scorecardresearch

भाजपाचे तीन सारथी; ज्यांच्यावर भाजपाचे ‘मिशन २०२४’ अमलात आणण्याची जबाबदारी

उत्तर प्रदेशच्या निवडणुकीतील यशामागचा सूत्रधार सुनील बंसल, महाराष्ट्राच्या राजकारणातून बाजूला सारलेले विनोद तावडे आणि तेलंगणामध्ये भाजपाला नवी उभारी देणारे तरुण चुग हे आता २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी रणनीती आखण्याचे काम करणार आहेत.

Vinod Tawde Sunil Bansal Tarun Chug
आगामी लोकसभा निवडणुकीची रणनीती आखण्यासाठी भाजपाने तीन नेत्यांची समिती स्थापन केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या नेतृत्वाखालील भाजपाने २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी ४०० जागांहून अधिकचे लक्ष्य निर्धारित केले आहे. ५४५ सदस्य असलेल्या लोकसभेच्या सभागृहात २०१९ साली भाजपाने ३०३ जागा जिंकल्या होत्या. आपले निर्धारित लक्ष्य गाठण्यासाठी भाजापाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी सार्वत्रिक निवडणुकांची तयारी करण्यासाठी बुधवारी तीन सदस्यांची समिती स्थापन केली. पडद्यामागे राहून काम करणाऱ्या या समितीमध्ये सुनील बन्सल, विनोद तावडे आणि तरुण चुग या तीन राष्ट्रीय महासचिवांचा समावेश आहे.

ही समिती २०२४ च्या लोकसभा निवडणुकांच्या उमेदवारांसाठी रणनीती ठरविण्यावर काम करेल. २०१९ च्या निवडणुकीत कोणत्या मतदारसंघात भाजपाचे उमेदवार दुसऱ्या क्रमाकांवर होते, तसेच आगामी निवडणुकीसाठी संभाव्य उमेदवारांची निवड याबद्दल प्रदेश भाजपाशी समन्वय साधण्याचे काम या समितीकडून होईल. मतदारसंघाचा आढावा घेण्यासोबतच ही समिती सामान्य लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रभावी कार्यक्रम सुचविण्यावरदेखील काम करेल. या कार्यक्रमाच्या माध्यमातून पक्षाला कार्यकर्त्यांच्या परिघाबाहेर पोहोचवणारे कार्यक्रम देण्यावरदेखील भर असेल.

या समितीचे तीन सारथी कोण आहेत, त्यांचा पूर्वेतिहास काय आहे? ते पाहू या.

विनोद तावडे

भाजपाचे अखिल भारतीय महासचिव असलेल्या विनोद तावडे यांनी व्यवस्थितरीत्या राजकारणाच्या मुख्य प्रवाहात पुनरागमन केले. २०१४ ते २०१९ दरम्यान देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये काम केलेल्या तावडे यांना संभाव्या स्पर्धक समजून बाजूला सारण्यात आले होते. भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाने विनोद तावडेंवर सोपविलेल्या नव्या जबाबदारीमुळे त्यांच्या क्षमतेवर पक्षाचा असलेला आत्मविश्वास दिसून येतो. ज्यामुळे विनोद तावडे यांना स्वतःची क्षमता सिद्ध करण्याची एक नवी संधी मिळाली आहे.

२०१४ साली सत्तेवर आलेल्या भाजपा-शिवसेना युतीच्या सरकारमध्ये विनोद तावडे यांनी शिक्षणमंत्री, वैद्यकीय आणि उच्च व तंत्रज्ञान शिक्षणमंत्री, क्रीडा, सांस्कृतिक आणि मराठी भाषामंत्री म्हणून काम पाहिले होते. मात्र २०१९ मध्ये विनोद तावडे यांचे शेवटच्या क्षणी तिकीट कापण्यात आले. आपली उमेदवारी पक्की समजणाऱ्या तावडे यांच्यासाठी हा मोठा धक्का होता. तरीदेखील तावडे यांनी आपला अपमान मगू गिळून सहन केला आणि एका निष्ठावंत कार्यकर्त्याप्रमाणे त्यांच्या मतदारसंघातून उमेदवारी दिलेल्या सुनील राणे यांच्या प्रचारात स्वतःला झोकून दिले.

राजकारणात काहीही नित्य नसते, असे म्हणतात. तावडेंच्या बाबतीत हे लागू पडते. २०१९ नंतर तावडे भाजपाच्या केंद्रीय संघटनेकडे वळले. २०२० साली जेपी नड्डा यांनी त्यांची राष्ट्रीय सचिवपदी निवड केली. पुढील काही वर्षांत कामगिरीचा आढावा घेऊन केंद्रीय नेतृत्वाने २०२१ साली तावडेंना राष्ट्रीय महासचिवपदावर बढती मिळाली. यावेळी तावडे म्हणाले, “माझ्या संयमाचे फळ मला मिळाले. प्रत्येक कार्यकर्त्याने ही गोष्ट ध्यान्यात घ्यावी.”

