MK Stalin on Joseph Vijay Government : तमिळनाडूचे मुख्यमंत्री जोसेफ विजय यांच्या नेतृत्वाखालील सरकार पाच वर्षांचा कार्यकाळही पूर्ण करू शकणार नाही, असा सनसनाटी दावा द्रमुकचे नेते एम. के स्टॅलिन यांनी सोमवारी केला. तसेच, राज्यात कधीही मध्यावधी निवडणुका होऊ शकतात, असा इशारा देत त्यांनी कार्यकर्त्यांना आत्तापासूनच निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे आदेश दिले. स्टॅलिन यांच्या या दाव्यामुळे तमिळनाडूच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून मध्यावधी निवडणुकांच्या चर्चांना उधाण आले आहे. गेल्या महिन्याभरात माजी मुख्यमंत्र्यांनी दुसऱ्यांदा हा दावा केल्यामुळे विजय सरकारच्या स्थैर्यावरही अनेकांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

तमिळनाडूमध्ये दोन महिन्यांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर मोठी राजकीय उलथापालथ पाहायला मिळाली. पहिल्यांदाच निवडणूक लढवणाऱ्या ‘तमिळगा वेत्री कळघम’ (TVK) पक्षाने सर्वाधिक जागा जिंकून राज्यात काँग्रेसच्या मदतीने सरकार स्थापन केले; तर राज्यातील दोन प्रादेशिक पक्ष असलेल्या द्रमुक आणि अण्णाद्रमुकला कमी जागा मिळाल्यामुळे सत्तेबाहेर राहावे लागले. त्याचवेळी टीव्हीकेला सत्तेतून दूर ठेवण्यासाठी या दोन्ही पक्षांमध्ये निवडणुकीनंतर युतीची चर्चा झाल्याचे समोर आले होते. तरीदेखील विजय यांनी काँग्रेसच्या मदतीने बहुमताचा आकडा गाठून मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर अण्णाद्रमुकच्या एका गटानेही विजय यांना पाठिंबा देऊन सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला. यादरम्यान सत्ताधारी पक्षाकडे विधानसभेत चांगले संख्याबळ असूनही स्टॅलिन यांच्याकडून सरकारच्या स्थैर्यावर सातत्याने प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.

विजय यांचे सरकार कोसळणार?

माजी मुख्यमंत्री एम. के स्टॅलिन यांनी सोमवारी चेन्नई येथील एका कार्यक्रमाला हजेरी लावली. यावेळी विविध पक्षांतील पाच हजारांहून अधिक कार्यकर्त्यांनी द्रमुकमध्ये जाहीर प्रवेश केला. या पक्षप्रवेशानंतर उपस्थितांना संबोधित करताना स्टॅलिन यांनी सत्ताधारी पक्षाकडे सरकार टिकवण्यासाठी आवश्यक संख्याबळ नसल्याचे अधोरेखित केले. “राज्यातील सत्य परिस्थितीचा विचार केल्यास सध्या सत्ताधारी पक्षाला स्वतःच्या ताकदीवर स्थिर सरकार स्थापन करण्यासाठी स्पष्ट बहुमत मिळालेले नाही. जोसेफ विजय यांच्या नेतृत्वाखालील हे अल्पमतातील सरकार पुढील तीन ते सहा महिन्यांत कधीही कोसळू शकते. कारण हे सरकार अशा पक्षांच्या पाठिंब्यावर चालत आहे, जे काही काळापूर्वी द्रमुकच्या नेतृत्वाखालील आघाडीचा भाग होते. आमच्या धर्मनिरपेक्ष पुरोगामी आघाडीतून बाहेर पडलेल्या काही पक्षांनी राजकीय तडजोड करून पाठिंबा दिल्यामुळेच सध्या टीव्हीकेची ही गाडी कशीबशी पुढे सरकते आहे,” असे स्टॅलिन यांनी नमूद केले.

तमिळनाडूत पुन्हा निवडणुका?

जोसेफ विजय यांच्या नेतृत्वाखालील सरकारची तुलना एका डळमळीत वाहनाशी करताना स्टॅलिन म्हणाले की, सध्याचे सरकार अतिशय अस्थिर असून ते किती काळ टिकणार आणि कोणत्या वळणावर त्यांचा तोल जाईल हे सांगता येत नाही. त्यामुळे राज्यात कधीही निवडणुका लागू शकतात. आगामी तीन किंवा सहा महिन्यांतही निवडणुका होऊ शकतात. या सरकारचा पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होण्याची वाट पाहून चालणार नाही. त्यामुळे द्रमुकच्या कार्यकर्त्यांनी आतापासून कामाला लागून मतदारांशी संपर्क वाढवायला हवा. निवडणुकीच्या तारखांची घोषणा होण्याची वाट पाहू नका. कोणत्याही राजकीय घडामोडीसाठी आपण शंभर टक्के तयार असले पाहिजे, असेही स्टॅलिन यांनी म्हटले आहे. तमिळनाडूतील बदलत्या राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर त्यांचे हे वक्तव्य अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे.

राज्यातील बदलती समीकरणे

२३ एप्रिल रोजी झालेल्या विधानसभा निवडणुकीत तमिळगा वेत्री कळघम पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नव्हते. त्यानंतर काँग्रेस, डावे पक्ष, विदुथलाई चिरुथैगल काची आणि इंडियन युनियन मुस्लीम लीग (IUML) या पक्षांनी टीव्हीकेला पाठिंबा दिल्याने जोसेफ विजय यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झाले. विशेष म्हणजे, हे सर्व पक्ष निवडणुकीपूर्वी द्रमुकच्या नेतृत्वाखालील आघाडीचे घटक होते. दरम्यान, शनिवारी वायको यांच्या नेतृत्वाखालील मरुमलार्ची द्रविड मुनेत्र कळघम (MDMK) या पक्षानेही द्रमुकच्या धर्मनिरपेक्ष प्रगतीशील आघाडीतून बाहेर पडत टीव्हीके सरकारला पाठिंबा जाहीर केला. त्यामुळे तमिळनाडूतील राजकीय घडामोडींना आणखी वेग आला असून आगामी काळात राज्यातील सत्तासमीकरणांवर सर्वांचे लक्ष लागले आहे.

स्टॅलिन यांच्या दाव्यावर टीव्हीकेची प्रतिक्रिया

जोसेफ विजय यांचे सरकार कोसळणार असल्याचा स्टॅलिन यांच्या दावा टीव्हीकेच्या नेत्यांनी फेटाळून लावला आहे. विधानसभा निवडणुकीत तमिळनाडूच्या जनतेने द्रमुकला पूर्णपणे नाकारले आहे. त्यांचे अनेक मंत्री पराभूत झाले असून हा धक्का स्टॅलिन अजूनही पचवू शकलेला नाही, असा टो टोला टीव्हीकेच्या प्रवक्त्यांनी लगावला. द्रमुकपेक्षा टीव्हीकेचा स्वतंत्र जागांवरचा मतांची टक्केवारी आणि एकूण मते कितीतरी पटीने अधिक आहेत, त्यामुळे आम्हाला अल्पमतातील सरकार म्हणणे चुकीचे आहे. सत्ता गमावल्यामुळे द्रमुकच्या नेत्यांमध्ये प्रचंड नैराश्य आले आहे. केवळ दोन महिने उलटले असतानाच सरकार पडण्याच्या वावड्या उठवणे ही द्रमुकची घबराट दर्शवते. आमचे सरकार पूर्ण पाच वर्षे टिकेल आणि जनतेसाठी काम करेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.