Premium

भाजपाच्या घोडेबाजारापासून काँग्रेसचे सरकार वाचविण्यासाठी वसुंधरा राजेंनी गेहलोत यांना मदत केली; राजस्थानमध्ये खळबळ

मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचे सरकार पाडण्यासाठी २०२० च्या मध्यात भाजपाकडून घोडेबाजार करण्यात आला. पण वसुंधरा राजे, कैलाश मेघवाल आणि शोभारानी कुशवाहा यांनी भाजपाच्या कृतीला विरोध केला, असा दावा गेहलोत यांनी केला.

Vasundhara Raje Ashok Gehlot relation politics
मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचे सरकार वाचविण्यासाठी बसुंधरा राजे आणि इतर दोन भाजपा आमदारांनी मदत केल्याचा दावा, गेहलोत यांनी केला. (Photo -PTI)

राजस्थानमध्ये विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. तशी राजकीय पक्षांची तयारी सुद्धा जोर पकडू लागली आहे. राजस्थानमध्ये सध्या मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसचे सरकार सत्तेवर आहे. अशोक गेहलोत यांना भाजपा आणि पक्षांतर्गत सचिन पायलट गट असे दुहेरी आव्हान पेलावे लागत आहे. २०२० साली भाजपाने काँग्रेस सरकार पाडण्याचा प्रयत्न केला होता, असा आरोप करत मुख्यमंत्री गेहलोत यांनी भाजपाच्या तीन नेत्यांचे रविवारी (७ मे) आभार मानले. या तीन नेत्यांपैकी एक आहेत माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे. मात्र वसुंधरा राजे यांनी गेहलोत यांचा दावा फेटाळून लावला आहे. तसेच गेहलोत यांनी असा दावा करून माझा अपमान केला असल्याची टीका वसुंधरा राजे यांनी केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वसुंधरा राजे यांच्यासोबत उल्लेख केलेल्या इतर दोन भाजपा आमदारांमध्ये कैलाश मेघवाल आणि शोभारानी कुशवाह यांचा समावेश आहे. दोघांनीही भाजपाच्या घोडेबाजाराचा विरोध करून त्यात सहभागी होण्यास नकार दिला होता, असा दावा गेहलोत यांनी केला. गेहलोत यांच्या या गौप्यस्फोटावर अद्याप या दोन आमदारांची प्रतिक्रिया कळू शकलेली नाही. माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे या सर्वांना परिचित आहेतच. पण इतर दोन आमदार कोण आहेत? त्यांनी गेहलोत सरकार वाचविण्याचा प्रयत्न केला का? हे जाणून घेऊ.

कैलाश मेघवाल

८९ वर्षीय मेघवाल हे राजस्थान विधानसभेतील वरिष्ठ नेते असून ते राजे यांचे निकटवर्तीय समजले जातात. माजी खासदार, माजी मंत्री आणि अनेकवेळा आमदार राहिलेले मेघवाल २०१३ ते २०१८ या काळात राजस्थान विधानसभेचे अध्यक्ष म्हणून काम करत होते. या काळात वसुंधरा राजे दुसऱ्यांदा मुख्यंमत्री बनल्या होत्या. मागच्या पाच वर्षात भाजपा विरोधात बसलेली असताना भाजपा संघटनेच्या अंतर्गत नेतृत्वावरून बरेच वाद सुरू आहेत. एकाबाजूला राजे आणि दुसऱ्या बाजूला राज्यातील इतर मुख्यमंत्री पदाची महत्त्वकांक्षा असलेले नेते यांचे दोन गट दिसतात. मेघवाल यांनी तटस्थ भूमिका घेऊन कोणत्याही एकाबाजूला आपला झुकाव आहे, असे दाखवले नाही.

