बिहार विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपाने त्यांची रणनीती आखायला सुरूवात केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी २४ एप्रिल रोजी मधुबनी इथे एका सभेला संबोधित करण्याची शक्यता आहे. सत्ताधारी भाजपा-जेडीयू युती त्यांच्या बालेकिल्ल्यात पाठिंबा मजबूत करण्यासाठी प्रयत्न करत आहे. नोव्हेंबर २०२४ मध्ये, बिहारच्या दरभंगा इथे एम्स कॅम्पसची पायाभरणी करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इथली एक म्हण ऐकवली होती. “पुग पुग पोखरी, मच्छ माखान… मधुर बोल, मुस्की मुख पान”, असे म्हणत पंतप्रधानांनी मिथिलांचलमधील तलाव, मासे, मखाना आणि इथली बोली याचे वर्णन केले.
त्याच दरम्यान केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी मधुबनीला भेट दिली होती. तिथे झालेल्या एका क्रेडिट आउटरीच कार्यक्रमादरम्यान ५० हजार २९४ लाभार्थ्यांना १ हजार १२१ कोटी रूपयांचे कर्ज वाटप करण्यात आले. १ फेब्रुवारीला सादर केलेल्या अर्थसंकल्पात सीतारामण यांनी दलित कलाकार दुलारी देवी यांनी भेट दिलेली मधुबनी कलाकृतीची साडी परिधान केली होती. अर्थसंकल्पात त्यांनी मिथिलांचलसाठी महत्त्वपूर्ण घोषणा केली. मिथिलांचल इथे मोठ्या प्रमाणात पिकवल्या जाणाऱ्या मखानाच्या उत्पादन आणि विपणनाला चालना देण्यासाठी मखाना बोर्डाची स्थापना करण्याची घोषणा केली.
९ मार्चला अहमदाबाद इथे ‘शाश्वत मिथिला महोत्सव २०२५’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला संबोधित करताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी गुजरातच्या विकासात योगदान दिल्याबद्दल मिथिलांचल आणि बिहारच्या लोकांचे कौतुक केले होते. “या प्रदेशाला लोकशाही आणि तत्त्वज्ञानाच्या सशक्तीकरणाचा इतिहास आहे”, असं शाह यांनी त्यावेळी म्हटले होते. त्यानंतर आता २४ एप्रिलला पंतप्रधान नरेंद्र मोदी मधुबनी जिल्ह्यातील झांझरपूरला एका सार्वजनिक सभेत उपस्थित राहणार असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. वर्षाअखेरीस होणाऱ्या बिहार विधानसभा निवडणुकीसाठी भाजपा मिथिलांचलला आपल्या प्रचाराचा केंद्रबिंदु बनवणार असल्याचे यावरून स्पष्ट होते अशी चर्चा सध्या आहे.
मिथिलांचलचे महत्त्व
मिथिलांचल प्रदेशात सीतामढी, मधुबनी, सहरसा, दरभंगा, मधेपुरा, कटिहार, सुपौल, अररिया, बेगुसराय, समस्तीपूर, पूर्णिया आणि मुझफ्फरपूर यांसह अनेक जिल्हे आहेत. बिहारच्या २४३ विधानसभा जागांपैकी १००हून अधिक जागा इथे आहेत. यापैकी बहुतेक जागा सध्या भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएकडे आहेत. या प्रदेशात बोलली जाणारी मैथिली ही राज्याच्या १३ कोटी लोकसंख्येपैकी सुमारे एक तृतीयांश लोकांची भाषा आहे. मिथिलांचल हा सांस्कृतिकदृष्ट्या एकसंध प्रदेश आहे आणि त्याची स्वत:ची वेगळी ओळख आहे. हे लक्षात घेऊन मिथिलांचल त्यांच्या प्रचाराचा केंद्रबिंदु असेल असे एनडीएच्या सूत्रांनी स्पष्ट केले आहे. गेल्या काही दशकांमध्ये एनडीएने या राज्यात चांगली कामगिरी केलेली असली तरीही आता नव्याने सुरूवात करत हा पाठिंबा आणखी मजबूत करण्याचा उद्देश असल्याचेही सूत्रांनी सांगितले.