सुनील बन्सल

निवडणूक व्यवस्थापनाची कला अवगत असलेल्या सुनील बन्सल यांना केंद्रीय नेतृत्वाने या समितीमध्ये घेतले आहे. बन्सल यांनी याआधी देखील निवडणुका जिंकण्याचे कौशल्य पक्षाला सिद्ध करून दाखविले आहे. सुनील बन्सल यांनी २०१७ आणि २०२२ साली उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत आणि २०१९ लोकसभा निवडणुकीत आपले कसब दाखवून दिले होते. ऑगस्ट २०२२ मध्ये त्यांची पश्चिम बंगाल, ओडिशा आणि तेलंगणाच्या प्रभारीपदी नियुक्ती केली गेली. या तीनही राज्यांत भाजपा विरोधात बसलेला आहे. २०२४ साठी निवडणुकीची रणनीती आखण्याच्या दृष्टीने बन्सल या राज्यात काम करत आहेत.

सप्टेंबर २०२२ च्या पहिल्या आठवड्यात बन्सल यांनी पश्चिम बंगालचा पहिला दौरा केला. २०२१ च्या विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर पक्षसंघटनेतील मरगळ झटकून टाकण्यासाठी या दौऱ्यात बन्सल यांनी विशेष लक्ष दिले. तृणमूल काँग्रेसकडून पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर भाजपाच्या अनेक वरिष्ठ नेत्यांनी राज्यातून काढता पाय घेतला. त्यामुळे तळागाळातल्या कार्यकर्त्याला तृणमूल काँग्रेसच्या रोषाला सामोरे जावे लागले, असी तक्रार सामान्य कार्यकर्त्यांनी बन्सल यांच्यासमोर बोलून दाखवली.

५३ वर्षीय सुनील बन्सल यांचा जन्म राजस्थानमध्ये झाला. विद्यार्थिदशेपासूनच त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघात प्रवेश केला. अमित शहा यांनी बन्सल यांना २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेश राज्याची रणनीती आखण्याची जबाबदारी दिली होती. या राज्यातील जागांमुळेच मोदींचा पंतप्रधानपदाचा मार्ग सुकर झाला. अमित शहा यांच्यासोबत त्यांचे सूत चांगले जुळत असल्यामुळे बन्सल यांना मिळालेल्या नव्या भूमिकेच्या पाठीशी खूप मोठी ताकद असल्याचे बोलले जाते.

तरुण चुग

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेमधून भाजपामध्ये प्रवेश केलेले कुशल संघटक म्हणून तरुण चुग यांनी आपला ठसा उमटवला आहे. ५० वर्षीय तरुण चुग हे भाजपासाठी रसद आणणारे आणि पक्षाच्या व वरिष्ठ नेत्यांच्या कार्यक्रमांचे वेळापत्रक तयार करणारे प्रमुख व्यक्ती आहेत. मूळचे अमृतसरचे असलेले चुग यांना २०२० साली तेलंगणाच्या राज्य प्रभारीपदी नियुक्त करण्यात आले होते. या राज्यात एक मजबूत विरोधी पक्ष म्हणून आपले स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न भाजपा करत आहे. चुग यांच्या नेतृत्वाखाली तेलंगणाचे पक्षप्रमुख बंदी संजय कुमार हे भारत राष्ट्र समितीला चांगले आव्हान देत आहेत.

मागच्या काही दिवसांपासून भाजपाने तेलंगणामध्ये चांगली पकड घेतली आहे. पोटनिवडणुकीत भाजपाचे दोन आमदार निवडून आले. तसेच डिसेंबर २०२० साल झालेल्या हैदराबाद महानगरपालिकेत निवडून येणाऱ्या भाजपाच्या सदस्यांची संख्या वाढली आहे. चुग यांनी पदभार स्वीकारल्यापासून तेलंगणा राज्य देशातील भाजपाच्या इतर राज्यांपैकी सर्वात सक्रिय राज्य बनले आहे.

आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने पक्षाचे वरिष्ठ नेते अनेक कार्यक्रम घेणार आहेत. त्यासाठी वरिष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्र्यांशी समन्वय साधणे ही चुग यांची या समितीमधील मुख्य जबाबदारी असणार आहे. हे कार्यक्रम सुरळीत पार पाडण्यासाठी चुग सर्व राज्यांतील प्रमुखांशी समन्वय साधणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

मराठीतील सर्व सत्ताकारण ( Politics ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 10-03-2023 at 16:00 IST