ढोलपूर येथे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी गौप्यस्फोट करत मेघवाल यांचे नाव घेतले. २०२० साली जेव्हा भाजपाकडून घोडेबाजार करून काँग्रेस सरकार पाडण्याचे कारस्थान सुरू होते. तेव्हा त्याच्याविरोधात मेघवाल यांनी उघड भूमिका घेतली आणि काँग्रेस सरकार पाडण्यापासून वाचवले. याबद्दल गेहलोत यांनी त्यांचे जाहीर सभेत आभार मानले. गेहलोत यांच्या विधानानंतर भाजपा मात्र अडचणीत सापडला असून त्यांनी गेहलोत यांचा आरोप बिनबुडाचा असल्याचे सांगितले.

फेब्रुवारी २०२१ मध्ये, राजे यांचे निष्ठावान मेघवाल आणि इतर २० आमदारांनी भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांना पत्र लिहून विधानसभेत भेदभावाची वागणूक मिळत असल्याची तक्रार केली होती. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष सतीश पुनिया यांना हे पत्र लिहिण्यात आले. सप्टेंबर २०२१ मध्ये, मेघवाल यांनी भाजपाचे नेते आणि विरोधी पक्षनेते गुलाब चांद कटारीया यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव आणण्याची धमकी दिली होती. तसेच सतीश पुनिया आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांना पत्र लिहून याबद्दल कळवले होते. (राजे यांच्याशी कटू संबंध असलेल्या कटारीया यांची राजस्थानमधून उचलबांगडी करून त्यांना आसामचे राज्यपालपद देण्यात आले आहे.)

मेघवाल यांचा शब्द टाळणे भाजपाला परवडणारे नव्हते. मेघावल यांची ज्येष्ठता, त्यांचा मतदारांवर असणारा प्रभाव आणि २०१८ सालच्या विधानसभा निवडणुकीत मेघवाल यांनी शाहपुरा मतदारसंघातून सर्वाधिक मताधिक्य घेऊन विजय मिळवला होता. राज्यातील कोणत्याही पक्षातील नेत्याला त्यांचा मताधिक्याचा विक्रम मोडता आलेला नाही. मुख्यमंत्री गेहलोत यांनी नुकतेच शाहपुराला जिल्ह्याचा दर्जा बहाल केला आहे.

शोभारानी कुशवाहा

मुख्यमंत्री गेहलोत यांनी रविवारी जेव्हा ढोलपूर येथे सदर गौप्यस्फोट केला, तेव्हा कुशवाहा तिथेच उपस्थित होत्या. ४४ वर्षीय शोभारानी यांचे पती बी.एल. कुशवाहा हे ढोलपूरमधील प्रभावशाली नेते आहेत. ढोलपूर येथून ते बहुजन समाज पक्षाचे आमदार होते. २०१६ साली हत्येच्या आरोपाखाली दोषी आढळल्यानंतर त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. एका वर्षानंतर कुशवाहा यांनी भाजपात प्रवेश केला. तत्कालीन मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी कुशवाहा यांना पक्षात प्रवेश दिला होता.

२०१८ साली भाजपाच्या तिकीटावर निवडणूक लढवून शोभारानी यांनी ढोलपूरचा मतदारसंघ शाबूत ठेवला. २०२२ साली राज्यसभेच्या निवडणुकीत शोभारानी यांनी काँग्रेसचे उमेदवार प्रमोद तिवारी यांना मतदान केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला. या आरोपामुळे भाजपाने त्यांना सात वर्षांसाठी पक्षातून निलंबित केले. निलंबनाच्या कारवाईनंतर शोभारानी यांनी भाजपावर त्यांचे कुटुंब उध्वस्त करण्याचा आरोप केला.

मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी रविवारी ढोलपूर येथील भाषणात बोलताना सांगितले की, शोभारानीजी यांनी जेव्हा आम्हाला पाठिंबा दिला, तेव्हा भाजपा नेत्यांची शूद्धच हरपली. शोभारानीजी, दुसरे वसुंधरा राजे आणि तिसले कैलाश मेघवाल यांनी माझे सरकार वाचविण्यासाठी मदत केली.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Meet the bjp mlas praised by ashok gehlot for helping save congress government in 2020 from bjp horse trading kvg

First published on: 08-05-2023 at 22:43 IST
Next Story
शिरुरमध्ये आजी-माजी खासदारांमध्ये ‘जर-तर’ची लढाई