काही दिवसांपूर्वी मुंबईतील मीरा रोड परिसरात मनसेच्या कार्यकर्त्यांनी एका व्यापाऱ्याला मारहाण केली होती. कथितपणे मराठीत बोलला नाही, म्हणून या व्यापाऱ्याला मारहाण केल्याचे या कार्यकर्त्यांनी म्हटले होते. आता ठाणे जिल्ह्यातील मीरा-भाईंदर येथे पोलिसांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) सात कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केला आहे. त्यातील तिघे जण पक्षाचे पदाधिकारी आणि सक्रिय सदस्य आहेत. नेमकं हे प्रकरण काय आहे? मनसेच्या कोणत्या नेत्यांवर कारवाई करण्यात आली आहे? जाणून घेऊयात.
नक्की काय घडलं?
- मुंबईतील मीरा रोड परिसरात मराठी भाषेवरून व्यापाऱ्याला मारहाण करण्यात आली. मनसेच्या तीन कार्यकर्त्यांनी या व्यापाऱ्याला काही प्रश्न विचारले.
- तो मराठीत बोलत नव्हता, म्हणून त्याला मारहाण करण्यात आल्याचे म्हटले जात आहे. विशेष बाब म्हणजे, हे तिन्ही कार्यकर्ते त्या व्यापाऱ्याशी हिंदीतच संवाद साधत होते.
- पोलिसांनी म्हटले आहे की, घटनेच्या व्हिडीओ फुटेजद्वारे या कार्यकर्त्यांची ओळख पटली आहे. हे तिघे मनसेच्या मीरा-भाईंदर युनिटचे सदस्य आहेत.
- या युनिटचे नेतृत्व मनसेचे शहरप्रमुख संदीप राणे करत आहेत.
एफआयआर नोंदवण्याबरोबरच पोलिसांनी शुक्रवारी सात जणांविरुद्ध कारवाई सुरू केली आहे. काशिमीरा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र कांबळे म्हणाले की, सात जणांना प्रतिबंधात्मक नोटीस बजावण्यात आल्या आहेत. हा संपूर्ण घटनाक्रम जाणून घेण्यासाठी अजूनही तपास सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. मीरा-भाईंदरमध्ये मनसे कार्यकर्त्यांशी संबंधित अशा अनेक घटना घडल्या आहेत.
मराठी भाषेवरून मारहाणीच्या घटना
गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये, दक्षिण मुंबईतील गिरगाव येथे एका दुकानदाराला मनसेच्या काही कार्यकर्त्यांनी मारहाण केली होती. दुकानदाराने एका महिलेला मराठीऐवजी मारवाडीत बोलण्यास सांगितले, म्हणून त्याला मारहाण करण्यात आली होती. या घटनेत कोणतीही तक्रार दाखल करण्यात आली नव्हती. या वर्षी मार्चमध्ये, मनसे कार्यकर्त्यांनी मुंबईतील एका मोठ्या सुपरमार्केट स्टोअरमधील कर्मचाऱ्याला मराठीत न बोलल्याबद्दल मारल्याचा आरोप करण्यात आला होता. त्याच्याच पुढच्या महिन्यात मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी गुढी पाडव्याच्या मेळाव्यात म्हटले होते की, राज्यातील सर्व सरकारी कामांसाठी मराठी भाषा अनिवार्य करावी आणि मराठी बोलण्यास नकार देणाऱ्या कोणालाही मारण्यास लोकांनी मागेपुढे पाहू नये.
त्याच महिन्यात, मुंबईतील पवई येथील एका निवासी सोसायटीच्या सुरक्षा रक्षकाला मराठीत न बोलल्याबद्दल मनसेच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली होती. या विरोधात पवई येथील पोलिसांनी मनसेच्या तीन सदस्यांवर आणि एका किराणा अॅप डिलिव्हरी एजंटवर गुन्हा दाखल केला होता. जूनमध्ये मनसे कार्यकर्त्यांनी मुंबईत एका ऑटो-रिक्षा चालकाला मारहाण केली होती आणि मराठी भाषिक प्रवाशाविरुद्ध तसेच राज ठाकरे यांच्याविरुद्ध आक्षेपार्ह भाषा वापरल्याबद्दल त्याला माफी मागण्यास भाग पाडले होते.
