छत्रपती संभाजीनगर : मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर विधानसभेवेळी मराठा प्राबल्य राखणाऱ्या भाजपने विधान परिषद निवडणुकीतून पुन्हा एकदा ओबीसी कार्ड वापरत नव्या बांधणीचे संकेत दिले आहेत.
छत्रपती संभाजीनगर – जालना मतदारसंघातून विजयी झालेले सुहास शिरसाठ हे माळी समाजाचे प्रतिनिधित्व करतात. नांदेडमधून निवडून आलेले अमर राजूरकर हे ब्राह्मण आणि लातूर-बीड-धाराशिव मधून निवडून आलेल्या बसवराज पाटील यांचा लिंगायत मतांवर मोठा प्रभाव आहे. महायुतीमध्ये शिवसेनेच्या वतीने सईद खान यांना उमेदवारी दिल्याने राजकीय पटावर पक्ष बांधणीचे हे नवे संकेत असल्याचे मानले जात आहे.
मराठवाड्यातील विधान सभा आणि विधान परिषदेवर मिळून भाजपचे २३ आमदार आहेत. यातील विधानसभेत १९ आमदार असून त्यातील १२ जण हे मराठा आहेत. विधान परिषदेमध्ये मात्र मराठा आमदारांचे प्राबल्य दिसून येत नाही. आतापर्यंत चार आमदार विधान परिषदेत दाखल झाले असून यात पंकजा मुंडे यांच्यासमवेत सोमवारी निवडून आलेल्या सुहास शिरसाठ, अमर राजूरकर, बसवराज पाटील यांचा समावेश आहे. यात पंकजा मुंडे वगळता अन्य तीन आमदारांनी पूर्वी कॉग्रेसमध्ये काम केलेले आहे.
फुलंब्रीमध्ये सहकार क्षेत्रात काम करणारे सुहास शिरसाठ हे पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कार्यरत होते. त्यांच्या मातोश्री काँग्रेस पक्षाकडून सभापती होत्या. काही वर्षांपूर्वी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. हरिभाऊ बागडे यांच्यानंतर या मतदारसंघात काम करणाऱ्या अनुराधा चव्हाण यांना आता या मतदारसंघात बांधणीसाठी नवा ‘ओबीसी’ चेहरा आमदार म्हणून मिळाला आहे. हा मतदारसंघ अनेक वर्षांपासून ‘कमळा’ च्या पाठीशी राहणारा आहे. यात नवा चेहरा म्हणून सुहास शिरसाठ यांना उमेदवारी देण्यात आली. नांदेड जिल्ह्यात नऊ विधानसभा मतदारसंघांपैकी पाच मतदारसंघांत भाजपचे आमदार आहेत.
अशोक चव्हाण स्वत: आणि खासदार अजित गोपछेडे हे संघटन बांधणीचे काम पाहत असल्यामुळे नांदेडमध्ये काँग्रेस वजा होत गेली. नांदेड महापालिकेत तर पहिल्यांदा स्पष्ट बहुमत मिळाले. या पार्श्वभूमीवर अशोक चव्हाण यांच्याबरोबर भाजपमध्ये आलेल्या अमर राजूरकर यांना उमेदवारी देण्यात आली. ते तिसऱ्यांदा विजयी झाले. स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणुकीतून मराठवाड्यात पहिल्यांदाच ब्राह्मण समाजातील व्यक्तीस उमेदवारी देण्यात आली.
मराठवाडा शिक्षक मतदारसंघ आणि पदवीधर मतदारसंघात प्रभावी असणाऱ्या लिंगायत मतदारांना आपल्या बाजूने घेण्यासाठी उमेदवारी दिली जावी, अशी मागणी केली जात होती. काँग्रेसचे दिवंगत नेते शिवराज पाटील चाकूरकरांचे मानसपूत्र अशी ओळख असणाऱ्या बसवराज पाटील यांचा लिंगायत मतदानावर प्रभाव आहे. त्यामुळे बसवराज पाटील यांना विधान परिषदेसाठी उमेदवारी मिळाली. ते मोठ्या फरकाने निवडून आले. शिवसेनेकडून या वेळी परभणी-हिंगोली लोकसभा मतदारसंघात सईद खान यांना उमेदवारी देण्यात आली. प्रचारात ‘खान की बाण’ असा प्रश्न या मतदारसंघात पूर्वी विचारला जात असे. आता खान यांच्याबरोबर बाण असे चित्र मतदारांपर्यंत पोहोचविण्यात आले आहे. यापूर्वी परभणी-हिंगोली मतदारसंघातून विप्लव बाजोरिया यांना उमदेवारी देण्यात आली होती. आता नव्या मांडणीतून बांधणीचे नवे समीकरणे मांडण्यात आल्याचे दिसून येत आहे.