या राज्यातील काही भागात आरजेडी (राष्ट्रीय जनता दल) पुन्हा आपले स्थान मिळवण्यासाठी धडपड करत आहे. भाजपाने मिथिलांचलमध्ये प्रचार सुरू केला आहे. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये झालेल्या राजदच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत राज्य विधानसभेतील विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांनी मिथिला विकासासंदर्भात आश्वासन दिले होते. २०२५च्या निवडणुकीत विरोधी पक्ष इंडिया आघाडी सत्तेत आल्यास मिथिला विकास प्राधिकरण स्थापन करण्याचे आश्वासन त्यांनी दिले होते.
दोन महिन्यांनंतरच, राज्याच्या विधान परिषदेच्या हिवाळी अधिवेशनात, राष्ट्रीय जनता दलाच्या नेत्या आणि बिहारच्या माजी मुख्यमंत्री राबडी देवी यांनी बिहारमधून मिथिलांचल वेगळे करून ते एक स्वतंत्र राज्य बनवण्याची मागणी केली होती. दि इंडियन एक्सप्रेसशी बोलताना जेडीयूचे कार्यकारी अध्यक्ष संजय झा यांनी सांगितले की, “एनडीएला या प्रदेशात पाठिंबा मिळाला आहे आणि युती तिथे आपला पाठिंबा मजबूत करण्याचा विचार करत आहे.”
“अलिकडेच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मिथिलांचल पट्ट्यात आम्ही चांगली कामगिरी केली आहे. २०२० मध्ये या प्रदेशाने आम्हाला सरकार स्थान करण्यात मोठी मदत केली. मात्र, हा प्रदेश पूरप्रवण राहिला आहे. इथे स्थलांतरितांच्या अनेक गंभीर समस्यांना तोंड द्यावे लागले आहे. केंद्र आणि राज्य सरकारचे लक्ष या प्रदेशाचा विकास करणे आणि केवळ स्थलांतर थांबवणे एवढाच नाही. तर इथे मोठ्या प्रमाणात गुंतवणुकीला चालना मिळवून देणे हेदेखील आहे. अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या पूर निधीमुळे या प्रदेशात सिंचनाचा मोठ्या प्रमाणात विस्तार होईल. मखाना बोर्ड कृषी प्रक्रियांना आवश्यक ते प्रोत्साहन देईल”, असे झा यांनी सांगितले.
जेडीयूचे नेते मिथिलांचलमधील प्रकल्पांच्या वाटाघाटीमध्ये कायम आघाडीवर राहिले आहेत. गेल्या वर्षी लोकसभा निवडणुकीनंतर सादर झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात बिहारला मिळालेल्या पूरनिधीसाठी त्यांनी जोरदार लॉबिंग केल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. झा यांनी यापूर्वी मैथिली भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची मागणी केली होती. गेल्या नोव्हेंबरमध्ये राष्ट्रपतींनी मैथिली भाषेत संविधान प्रसिद्ध केले होते.
“दीर्घकाळापासून मिथिलांचल अविकसित राहिले आहे. आपल्याला या प्रदेशाने अनुभवलेल्या ऐतिहासिक वंचिततेची भरपाई करावी लागेल. बिहारच्या इतर भागांपेक्षा या प्रदेशात गरिबी जास्त आहे. इथे पंतप्रधानांच्या आकांक्षी जिल्हा कार्यक्रमांतर्गत आलेल्या जिल्ह्यांची संख्याही जास्त आहे. म्हणून या प्रदेशाकडे विशेष लक्ष देणे ही काळाची गरज आहे”, असे बिहार भाजपाचे उपाध्यक्ष संतोष पाठक यांनी दि इंडियन एक्सप्रेसशी बोलताना सांगितले. एकंदर भाजपाच्या या गेमप्लानमुळे बिहार विधानसभा निवडणुकीत सरकार पाय आणखी घट्ट रोवण्यात किती यशस्वी ठरेल हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.