Who is Navya Haridas: काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी वायनाड लोकसभा मतदारसंघाचा राजीनामा दिल्यानंतर या ठिकाणी आता पोटनिवडणूक घोषित झाली आहे. काँग्रेसकडून प्रियांका गांधी वाड्रा यांना आता वायनाडमधून उमेदवारी देण्यात आली आहे. तसेच भाजपाकडूनही एक महिला उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्यात आली आहे. ३९ वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनीयर आणि भाजपाची नगरसेवक नव्या हरिदास या प्रियांका गांधी वाड्रा यांना टक्कर देणार आहेत. दी इंडियन एक्स्प्रेसने नव्या हरिदास यांच्याशी चर्चा करून त्यांची प्रतिक्रिया जाणून घेतली. नव्या सध्या कोझिकोड महानगरपालिकेच्या नगरसेविका आहेत. तसेच भाजपा महिला मोर्चाच्या त्या प्रदेश सरचिटणीस आहेत.
सॉफ्टवेअर इंजिनीयर असलेल्या नव्या या अपघाताने राजकारणात आल्या. बी.टेक.ची पदवी घेतल्यानंतर त्या एचएसबीसी बँकेत सॉफ्टवेअर इंजिनीयर म्हणून काम करीत होत्या. २००९ साली त्यांचे मरीन इंजिनीयर शोबिन श्याम यांच्याशी लग्न झाले. त्यानंतर त्या सिंगापूरला गेल्या. तिथेच त्या सॉफ्टवेअर क्षेत्रात काम करीत होत्या. नव्या हरिदास यांचे कुटुंब राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जोडलेले आहे. नव्या यांनी सांगितले की, त्या लहानपणापासून संघाच्या कार्यक्रमात सहभागी होत होत्या. संघाकडून विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमांत त्या सहभागी झाल्या होत्या. पण, आपण पुढे जाऊन राजकारणात जाऊ, असा विचार त्यांनी कधीही केला नव्हता.
२०१५ साली नव्या कोझिकोडला आपल्या मूळ गावी काही काळासाठी आल्या होत्या. त्यावेळी केरळमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका सुरू होत्या. या निवडणुकांनी नव्या यांचे आयुष्य बदलले. त्या म्हणाल्या, “मी मुलांसह काही दिवसांसाठी कोझिकोडला आले होते. आमचे कुटुंब संघ परिवाराशी संबंधित असल्यामुळे भाजपाने मला निवडणुकीला उभे राहण्याची गळ घातली. मी खुल्या मतदारसंघातून निवडणुकीला उभी राहिले. जर निवडणुकीत पराभव झाला, तर निमूटपणे सिंगापूरला जायचे, असे मी ठरविले होते.”
पण योगायोगाने २०१५ साली नव्याचा निवडणुकीत विजय झाला. त्यानंतर २०२० साली पुन्हा एकदा तिने याच ठिकाणाहून विजय मिळविला. २०२१ च्या विधानसभा निवडणुकीत नव्या यांना कोझिकोड दक्षिण विधानसभेतून भाजपाने निवडणुकीच्या रिंगणात उतरविले. इंडियन नॅशनल लीगचे उमेदवार अहमद देवरकोविल यांचा या ठिकाणी विजय झाला. पण, २०१६ साली भाजपाला दक्षिण कोझिकोडमध्ये १६.५६ टक्के मते मिळाली होती. २०२१ साली ही मतसंख्या वाढून मतदानाची टक्केवारी २०.८९ टक्के इतकी झाली.
नव्या आता वायनाडमधून निवडणूक लढविणार आहेत. २०१९ पासून गांधी कुटुंबीय या ठिकाणी निवडणूक लढवीत असल्यामुळे हा मतदारसंघ देशभर चर्चेचा विषय ठरत आहे.
राहुल गांधी यांनी २०२४ साली रायबरेली व वायनाड या दोन लोकसभा मतदारसंघांतून निवडणूक लढविली होती. दोन्हीकडून त्यांचा विजय झाला. त्यानंतर त्यांनी रायबरेलीची जागा कायम ठेवली आणि वायनाडचा राजीनामा दिला. या ठिकाणी आता प्रियांका गांधी उभ्या राहणार असून, त्या पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत.
प्रियांका गांधी यांच्या उमेदवारीबाबत बोलताना नव्या म्हणाल्या की, प्रियांका गांधी नेहरू कुटुंबातून येत असल्यामुळेच त्यांना केरळमध्ये ओळखले जाते. राहुल गांधी यांना वायनाडच्या जनतेने निवडून दिले होते; पण त्यांनी वायनाडच्या मतदारांशी प्रतारणा केली. त्यांनी बहिणीसाठी त्या मतदारसंघावर पाणी सोडले. काँग्रेसच्या एकाही स्थानिक नेत्याचा या मतदारसंघासाठी विचार झाला नाही. आपल्या कुटुंबाचे राजकीय अस्तित्व टिकून राहावे म्हणून गांधी कुटुंबाकडून फक्त वायनाडचा वापर केला जात आहे.
माझे शिक्षण, स्थानिक म्हणून त्यांना असलेली मान्यता आणि कोझिकोड महानगरपालिकेत मी केलेले काम जनतेसमोर आहे, असे नव्या यांनी सांगितले.
पोटनिवडणुकीची घोषणा होताच नव्या यांनी प्रचाराला जोरदार सुरुवात केली आहे. वायनाडमध्ये आरोग्य आणि शेतीमधील समस्यांवर त्या त्यांचे म्हणणे मांडत आहेत. “वायनाडमधील लोकांकडे पुरेशा आरोग्य सुविधा नाहीत. फक्त नावापुरते वैद्यकीय महाविद्यालय आहे. ३० जुलै रोजी झालेल्या भूस्खलनात वायनाडवर मोठे संकट कोसळले. जंगली श्वापदे शेतात घुसत असल्यामुळे पिकांचे नेहमीच मोठ्या प्रमाणावर नुकसान होत राहते. या आणि अशा अनेक अडचणी लोकांसमोर आहेत”, अशा समस्या घेऊन लोकांसमोर जाणार असल्याचे नव्या यांनी सांगितले.