साधारण १० वर्षांपूर्वी बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांच्या तत्कालीन दिल्ली येथील बंगल्यासमोरील बसथांबा पालिका अधिकाऱ्यांनी हलवला होता. या बसथांब्यामुळे मायावतींच्या सुरक्षेला धोका असल्याचे कारण त्यावेळी सांगण्यात आले होते. गेल्या आठवड्यात बसपाने त्यांच्या ३५, लोधी इस्टेट येथील बंगल्याबाबत अशाच प्रकारच्या सुरक्षेसंदर्भात चिंता व्यक्त केली होती. आता मायावतींनी हा बंगला रिकामा केला आहे. राष्ट्रीय पक्षाच्या अध्यक्ष म्हणून देण्यात आलेल्या निवासस्थानी मायावती एक वर्षापूर्वी राहायला गेल्या होत्या. सरकारी सूत्रांनी सांगितल्याप्रमाणे, २० मे रोजी त्यांनी हा बंगला सोडला आणि केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभागाकडे त्याच्या चाव्या सुपूर्द केल्या.
निवासस्थान रिकामं का केलं?
मायावतींचे हे निवासस्थान त्यांच्यासाठी एक योग्य निवासस्थान होते. कारण- ते पक्षाच्या २९, लोधी इस्टेट येथील मध्यवर्ती कार्यालयाच्या मागच्याच बाजूला होते. पक्षकार्यालयाचा मागील दरवाजा ३५, लोधी इस्टेटच्या दिशेला होता. गेल्या वर्षी दोन्ही बंगल्यांचे नूतनीकरण सारख्याच स्वरूपात करण्यात आले होते. मायावतींनी अशा प्रकारे निवासस्थाने स्थलांतरित करण्याच्या निर्णयाबद्दल बसपाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी मात्र मौन बाळगले होते. बसपाचे राष्ट्रीय सरचिटणीस सतीश चंद्र मिश्रा यांना याबाबत फोन आणि संदेश पाठवूनही त्यांनी कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. तसेच दुसरे राष्ट्रीय सरचिटणीस मेवा लाल यांनी सांगितले की, याबाबत अद्याप कोणालाही माहिती नाही.
नाव न सांगण्याच्या अटीवर बसपाच्या एका वरिष्ठ पदाधिकाऱ्याने सांगितले, “मायावतींनी घरे स्थलांतरित करण्याचा निर्णय सुरक्षेच्या कारणास्तव घेतला होता. त्याच रस्त्यावर एक शाळा आहे. ती या मालमत्तेपासून फक्त १०० मीटर अंतरावर आहे. शाळेच्या व्हॅन बहुतेकदा ३५, लोधी इस्टेटच्या समोरील रस्त्यावर उभ्या असतात. आपल्या मुलांना सोडण्यासाठी आणि घेण्यासाठी येणारे पालकही त्याच रस्त्यावर वाहने उभी करतात. मायावतींच्या सुरक्षेत तैनात असलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांची वाहनेदेखील त्याच परिसरात उभी केलेली असल्याने त्यांची आणि शाळेतील मुलांचीही गैरसोय होते.”
विद्या भवन महाविद्यालय शाळा मॅक्स मुलर मार्गावर आहे; मात्र तिचा एक दरवाजा ३५, लोधी इस्टेटच्या रस्त्याकडे उघडतो. मायावतींना झेड प्लस सुरक्षा देण्यात आली आहे. त्याबाबत बसपा नेत्याने सांगितले की, जेव्हा मायावती त्यांच्या निवासस्थानी असतात, तेव्हा सुरक्षा कर्मचाऱ्यांना बॉम्ब पथकांसह परिसराची तपासणी करावी लागत असे. त्यामुळे शाळेला आणि तिथल्या पर्यटकांना त्रास होत असे.
“मायावतींच्या निवासस्थानाबाहेरील कोणत्याही सुरक्षा समस्येसंदर्भातील माहिती त्यांना नव्हती. मात्र, त्यांना झेड प्लस सुरक्षा प्रदान करणाऱ्या युनिटला, त्या दुसऱ्या घरात स्थलांतरित झाल्याची माहिती देण्यात आली होती. त्यांना देण्यात आलेली सुरक्षा कायम आहे”, असे दिल्ली पोलिसांच्या सूत्राने सांगितले.
२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत बसपाची कामगिरी खूपच वाईट होती. त्यामुळे राष्ट्रीय पक्ष म्हणून असलेला त्यांच्या दर्जावर प्रश्नचिन्ह असतानाच मायावती यांनी स्थलांतर केले आहे. राष्ट्रीय पक्षांच्या अध्यक्षांसाठीच्या इस्टेट संचालनालयाच्या जुलै २०१४ च्या धोरणानुसार मायावतींना टाईप-VII, ३५ लोधी इस्टेट बंगला हे दुसऱ्या क्रमांकाचं सर्वांत मोठं सरकारी निवासस्थान देण्यात आलं होतं. ३ एप्रिल रोजी लोकसभेत बोलताना केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयानं सांगितलं की, त्यांना १५ फेब्रुवारी २०२४ रोजी हा बंगला देण्यात आला होता.
७ डिसेंबर २०२१ रोजी बसपा कार्यालय असलेला २९, लोधी इस्टेट हा बंगला मायावतींना निवासस्थान म्हणून देण्यात आला होता, असे माहिती अधिकाराच्या उत्तरात इस्टेट संचालनालयानं मान्य केलं आहे. फेब्रुवारी २०२४ मध्ये मायावतींना ३५, लोधी इस्टेट हे निवासस्थान म्हणून देण्यात आलं होतं आणि २९, लोधी इस्टेट हा बंगला बसपाला त्यांच्या कार्यालयासाठी देण्यात आला होता. सूत्रांनी सांगितल्याप्रमाणे, ३५ लोधी इस्टेट या बंगल्यात दोन डझनहून अधिक खोल्या आहेत. मायावती तिथे राहत असताना त्यांचे सुरक्षा कर्मचारी आणि त्यांचे कर्मचारी यापैकी अनेक खोल्या वापरत होते.
२४ मे रोजी दी इंडियन एक्सप्रेसने ३५, लोधी इस्टेटला भेट दिली, त्यावेळी तिथे कोणीही राहत नव्हतं. धूळ आणि कचऱ्यानं हे निवासस्थान माखलेलं होतं. तिथे फक्त एक सीपीडब्ल्यूडी गार्ड ड्युटीवर होता. गेटबाहेर मायावतींच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांसाठी उभारलेल्या खोल्याही तोडण्यात आल्या होत्या.
जानेवारी २०१४ मध्ये जेव्हा काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीए सरकार केंद्रात सत्तेत होतं, तेव्हा बसपाच्या दबावाखाली दिल्ली महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी मायावतींच्या निवासस्थानासमोरील बसथांबा कसा हलवला होता याबाबतचं वृत्त दी इंडियन एक्स्प्रेसनं दिलं होतं. सूत्रांच्या माहितीप्रमाणे, मायावती यांनी दिल्ली पोलीस आणि केंद्रीय गृह मंत्रालयाला पत्र लिहून निवासस्थानासमोरील बसथांब्यामुळे त्यांच्या जीवाला धोका असल्याचं सांगितलं होतं.