scorecardresearch

Meghalaya Elections: भाजपाला सत्ता मिळवून देण्याचा ममता बॅनर्जींच्या पक्षाचा उद्देश; राहुल गांधी यांची तृणमूल काँग्रेसवर टीका

Meghalaya Elections: ममता बॅनर्जी यांचा तृणमूल काँग्रेस पक्ष हा घोटाळेबाज, हिंसाचार करणारा असल्याचे राहुल गांधी म्हणाले.

Rahul Gandhi on Mamata Banerjee
Meghalaya Elections: राहुल गांधी यांची ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसवर टीका

Rahul Gandhi on TMC: आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकाबाजूला काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे देशभरातील विरोधी पक्षांना एकत्र आणण्याचे काम करत आहेत. तर दुसरीकडे मेघायल विधानसभा निवडणुकीचा प्रचार करण्यासाठी पोहोचलेल्या राहुल गांधींनी तृणमूल काँग्रेसवरच जोरदार हल्ला केला. राहुल गांधी यांनी ममता बॅनर्जी यांच्या पक्षावर भाजपाला मदत करण्याचा आरोप लावला आहे. मेघालयची राजधानी शिलाँग येथे एका जाहीर सभेत बोलत असताना राहुल गांधी यांनी तृणमूल काँग्रेसवर टीका केली.

राहुल गांधी म्हणाले, “तुम्हाला टीएमसीचा इतिहास माहितीये का? बंगालमध्ये होत असेलल्या हिंसाचाराबाबत तुम्ही जागरूक असालच. बंगालमध्ये होत असलेले घोटाळे देखील तुम्हाला माहीत असतील. शारदा घोटाळ्याबाबत आपण ऐकले असेल. तृणमूल काँग्रेसची एकूणच काम करण्याची पद्धत सर्वांना परिचित आहे. तृणमूल काँग्रेस पक्ष गोव्याच्या निवडणुकीत उतरला होता, तिथे खूप पैसा खर्च करण्यात आला. तिथे त्यांनी भाजपाला एकप्रकारे मदतच केली. मेघालयमध्ये देखील भाजपाला मदत करणे हाच त्यांचा उद्देश आहे. भाजपाला मजबूत करणं, त्यांना विजय मिळवून देण्यासाठीच तृणमूल याठिकाणी निवडणुकीत उतरली आहे.”

भाजपा-रास्वसंवरही साधला निशाणा

राहुल गांधी यांनी मेघालयमध्ये प्रचार करत असताना सांगितले की, विविधतेत सुंदरता हाच भारताचा प्राण आहे. पण भाजपा आणि राष्ट्रीय स्वंयसेवक संघाला हे मंजूर नाही. ते ही बाब नाकारतात. भाजपा आणि संघाची विचारधारा, तुमच्या संस्कृती, परंपरा आणि तुमच्या धर्माला नष्ट करणारी आहे. भारतात एक विचार नाही. एक समुदाय नाही, एक भाषा नाही किंवा एक धर्म नाही. भारतात अनेक विचार आहेत, वेगवेगळे धर्म आहेत. अनेक समुदाय, भाषा आणि कितीतरी संस्कृती आहेत.

राहुल गांधी अपरिपक्व – तृणमूल काँग्रेस

राहुल गांधी यांच्या वक्तव्यानंतर तृणमूल काँग्रेसकडूनही त्यांना प्रत्युत्तर देण्यात आले आहे. तृणमूलचे उपाध्यक्ष जय प्रकाश मजूमदार यांनी गांधी यांच्यावर आरोप करताना म्हणाले, “मेघालयमध्ये ज्या पद्धतीने राहुल गांधींनी टीएमसीवर टीका केली, ती त्यांच्या अपरिपक्व राजकीय जाणीवेचे द्योतक आहे. लोकांना वाटतं की, भारत जोडो यात्रेनंतर राहुल गांधी परिपक्व झाले असतील, मात्र आम्हाला असे वाटत नाही. काँग्रेसला आता आत्मपरिक्षण करण्याची गरज आहे. त्यांना आघाडी करण्याची गरज आहे. मात्र त्यांचा अहंम अजूनही १९५० किंवा १९६० च्या दशकात आहे.”

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 22-02-2023 at 22:16 IST

संबंधित बातम्या