पिंपरी : विधानसभेच्या २०२४ च्या निवडणुकीत झालेला टोकाचा संघर्ष, सर्वपक्षीयांनी एकत्र येत निर्माण केलेल्या मावळ पॅटर्नला आलेल्या अपयशानंतर संघर्षात पडलेली भर, हे सर्व मतभेद बाजूला ठेऊन डिसेंबर २०२५ मध्ये झालेल्या तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) आणि भाजपची युती झाल्याने या दोन्ही पक्षामधील संघर्ष कमी झाल्याचे वाटत असतानाच आता पुन्हा संघर्ष सुरू झाला आहे. राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके यांनी भाजप कार्यकर्त्यांसाठी आक्षेपार्ह शब्द वापरल्याचा दावा करुन भाजपने गुरुवारी वडगावमध्ये आमदारांविरोधात निषेध मोर्चा काढला. शेळके यांना कायम विरोध राहणार असल्याचे भाजप नेत्यांनी स्पष्ट केल्याने २०१९ पासून भाजपविरुद्ध आमदार सुनील शेळके असा सुरू असलेल्या संघर्षाला पुन्हा धार आली आहे.
मावळ हा १९६७ मध्ये स्वतंत्र विधानसभा मतदारसंघ झाला. त्यापूर्वी १९५७ ला जनसंघाचे रामभाऊ म्हाळगी आणि १९७२ ला कृष्णराव भेगडे निवडून आले होते. १९५७ व १९७२चा अपवाद वगळता १९६२, १९६७, १९७८, १९८०, १९८५, १९९० या सहा निवडणुकांत काँग्रेस पक्षाने मावळ मतदारसंघातून विजय मिळवला. त्यामुळे पूर्वी मावळ हा काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जात होता. मात्र, १९९५ हे वर्ष निर्णायक ठरले. यावर्षी काँग्रेसमधून बंडखोरी केलेल्या रुपलेखा ढोरे यांना भाजपाने ऐनवेळी उमेदवारी देऊन निवडून आणले. त्यानंतर सलग २५ वर्षांपासून भाजपाचे उमेदवार या मतदारसंघात विजयी झाले. त्यामुळे हा मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला मानला जात होता. भाजपने काँग्रेसमधील बंडखोरीचा फायदा घेतला. तसाच तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेसने २०१९ मध्ये भाजपमधील बंडखोरीचा फायदा घेतला. उमेदवारी नाकारल्याने सुनील शेळके यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आणि भाजपचे माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांचा ९० हजारांहून अधिक मतांनी पराभव केला. तेव्हापासून भाजप आणि आमदार सुनील शेळके यांच्यातील राजकीय वैमनस्य, संघर्ष वाढत गेला.
अजित पवारांची राष्ट्रवादी भाजपबरोबर सत्तेत सहभागी झाल्यानंतरही मावळात युती झाली नाही. सन २०२४ ची विधानसभा निवडणूक अपक्ष लढलेले बापू भेगडे यांना भाजपने पाठिंबा देत मावळ पॅटर्न अस्तित्वात आणला. सर्वपक्षीय विरोधक एकवटले असतानाही शेळके हे एक लाख आठ हजार ५६५ मतांनी निवडून आले. राज्यात एकत्र सत्तेत असतानाही मावळात दोन्ही पक्षांचे सूर काही जुळले नाहीत. मात्र, सर्व मतभेद विसरुन डिसेंबर २०२५ मध्ये लोणावळा, तळेगाव दाभाडे नगरपरिषद आणि वडगाव नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी दोन्ही पक्षांनी युतीसाठी प्रयत्न केले. परंतु, केवळ तळेगाव दाभाडे नगरपरिषद निवडणुकीसाठी युती झाली. लोणावळा नगरपरिषद आणि वडगाव नगरपंचायतीमध्ये आमदार शेळके यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची एकहाती सत्ता आणली. तळेगावमध्ये भाजपचा नगराध्यक्ष असला तरी, त्यांची उमेदवारी आमदार शेळके यांनीच जाहीर केली होती. नगराध्यक्षांच्या विजयात भाजपपेक्षा आमदार शेळके यांचा मोठा वाटा आहे. जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत आमदार शेळके यांनी भाजपला शून्यावर आणले. त्यानंतर आमदार शेळके आणि भाजपमधील संघर्षात भर पडली.
आमदार शेळके यांनी भाजपच्या कार्यकर्त्याबाबत आक्षेपार्ह शब्द वापरल्याचा भाजपचा आरोप आहे. या वक्तव्याच्या निषेधार्थ मावळ तालुका भाजपने गुरुवारी वडगाव येथे निषेध मोर्चा काढला. भाजप हा केवळ पक्ष नाही. असंख्य निष्ठावान कार्यकर्त्यांच्या मेहनतीवर उभे असलेले संघटन आहे. कार्यकर्त्यांचा सन्मान आणि प्रतिष्ठा याबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नसल्याचा इशारा भाजप कार्यकर्त्यांनी दिला आहे. आमदारांकडून भाजपच्या कार्यकर्त्यांची गळचेपी केली जाते. त्यांच्यावर दबाव आणला जातो. भाजप कार्यकर्त्यांचे उद्योग बंद पडले जातात, असे आरोप आंदोलकांनी केले. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाशी आमचा संघर्ष नसून आमदार सुनील शेळके यांना कायम विरोध राहणार असल्याचे भाजपचे माजी आमदार बाळा भेगडे यांनी स्पष्ट केले. भाजप कार्यकर्त्याबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याबाबत आमदारांनी आठ दिवसांत दिलगिरी व्यक्त करावी, अन्यथा तीव्र विरोध केला जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.
