Minister Ravindra Chavan lost Thane Guardian minister post because of Chief Minister Son | Loksatta

मुख्यमंत्री पुत्रामुळे चव्हाणांचे ठाण्याचे पालकमंत्री पद हुकले ?

शिंदे गटाने साताऱ्याहून थेट शंभूराजांना ‘आयात’ करत रविंद्र चव्हाण आणि भाजपला जिल्ह्यात फारशी राजकीय मोकळीक मिळणार नाही याची काळजी घेतली आहे.

मुख्यमंत्री पुत्रामुळे चव्हाणांचे ठाण्याचे पालकमंत्री पद हुकले ?
मुख्यमंत्री पुत्रामुळे चव्हाणांचे ठाण्याचे पालकमंत्री पद हुकले ?

जयेश सामंत

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा प्रभाव असलेल्या ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्रीपद यंदा भाजपच्या वाट्याला जाईल अशी अटकळ बांधली जात असतानाच शिंदे यांनी ते आपल्याच गटाचे शंभूराजे देसाई यांच्याकडे सोपवल्याने भाजपच्या स्थानिक नेत्यांची अस्वस्थता टोकाला पोहचू लागली आहे.

राज्यात सत्ताबदल होताच स्थापन झालेल्या नव्या मंत्रिमंडळात डोंबिवलीतील भाजपचे आमदार रविंद्र चव्हाण यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम तसेच अन्न व नागरी पुरवठा यासारखी महत्वाची खाती सोपविण्यात आली. मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अशा दोघांचेही अतिशय निकटवर्तीय म्हणून चव्हाण यांची ओळख आहे. राज्यात घडलेल्या सत्तांतर नाट्यातही सुरत, गुवाहटी आणि गोवा प्रवासात चव्हाण हेे शिंदे यांच्या सतत सोबत होते. त्यामुळे जिल्ह्याचे पालकमंत्री पद त्यांनाच मिळेल अशी अटकळ बांधली जात असतानाच शिंदे गटाने साताऱ्याहून थेट शंभूराजांना ‘आयात’ करत चव्हाण आणि भाजपला जिल्ह्यात फारशी राजकीय मोकळीक मिळणार नाही याची काळजी घेतली आहे.

हेही वाचा… ठाणे : टेंभीनाका येथील नवरात्रौत्सामुळे शहरात वाहतूक बदल

भाजपचा परंपरागत मतदारसंघ असलेल्या डोंबिवलीत रविंद्र चव्हाण यांनी अडीच वर्षापूर्वी विजयाची हॆट्रीक साजरी केली. शिवसेनेचा बालेकिल्ला असलेला जिल्हा अशी ठाण्याची ओळख असली तरी मागील दोन विधानसभा निवडणुकांनी मात्र हे चित्र काही प्रमाणात बदलत असल्याचे दाखवून दिले आहे. या दोन्ही विधानसभा निवडणुकांमध्ये जिल्ह्यातील १८ पैकी सर्वाधिक जागा या भाजपने जिंकल्या आहेत. अडीच वर्षापूर्वी जिल्ह्यातील सर्वाधिक आठ जागांवर विजय मिळवत युतीच्या राजकारणातही भाजपने शिवसेनेला मागे सोडले होते. जिल्ह्यावरील भाजपची पकड एकीकडे मजबूत होत असताना कल्याण लोकसभा मतदारसंघात आणि त्यातही कल्याण डोंबिवलीतील स्थानिक राजकारणात खासदार डाॅ.श्रीकांत शिंदे आणि भाजपच्या स्थानिक नेत्यांमध्ये वरचेवर खटके उडताना दिसत आहेत. अडीच वर्षापूर्वी राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होताच हा संघर्ष अधिक तीव्र झालेला पाहायला मिळाला.

हेही वाचा… नाशिकमध्ये पक्षांतराचे नव्याने वारे

शिंदे पुत्र-चव्हाण यांच्यातील संघर्ष टिपेला ?

गेल्या अडीच वर्षापासून रविंद्र चव्हाण आणि खासदार डाॅ. श्रीकांत शिंदे यांच्यात कल्याण डोंबिवलीतील विकास कामांवरुन टोकाची धुसफूस सुरू आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळात डोंबिवलीतील रस्ते कामांसाठी ४७२ कोटीचा निधी जाहीर करण्यात आला होता. मात्र नगरविकास मंत्री असताना एकनाथ शिंदे यांनी हा निधी खुला केला नाही अशी जाहीर टीका चव्हाण यांनी केली होती. हा निधी वितरित न करता खासदार शिंदे यांनी कल्याण डोंबिवली पालिकेसाठी याच कालावधीत ३०० कोटीचा निधी मंजूर करुन घेतला. डोंबिवलीतील राजकारणात आपल्या समर्थकांना ताकद देताना चव्हाण अडगळीत पडतील असे राजकारण खासदार शिंदे यांच्याकडून सुरु असल्याची टीका भाजपकडून केली जात होती. खासदार शिंदे यांनीही मध्यंतरी भाजपच्या काही नगरसेवकांना शिवसेनेत आणण्याचा सपाटाच लावला होता.