संदीप राणे यांनी या घटनेवर प्रतिक्रिया देत म्हटले की, दुकान मालक त्यासाठी जबाबदार आहे. सरकारने त्रिभाषा धोरण रद्द केल्याचा आनंद साजरा करणाऱ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांशी त्याने वाद घालण्यास सुरुवात केली आणि मराठी भाषेचा अपमान केला. ते म्हणाले, “आम्ही या हल्ल्याचे समर्थन करत नाही, परंतु आम्ही मराठी भाषा आणि मराठी भाषिक लोकांचा अपमानही सहन करणार नाही.” मनसे प्रवक्ते संदीप देशपांडे यांनीही यावर आपली प्रतिक्रिया दिली. मनसे कार्यकर्त्यांविरुद्ध दाखल केलेल्या एफआयआरबद्दल त्यांना विचारले असता ते म्हणाले की, कायद्याने आपले काम करावे लागेल, पण आम्ही मराठीचा अपमान सहन करणार नाही.
कारवाई करण्यात आलेले तीन मनसे नेते कोण?
करण कांडणगिरे : करण कांडणगिरे हे मीरा-भाईंदर भागातील मनसेचे उपशहरप्रमुख आहे आणि गेल्या सहा वर्षांपासून ते पक्षात सक्रिय आहेत. ते या परिसरात नियमितपणे आंदोलनांचे आणि राजकीय कार्यक्रमांचे आयोजन करतात. ते संदीप राणे यांचे जवळचे सहकारी मानले जातात आणि कायम पक्षाच्या कार्यक्रमांमध्ये त्यांच्याबरोबर दिसतात. मनसेप्रमुख राज ठाकरे आणि त्यांचा मुलगा अमित ठाकरे यांच्याबरोबर कांडणगिरे यांचे अनेक फोटोदेखील आहेत. कांडणगिरे हे कामगार पुरवठा आणि रिअल इस्टेट व्यवसाय चालवतात.
पोलिसांच्या नोंदींनुसार, यापूर्वीही कोविड-१९ दरम्यान एका सरकारी कर्मचाऱ्याच्या कामात अडथळा आणल्याबद्दल त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. ते मनसे कार्यकर्त्यांच्या एका गटाचा भाग होते आणि त्यांनी वसई, विरार, मीरा-भाईंदर महानगरपालिका कार्यालयात गोंधळ घातला होता, तसेच नागरी अधिकाऱ्यांवर कामकाजादरम्यान मद्यपान केल्याचा आरोप केला होता. अलीकडेच त्यांच्याविरोधात एफआयआर दाखल झाल्यानंतर, कांडणगिरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट केले, “माझे अनेक बिगर-मराठी भाषिक मित्र आहेत आणि ते मराठी भाषिक लोकांचा आणि मराठी भाषेचा आदर करतात. पण, काही लोक असे आहेत जे मराठी भाषा आणि मराठी लोकांचा तिरस्कार करतात, त्यांना कायम त्यांची जागा दाखवली पाहिजे.”
प्रमोद निलेकट : निलेकट हे मनसेच्या वाहतूक सेना (वाहतूक शाखा)चे जिल्हा संघटक आहेत. पक्षाशी अनेक वर्षांपासून जोडलेले असल्याने ते कांडणगिरे यांच्याप्रमाणेच मीरा-भाईंदर परिसरात मनसेच्या संघटनात्मक कार्यात सक्रियपणे सहभागी आहेत. त्यांनी मराठा आरक्षण आंदोलनातही भाग घेतला होता. ते संदीप राणे यांच्या जवळचे मानले जातात. निलेकट विवाहित आहेत आणि ते मीरा-भाईंदरमध्ये पेस्ट्री, केक आणि आईस्क्रीमचे दुकान चालवतात. त्यांच्यावर यापूर्वी कोणतेही पोलिस गुन्हे दाखल नाहीत.
अक्षय साळवी : अक्षय साळवी हे मुंबईतील दहिसर येथे राहतात आणि ते पक्षाचे कार्यकर्ते आहेत. अक्षय साळवी विवाहित असून एका खाजगी कंपनीत नोकरी करतात. ते देखील मनसेच्या मीरा-भाईंदर युनिटमध्ये पक्षाच्या सर्व कार्यक्रमात सहभागी होतात. त्यांच्यावर यापूर्वी कोणतेही गुन्हे दाखल नाहीत.