Premium

महंताचा उल्लेख करीत मंत्री संजय राठोड यांची सावध खेळी

संत, महंंतांचा उल्लेख करीत समाजाची मते विरोधात जाणार नाहीत याची खबरदारी राठोड यांनी घेतली आहे.

Minister Sanjay Rathore
महंताचा उल्लेख करीत मंत्री संजय राठोड यांची सावध खेळी (छायाचित्र – लोकसत्ता ग्राफिक्स)

यवतमाळ – राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड यांनी, ‘गेल्या वर्षी राज्यात राजकीय उलथापालथ झाली तेव्हा आपण उद्धव ठाकरे यांच्या सोबतच राहण्याचा निर्णय घेतला होता. मात्र समाजाचे प्रश्न सोडवायचे असतील तर सत्तेत राहावे लागेल, असा सल्ला समाजातील संत, महंतांनी दिला. त्यामुळे अखेर गुवाहाटीला शिंदे यांच्या गटात गेलो’, असे वक्तव्य बीड जिल्ह्यातील गेवराई येथे बंजारा समाज मेळाव्यात केले. संत, महंंतांचा उल्लेख करीत समाजाची मते विरोधात जाणार नाहीत याची खबरदारी राठोड यांनी घेतली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस विधानसभा मतदारसंघातून संजय राठोड हे शिवसेनेच्या तिकीटावर चौथ्यांदा आमदार झाले. दिग्रस, दारव्हा, नेर या तालुक्यातील बंजारा समाजाचा त्यांना संपूर्ण पाठिंबा आहे. शिवाय बंजारा समाजाचे दैवत असलेल्या वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी येथे सातत्याने समाजाचे शक्ती प्रदर्शन भरवत संजय राठोड यांनी पक्षावर आणि राज्यातील विविध पक्षातील वरिष्ठ नेत्यांवर आपल्यामागे प्रचंड जनाधार असल्याचे चित्र निर्माण केले आहे. त्याचाच फायदा त्यांना स्वत:ची राजकीय उंची वाढविण्यात झाला. मात्र महसूल राज्यमंत्री असल्यापासून त्यांची राजकीय कारकीर्द चर्चेत राहिली आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये वनमंत्री असताना त्या खात्यातील सर्व अधिकार स्वत:कडे एकवटल्यामुळे ते प्रथम चर्चेत आले. त्यानंतर पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात त्यांच्यावर भाजपच्या महिला नेत्या चित्रा वाघ यांनी प्रचंड आरोप केल्याने राठोड यांचा राजकीय आलेख माघारला. या प्रकरणात त्यांना राजीनामा द्यावा लागल्याने ते प्रचंड बॅकफुटवर आले. दरम्यान गेल्या वर्षी जून महिन्यात एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात शिवसेनेच्या अनेक आमदारांनी उद्धव ठाकरे यांच्या विरोधात बंड केले. त्यावेळी संजय राठोड यांनी सावध पवित्रा घेतला. प्रारंभी आपण कट्टर शिवसैनिक असून उद्धव ठाकरेंची साथ सोडणार नसल्याचा पवित्रा त्यांनी घेतला होता. पंरतु, कोणाकडे जावे या संभ्रमात असलेल्या राठोड यांनी बंजारा समाजातील वरिष्ठांसह संत, महंतांचे मत जाणून घेतले. तेव्हा पोहरादेवीचा विकास आणि समाजासाठी भरीव काम करायचे असल्यास आता उद्धव ठाकरेंसोबत राहून चालणार नाही, तर सत्तेच्या बाजूने राहावे, असा सल्ला महंतांनी दिल्याचा गौफ्यस्फोट राठोड यांनी गेवराई येथील सभेत केला.

हेही वाचा – विरोधकांच्या बैठकीचे गांभीर्य कायम राहावे यासाठी नितीश कुमारांची धडपड, म्हणाले “बैठकीला फक्त…”

राठोड यांच्या विधानानंतर राजकीय वर्तुळात विविध तर्क लावले जात आहेत. बंजारा समाजातील महंतांनीही आपण राठोड यांना समाजाची कामे करण्यासाठी शिंदेंसोबत जाण्याचा सल्ला दिला होता, असे म्हटले आहे. मात्र राठोड यांच्या या वक्तव्यामागे कोणती राजकीय खेळी आहे, याची चाचपणी यवतमाळ, वाशिम जिल्ह्यात सुरू आहे. संजय राठोड यांच्या कार्यपद्धतीवर समाजातील अनेक संत, महंत नाराज असल्याच्या बातम्या मधल्या काळात आल्या होत्या. सुनील महाराजांसह काही महंतांनी राठोड यांना शह देण्यासाठी उद्धव ठाकरेंसोबत जावून शिवबंधन बांधले होते.

हेही वाचा – पक्षवेध : रौप्य महोत्सवी वर्ष राष्ट्रवादीसाठी कसोटीचे

उद्धव ठाकरे यांच्याही निशाण्यावर संजय राठोड कायम असतात. आपण राठोड यांना मोठ्या प्रसंगातून बाहेर काढूनही त्यांनी साथ सोडल्याची खंत उद्धव ठाकरेंनी अनेकदा जाहीरपणे मांडली आहे. पोहरादेवी येथे येवून राठोड यांच्या विरोधात जंगी सभा घेण्याची घोषणाही काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांनी केली होती. समाजातील संत, महंत विरोधात गेले तर येत्या निवडणुकीत समाज विरोधात जावू शकतो, याची कुणकुण बहुधा संजय राठोड यांना लागली असावी, त्यामुळेच त्यांनी शिंदे गटात सहभागी होण्याचा सल्ला देणारे महंतच होते, म्हणून आपली बाजू सुरक्षित केली असावी, असा कयास बांधला जात आहे. मात्र समाजाच्या भल्यासाठी शिंदे गटात जाण्याचा सल्ला महंतांनी दिला नसता तर, संजय राठोड आजही खरेच उद्धव ठाकरेंसोबत असते का? यावर आता कार्यकर्ते काथ्याकुट करत आहेत.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 08-06-2023 at 13:04 IST
Next Story
पक्षवेध : रौप्य महोत्सवी वर्ष राष्ट्रवादीसाठी कसोटीचे