छत्रपती संभाजीनगर : सलग तीन वेळा निवडून येणाऱ्या सतीश चव्हाण यांच्या विरोधात किती रोष असू शकेल, याचा अंदाज न घेता ‘ महायुती ’ म्हणून निवडणूक लढण्याचा निर्णय मराठवाडा पदवीधर मतदारसंघात भाजपच्या अंगलट आला. ज्या उमेदवाराला पाडा, असा प्रचार गेल्या तीन निवडणुकांमध्ये भाजपचे कार्यकर्ते करीत होते, त्याच व्यक्तीला निवडून द्या, असा प्रचार करण्याची अपरिहार्यता भाजप कार्यकर्त्यांच्या वाट्याला आली. परिणामी, अनेकांनी निवडणुकीपासून अंतर राखले. महायुतीचे ४० आमदार, चार खासदार असतानाही सतीश चव्हाण यांना पराभूत व्हावे लागले.

भाजपमध्ये इच्छुक

भाजपमधील अनेक इच्छुकांना ‘पदवीधर’च्या निवडणुकीतून डावलण्यात आले. गोपीनाथ मुंडे यांच्या बरोबर सातत्याने राहणारे प्रवीण घुगे यांनी या मतदारसंघात पूर्वी मोठी मेहनत केली होती. पण ते नाव काही उमेदवार म्हणून पुढे आले नाही. नाव नोंदणीत प्रमुख म्हणून या वेळी माजी आमदार संजय केनेकर यांची नियुक्ती करण्यात आली.

मैत्रीपूर्ण लढतीची तयारी

निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये उत्साह होता. राष्ट्रवादी (अजित पवार) गटाबरोबर मैत्रीपूर्ण लढत करण्याची तयारी केली होती. महायुतीमध्ये जागा राष्ट्रवादीला सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आणि भाजपचे कार्यकर्ते नाराज झाले. निवडणुकीमध्ये जाहीर सभांमध्ये भाजप नेत्यांनी सतीश चव्हाण यांना निवडून द्यावे, असा प्रचार केला. पण, प्रत्यक्षात मतदान महायुतीकडे वळवता आले नाही.

संस्थाचालकांची पाठ

पदवीधर मतदारसंघात शिक्षण संस्थाचालकांचा मोठा प्रभाव असतो. असा प्रभाव असणाऱ्या नेत्यांनी सतीश चव्हाण यांच्याकडे पाठ फिरवली. यासाठी शरद पवार यांनी खास प्रयत्न केले. खरे तर गेली अनेक वर्षे सतीश चव्हाण यांची प्रतिमा ही शरद पवार आणि अजित पवार यांची प्रिय व्यक्ती अशी होती. अगदी विधानसभा निवडणुकीमध्ये गंगापूर विधानसभा निवडणूक चव्हाण यांनी ‘तुतारी’ चिन्हावर लढवली आणि पुन्हा त्यांनी हाती ‘घड्याळ’ बांधले. यामुळे सतीश चव्हाण यांच्या विरोधात कोणी हूं की चू करत नव्हते.

विविध मुद्दे चव्हाणांच्या विरोधात

या वेळी शरद पवार यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचा उमेदवार बदलला आणि एवढी वर्षे गप्प असणारे संस्थाचालक सतीश चव्हाण यांच्या विरोधात एकवटले. माजी आमदार राजेश टोपे यांची मत्स्योदरी शिक्षण संस्था मोठी आहे; तसेच मतदारसंघातील पदवीधरांपर्यंतचा संपर्क त्यांनी वापरला. जाहीर प्रचारातही ते सहभागी झाले. खासदार सुप्रिया सुळे यांनी शिक्षण संस्थाचालकांबरोबर संवाद साधला. अगदी न्यायालयाच्या मार्गिकांमध्ये वकिलांना हात जोडून मतदान करण्याचे आवाहन केले. रोहित पवार प्रचारात उतरले. याचा अर्थ राष्ट्रवादीमध्ये काम करणाऱ्या जुन्या-जाणत्यांनी कल ओळखला आणि प्रचाराचा रंग बदलला. यात भर पडली जरांगे यांनी प्रसारित केलेल्या ध्वनीफितीची. यातून सत्ताधारी कट करतात, हा संदेश मतदारांपर्यंत पोहोचला. परिणामी, कोणाच्या विरोधात मतदान करायचे, याची मानसिकता बनू लागली.

पाटील यांच्यासाठी रणनीती

ऐन निवडणुकीमध्ये दिवंगत संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी आणि खासदार सुप्रिया सुळे यांचे एक छायाचित्र समाजमाध्यमांमध्ये कमालीचे फिरले. यातून एक प्रकारची सहानुभूती शरद पवार यांच्या राष्ट्रवादीशी जोडणारी ठरली. ही निवडणूक धाराशिव जिल्हा केंद्रित झाली होती. महायुतीचे उमेदवार सतीश चव्हाण यांचे मूळ गाव धारााशिव जिल्ह्यातील. डॉ. प्रताप पाटील यांनी आता धाराशिवमध्ये घर बांधले आहे. याशिवाय तिसऱ्या क्रमांकाचे मते मिळवणारे रविराज सावळे – पाटीलही याच जिल्ह्यातील. पण संस्थाचालक उमदेवार, नवश्रीमंत मराठा उमेदवार या तुलनेत गरजू आणि तरुण मराठा पदवीधरांनी रविराज सावळे- पाटील यांच्या पाठीशी उभे राहणे पसंत केल्याचे दिसते. यात निवडून आले डॉ. प्रतापसिंह पाटील. पण, ‘महायुती’मध्ये जागा सोडण्याचे नुकसान मात्र भाजपच्या अंगलट आले.