पा्र्श्वभूमीवर ‘ निष्ठावंत ’ भाजपचा कार्यकर्ता पुन्हा एकदा दुखावला गेला आहे.
काँग्रेसचे दिवंगत नेते शिवराज पाटील चाकुरकर यांचे मानसपूत्र अशी उमरगा तालुक्यातील बसवराज पाटील यांची ओळख कायम होती. जिल्हा परिषदेमध्ये उपाध्यक्ष पदापासून राजकीय कारकीर्द असणारे बसवराज पाटील हे उमरगा आणि औसा या मतदारसंघातून निवडून येत. या दोन्ही मतदारसंघात लिंगायत मतांचा प्रभाव अधिक. वागण्या – बोलण्यातील कमालीचे सौम्य असणाऱ्या बसवराज पाटील यांनी शिवराज पाटील चाकुरकर यांच्या परवानगीने ‘ भाजप ’ मध्ये प्रवेश केला. गेले काही दिवस भाजपमध्ये काम केल्यानंतर बसवराज पाटील यांना उमेदवारी मिळू शकते ,असा दावा त्यांचे समर्थक करत होते. ‘ लिंगायत मतांवर ’ प्रभाव निर्माण करु शकणाऱ्या बसवराज पाटील यांना उमेदवारी मिळाली परिणामी उस्मानाबाद – बीड – लातूर मतदारसंघातील बसवराज मंगरुळे यांचा पत्ता कटला.
अशोक चव्हाण यांची सावलीसारखी पाठराखण करणारे अमरनाथ राजूरकर यांनाही भाजपने उमेदवारी उमेदवारी दिली आहे. त्यामुळै नांदेड भाजपचे राजकारण आता पूर्णत: अशोक चव्हाण यांच्याकडे सुपूर्द करण्यात आल्याचा संदेश या उमेदवारीच्या निमित्ताने दिला गेला आहे. ते मराठवाड्यातील एकमेव ब्राम्हण उमेदवार आहेत. यामुळे नांदेडमधून उमेदवारी मागणारे चैतन्य बापू देशमुख आणि धाराशिवचे दत्ता कुलकर्णी यांना मात्र, पुन्हा वाट पहावी लागणार आहे.
छत्रपती संभाजीनगर – जालना मतदारसंघात मात्र नव्या चेहऱ्याला उमेदवारी दिली आहे. सुहास शिरसाट हे फुलंब्री तालुक्यात काही वर्षापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काम करत. त्यांच्या आई पार्वताबाई शिरसाट पंचायत समितीमध्ये सभापती होत्या. छगन भुजबळ यांच्या समवेत काम करणारे सुहास शिरसाट हे मध्ये भाजपमध्ये आले. दहा वर्षापासून काम करणाऱ्या शिरसाट यांना अचानक उमेदवारी मिळाल्याने रांगेत असणाऱ्या शहरी नेत्यांना चपराक बसल्याचे मानले जात आहे. फुलंब्री या मतदारसंघावर हरिभाऊ बागडे यांची पकड आहे. या मतदारसंघातील शिरसाट यांना भाजपने उमदेवारी दिली आहे. राज्यसभेची उमेदवारी देतानाही धनगर समाजातील रामराव वडकुते यांना प्राधान्य देण्यात आले होते. जातीय गणितांचे सूत्र मांडून भाजपने मराठवाड्यातील मूळ भाजपच्या कार्यकर्त्यांना ‘ अजून वाट पहा’ असाच संदेश दिला आहे. यातील दत्ता कुलकर्णी यांनी समाजमाध्यमात निष्ठावंतास डावल्याबाबत मजकूर लिहिला होता. मात्र, त्यांच्याशी संपर्क साधला असता, आपण नाराज नाही. जिल्हाध्यक्ष म्हणून बसवराज पाटील यांचा उमेदवारी अर्ज भरण्यास हजर राहणार असल्याचे सांगितले.
