scorecardresearch

अमरावतीत ‘मेगा टेक्‍स्‍टाईल पार्क’वरून आरोप-प्रत्‍यारोपांचा धुरळा

सत्ताबदलानंतर राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी केंद्रीय अर्थमंत्री व वस्त्रोद्योग मंत्र्यांची भेट घेवून अमरावती ऐवजी औरंगाबाद येथील ऑरीक सिटी मध्ये अशा प्रकारचे मेगा टेक्सटाईल पार्क उभारण्याचा आग्रह धरल्‍याचे डॉ. सुनील देशमुख यांचे म्‍हणणे आहे.

अमरावतीत ‘मेगा टेक्‍स्‍टाईल पार्क’वरून आरोप-प्रत्‍यारोपांचा धुरळा

नांदगांवपेठ येथील औद्योगिक वसाहतीमध्ये ‘पीएम-मित्रा’ योजने अंतर्गत प्रस्तावित  ‘मेगा टेक्‍स्‍टाईल पार्क’ औरंगाबादला पळविण्याचे षडयंत्र  रचण्यात आल्‍याचा आरोप माजी राज्‍यमंत्री आणि कॉंग्रेसचे नेते डॉ. सुनील देशमुख यांनी केल्‍यानंतर सत्‍ताबदलाने सुखावलेल्‍या भाजप कार्यकर्त्‍यांनी त्‍याला जोरदार प्रत्‍युत्‍तर देण्याचा प्रयत्न केला. असे असले तरी या प्रकल्‍पाचे काय होणार हा प्रश्‍न अनुत्‍तरीतच आहे.

जागतिक कापड बाजारात स्‍वत:चे स्‍थान मजबूत करणे, गुंतवणूक आकर्षित करणे आणि रोजगार निर्मितीला चालना देणे यासाठी केंद्र सरकारने ‘पीएम-मित्रा’ योजनेअंतर्गत देशात सात ठिकाणी ‘मेगा इंटिग्रेटेड टेक्‍स्‍टाईल रिजन अॅण्ड अॅपेरल पार्क’ उभारण्‍याचा निर्णय घेतला. त्‍यासाठी सात वर्षांमध्‍ये ४ हजार ४४५ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. या प्रकल्‍पांसाठी १३ राज्‍यांमधून १८ ठिकाणचे प्रस्‍ताव आले आहेत, त्‍यात महाराष्‍ट्रातील अमरावती आणि औरंगाबादचा समावेश आहे.

अमरावतीच्‍या नांदगावपेठ औद्योगिक वसाहतीत वस्‍त्रोद्योगासाठी अनुकूल स्थिती असून सुरूवातीला अमरावतीचा एकच प्रस्‍ताव पाठविण्‍यात आला, पण त्यानंतर महाविकास आघाडीचे सरकार पायउतार झाले आणि शिंदे-फडणवीस यांचे सरकार आले. सत्ताबदलानंतर राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी केंद्रीय अर्थमंत्री व वस्त्रोद्योग मंत्र्यांची भेट घेवून अमरावती ऐवजी औरंगाबाद येथील ऑरीक सिटी मध्ये अशा प्रकारचे मेगा टेक्सटाईल पार्क उभारण्याचा आग्रह धरल्‍याचे डॉ. सुनील देशमुख यांचे म्‍हणणे आहे. तर डॉ. देशमुख यांनी चुकीच्‍या माहितीच्‍या आधारे खोटे आरोप केल्‍याचे आमदार प्रवीण पोटे आणि भाजपचे शहर अध्‍यक्ष किरण पातूरकर यांचे म्‍हणणे आहे. हे मेगा पार्क अमरावतीतच होणार, असा दावा भाजपचे राज्‍यसभेचे खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी केला आहे. दुसरीकडे, माजी पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनीही नांदगावपेठ येथील वस्‍त्रोद्योगांची भरभराट ही कॉंग्रेस सरकारच्‍या काळातच झाली. अनेक उद्योगांशी सहमतीचे करार हे त्‍यावेळी झाल्‍याचा दावा केला.

या आरोप-प्रत्‍यारोपांमध्‍ये प्रस्‍तावित मेगा टेक्‍स्‍टाईल पार्कचे काय होणार हा प्रश्न कायम आहे. टेक्‍स्‍टाईल पार्क मंजूर झाल्‍यास, त्‍याचे श्रेय कुणाला ही खरी लढाई आहे. विकासात राजकारण आणू नये, असे राजकीय पुढारी भाषणांमधून वारंवार सांगत असले, तरी अमरावतीच्‍या टेक्‍स्‍टाईल पार्कच्‍या निमित्‍ताने दाव्या-प्रतिदाव्‍यांनी राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण ( Politics ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

ताज्या बातम्या