हेही वाचा… शिंदे समर्थक आमदार गोगावले यांचा पुन्हा एकदा अपेक्षाभंग

आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी महत्वाची विकास कामे कल्याण डोंबिवलीत मार्गी लागावीत यासाठी हक्काचा अधिकारी पालिकेत असावा म्हणून गेले चार वर्ष महापालिकेबाहेर असलेले अतिरिक्त आयुक्त संजय घरत यांना कल्याण डोंबिवलीच्या सेवेत पुनर्स्थापित करावे म्हणून मंत्री चव्हाण प्रयत्नशील होते. मात्र आधी नगरविकास मंत्री म्हणून आणि आता मुख्यमंत्री असल्याने शिंदे आपल्या खासदार मुलाच्या आग्रहास्तव असे होऊन देत नाहीत अशीही चर्चा डोंबिवलीत दबक्या आवाजात सुरू आहे. डोंबिवलीतील सुतिकागृह विकसित करण्यासाठी चव्हाण यांनी प्रयत्न चालविले होते. यासाठी सात कोटीचा निधी मंत्री असताना उपलब्ध करुन दिला होता. याठिकाणी देखील त्यांची कोंडी केल्याची चर्चा आहे. महापालिका प्रशासनात मंत्री चव्हाण यांना साथ देईल असा अधिकारी येऊच द्यायचा नाही असा चंगच बांधला गेल्याचा आरोपही भाजपच्या गोटातून होत असतो. यामुळे अस्वस्थ असलेल्या चव्हाण यांनी मंत्रीपदाची सूत्रे घेतल्यानंतरही डोंबिवलीत मध्यंतरी एका कार्यक्रमात महापालिका आयुक्तांवर टीकेचे आसूड ओढले तेव्हाच चव्हाण आणि खासदार शिंदे यांच्यात अजूनही फारसे काही आलबेल नाही हे अनेकांच्या लक्षात आले.

हेही वाचा… Maharashtra News Live : वेदांता- फॉक्सकॉनवरून भाजप आक्रमक; राज्यातील इतर महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर…

पालकमंत्री पद हुकले

हा संघर्ष ताजा असला तरीही नव्या मंत्रिमंडळात वजनदार खाती चव्हाण यांच्या वाट्याला आल्याने जिल्ह्याचे पालकमंत्री पदही त्यांनाच मिळेल अशी शक्यता भाजपच्या गोटात व्यक्त होत होती. नव्या मंत्रिमंडळात मुख्यमंत्री शिंदे यांच्या व्यतिरीक्त चव्हाण यांच्या रूपाने एकमेव मंत्री असल्याने हे पालकमंत्री पद भाजपच्या वाट्यालाच जाईल अशी अटकळ बांधली जात होती. चव्हाण यांचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांशी अतिशय निकटचे संबंध आहेत. खासदार शिंदे यांच्याशी फारसे सख्य नसले तरी एकनाथ शिंदे यांच्याशी चव्हाण यांचा जुना दोस्ताना आहे. त्यामुळे सुरत, गुवाहटी मोहीमेतही चव्हाण यांना शिंदे यांनी सोबत घेतले होते. असे असले तरी जिल्ह्यातील आणि विशेषत: कल्याण डोंबिवतील राजकारणावरील स्वत:ची पकड अजिबात ढिली होऊ द्यायची नाही असा चंग बांधलेल्या मुख्यमंत्री पुत्रामुळे चव्हाण यांचे ठाण्याचे पालकमंत्री पद हुकले अशीच भावना भाजप आणि चव्हाण समर्थकांमध्ये आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण ( Politics ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
इंडियन नॅशनल लोक दलाच्या सभेदरम्यान घडली एक गमतीदार घटना

संबंधित बातम्या

बिहार सरकारमध्येच ‘अग्निपथ’ योजनेवरून दुमत,भाजपा आणि जेडीयुमध्ये वादाची ठिणगी
gujarat election: २०२४ च्या भव्य विजयाचा भक्कम पाया!
अकोल्यात बच्चू कडू-भाजप सहकारपर्व?, भाजपकडूनही कडूंसाठी ‘पोषक भूमिका’ 
काँग्रेससह विरोधक राऊतांच्या पाठिशी, राज्यसभेत शिवसेनेसह राष्ट्रवादी काँग्रेसही निदर्शनांसाठी सभापतींसमोरील हौदात
महालक्ष्मी मंदिरात ऐन नवरात्र उत्सवात राजकीय कुरघोडी

व्हिडिओ

ताज्या बातम्या
ठरलं! ‘या’ ठिकाणी संपन्न होणार सिद्धार्थ मल्होत्रा-कियारा अडवाणी यांचा विवाह सोहळा
“मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री कधीच विरोधी पक्षांना विश्वासात घेत नाहीत” ; सुप्रिया सुळेंचा आरोप!
Pimpri-Chinchwad : पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या ‘या’ बड्या नेत्यांच्या उपस्थितीत एकदिवसीय शिबिर
यंत्रणेतील बिघाडामुळे वीज गायब; पुणे, पिंपरी-चिंचवडसह चाकण एमआयडीसीला फटका
सांगली : जिल्ह्यातील ४४७ गावापैकी ३८ गावच्या सरपंचांची निवड बिनविरोधी