प्रल्हाद बोरसे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत येथे अलिकडेच झालेल्या समर्थकांच्या मेळाव्यास उपस्थित राहून सलगी दाखविल्यामुळे ‘एमआयएम’ पक्षाचे आमदार मौलाना मुफ्ती इस्माईल चांगलेच अडचणीत आले आहेत. परस्पर विरोधी राजकीय विचारधारा मांडणारे नेते पक्षीय कार्यक्रमात व्यासपीठावर एकत्र आल्याबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असून त्या निमित्ताने मौलाना यांच्याविरुध्द शहरात काहूर उठल्याचे चित्र आहे.
शिवसेनेत झालेल्या बंडानंतर मुख्यमंत्रीपदावर आरूढ झालेल्या शिंदे यांनी आपल्या राज्यव्यापी दौऱ्याचा मालेगाव येथून प्रारंभ केला. या दौऱ्यात मुख्यमंत्र्यांनी नाशिक महसूल विभागाची आढावा बैठक घेतली. तसेच ‘आमचीच खरी शिवसेना’ अशी गर्जना आणि शक्तीप्रदर्शन करत शिंदे गटातर्फे कार्यकर्ता मेळावा घेण्यात आला. मेळाव्यास शिंदे गटाचे उत्तर महाराष्ट्रातील तसेच शेजारच्या चांदवड, बागलाणमधील भाजपचे आमदारही उपस्थित राहिले. भाजप-शिंदे गटाच्या या आमदार आणि नेत्यांच्या मांडीला मांडी लावत ‘एमआयएम’चे ‘मालेगाव मध्य’चे आमदार मौलाना हेही व्यासपीठावर स्थानापन्न झाले होते. त्यांची ही उपस्थिती अचंबित करणारी, तेवढीच खटकणारी असल्यामुळे प्रमुख विरोधक असलेल्या राष्ट्रवादी तसेच काँग्रेसच नव्हे तर, स्वपक्षीयांकडूनदेखील त्यांना टीका सहन करावी लागत आहे.

शिंदे गटाने शिवसेनेत उभी फूट पाडण्याची जी प्रमुख कारणे पुढे केली, त्यात पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी हिंदुत्वाच्या विचारधारेशी फारकत घेतली हे एक प्रमुख कारण असल्याचे सांगितले गेले. शिवाय हिंदुत्वाचा पुरस्कार करणाऱ्या भाजपच्या पाठिंब्यानेच ठाकरे यांच्या खुर्चीला सुरुंग लावत स्वत: एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपद हस्तगत केले. हिंदुत्वाचा पुरस्कार करणारी भाजप-शिंदे गटाची युती आणि दुसऱ्या बाजूला ‘एमआयएम’ या दोन्ही पक्षांची टोकाची परस्पर विरोधी राजकीय विचारधारा सर्वश्रृत आहे. तसेच एकंदरीत नेपथ्य रचना पाहता मुख्यमंत्रीपद मिळाल्यानंतर जणू आनंदोत्सव साजरा करण्यासाठी आयोजित शिंदे गटाच्या या मेळाव्याचे स्वरुप शंभर टक्के पक्षीय कार्यक्रम असेच होते. त्यामुळेच मेळाव्यातील मौलानांची उपस्थिती वादात सापडली. हिंदुत्वाची भाषा करणाऱ्या शिंदे गटाला आपल्या व्यासपीठावर ‘एमआयएम’चे आमदार अस्पृश्य वाटत नाही का, असा प्रश्नही विचारला जाऊ लागला आहे.

यानिमित्ताने मौलाना यांना घेरण्यासाठी कट्टर विरोधक असणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे महानगर प्रमुख माजी आमदार आसिफ शेख यांना एक आयते कोलीत मिळाले. मौलानांचे खायचे अन् दाखवायचे दात वेगळे असल्याची टीका शेख यांनी केली. काही दिवसांपासून मौलाना यांची राजकीय भूमिका ही भाजपला पूरक ठरणारी असल्याचे सांगत शेख यांनी अलिकडेच पार पडलेल्या राज्यसभा, विधान परिषदेच्या निवडणुकांकडे अंगुलीनिर्देश करत मौलानांसंदर्भात प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. मालेगावनंतर औरंगाबादला जाणाऱ्या मुख्यमंत्र्यांना एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष तथा तेथील खासदार इम्तियाज जलील हे काळे झेंडे दाखविण्याची भाषा बोलून दाखवितात. त्याच वेळी मालेगावात मात्र याच पक्षाचे आमदार भाजप-शिंदे गटाच्या व्यासपीठावर जात असतील तर याचा काय अर्थ काढावा, असा प्रश्न राष्ट्रवादीने उपस्थित केला आहे.खुद्द एमआयएममध्येही मौलानांच्या भाजप-शिंदे गट प्रेमामुळे नाराजीचा सूर उमटला आहे. मुख्यमंत्र्यांनी घेतलेली आढावा बैठक हा शासकीय कार्यक्रम असल्याने एक लोकप्रतिनिधी म्हणून या बैठकीला उपस्थित राहणे हे मौलानांचे कर्तव्य ठरते. या बैठकीला ते उपस्थित राहिले यात वावगे असे काहीच नसले तरी त्यानंतर झालेल्या शिंदे गटाच्या मेळाव्यास उपस्थित राहाण्याच्या त्यांच्या कृतीला स्वपक्षातूनही तीव्र आक्षेप घेतला जात आहे.मौलाना है गेल्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर एमआयएममध्ये दाखल झाले होते. तत्पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना २०१७ च्या महापालिका निवडणुकीसाठी जनता दलाला सोबत घेऊन त्यांनी महागठबंधन आघाडी निर्माण केली होती.

सद्यस्थितीत शहरात राष्ट्रवादी काँग्रेसचा वरचष्मा असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीसाठी एमआयएम, जनता दलासह, काँग्रेसलाही महागठबंधन आघाडीत सामावून घेण्याचे प्रयत्न सुरू होते. मात्र मौलानांच्या भाजप-शिंदे गटाच्या सलगीमुळे ही आघाडीच आता फुटीच्या उंबरठ्यावर आहे. या सर्व पार्श्वभूमीवर जनता दल आणि एमआयएमच्या काही नेत्यांनी मौलाना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात तिसरी आघाडी स्थापन करण्याची चाचपणी सुरू केल्याची शहरात चर्चा आहे. दुसरीकडे मेळाव्यात मुख्यमंत्री मालेगाव जिल्हा निर्मितीची घोषणा करण्याची शक्यता वाटल्याने आणि या क्षणाचा साक्षीदार होता यावे म्हणून आपण मेळाव्यास उपस्थित होतो,असा युक्तिवाद मौलाना करीत आहेत. मात्र हा युक्तिवाद पचनी पडताना दिसत नसून विरोधकांकडून त्या युक्तिवादाची ‘हास्यास्पद’ असे म्हणून खिल्ली उडवली जात आहे.