बाळासाहेब जवळकर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारचा बहुप्रतीक्षित मंत्रिमंडळ विस्तार अखेर पार पडला. पहिल्या टप्प्यात १८ जणांचा कॅबिनेटमंत्री म्हणून समावेश झाला. मात्र, गेली काही वर्षे मंत्रीपदाच्या आशेवर असलेले पिंपरी-चिंचवड भाजपचे ताकदीचे नेते व आमदार महेश लांडगे यांना पहिल्या यादीत संधी मिळाली नाही. त्यामुळे स्वत: लांडगे तर नाराज झालेच, पण त्याचबरोबर त्यांचे समर्थक आणि शहर भाजपच्या कार्यकर्त्यांचाही हिरमोड झाल्याचे दिसून येते. पिंपरी पालिकेच्या आगामी निवडणुकांमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात थेट सामना होणार, हे स्पष्ट आहे. माजी उपमुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांचा चेहरा पुढे करूनच राष्ट्रवादी पिंपरीत निवडणुका लढवणार आहे.

दुसरीकडे, शहर भाजपचे नेतृत्व आमदार लांडगे व दुसरे आमदार लक्ष्मण जगताप यांचे बंधू शंकर जगताप यांच्याकडे राहणार असल्याचे पक्षश्रेष्ठींनीच स्पष्ट केले आहे. अशा वेळी भाजपला स्थानिक पातळीवर ताकद मिळावी, अशी कार्यकर्त्यांची भावना आहे. शहराला मंत्रीपद मिळावे, अशी कार्यकर्त्यांची मागणी जुनीच आहे. पिंपरी पालिकेच्या २०१७ च्या निवडणुकांपूर्वी भाजप नेतृत्वाने ‘पालिकेत सत्ता आणा, तुम्हाला मंत्रीपद दिले जाईल’ असे आश्वासन दिले होते. त्यामुळेच आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे यांनी सर्व शक्ती पणाला लावून निवडणुका लढवल्या. १५ वर्षे अजित पवारांकडे असणारी महापालिका या आमदारजोडीने भाजपला जिंकून दिली. मात्र, त्यांना मंत्रीपद मिळाले नाही. २०१९ मध्ये राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले. त्यामुळे आमदार जगताप व लांडगे यांच्या मंत्रीपदाचा प्रश्न निकाली निघाला. या दोन्ही आमदारांपैकी एकतरी आमदार राष्ट्रवादीत यावा, जेणेकरून पिंपरी-चिंचवडमध्ये पुन्हा राष्ट्रवादीचे वर्चस्व प्रस्थापित करता येईल, यासाठी अजित पवारांनी बरेच प्रयत्न केले. तथापि, दोन्हीही आमदारांकडून पवारांना अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. दोन्हीही आमदार फडणवीस यांचेच नेतृत्व मानतात. पुन्हा सत्ता आल्यानंतर फडणवीस आपल्याला संधी देतील, असे दोन्ही आमदारांना खात्रीशीरपणे वाटत होते. बऱ्याच उलथापालथीनंतर राज्यात पुन्हा भाजप सत्तेत आला. त्यामुळे शहराच्या मंत्रीपदाचा विषय पुन्हा ऐरणीवर आला. ज्येष्ठतेच्या निकषानुसार २००४ पासून आमदारपदी असलेल्या जगताप यांचा प्राधान्याने विचार होऊ शकत होता. मात्र ते बऱ्याच दिवसांपासून आजारी आहेत.

गेल्या काही दिवसांत जगतापांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. तरीही तूर्त त्यांच्या नावाचा विचार होण्याची शक्यता नाही. त्यामुळेच शहरातून आमदार लांडगे यांच्याच नावाची चर्चा होती. त्यांनी मंत्रीपदासाठी बरीच मोर्चेबांधणी केली होती. मात्र, त्यांचा अपेक्षाभंग झाला आहे. पहिल्या यादीत नाव नसले तरी, आगामी पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुढील विस्तारात संधी मिळेल, या आशेवर महेश लांडगे आहेत. चौकट अजित पवार- फडणवीस ‘अंतर्गत सांमजस्य’? पिंपरी पालिका २०१७ मध्ये भाजपच्या ताब्यात आली. यापुढेही महापालिका आपल्याकडेच राहील, यादृष्टीने भाजपचे शर्थीचे प्रयत्न राहणार आहेत. त्याचाच एक भाग म्हणून पालकमंत्रीपद चंद्रकांत पाटील यांच्याकडे नको; तर, ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असावे, ही मागणी पुण्याबरोबरच पिंपरी-चिंचवड भाजप कार्यकर्त्यांचीही आहे.

पिंपरी-चिंचवडमध्ये चंद्रकांत पाटील यांना फारसे कोणी गांभीर्याने घेत नाही. अजित पवार यांच्याशी दोन हात करायचे असल्यास पाटील यांचा काहीही उपयोग होणार नाही, याविषयी भाजपच्या सर्व गटातटात एकमत आहे. शहरातील मोठा गट चंद्रकांत पाटील यांच्या कार्यपध्दतीवर नाराज आहे. निवडणुका जिंकण्यासाठी फडणवीस यांच्यासारखे आक्रमक नेतृत्व कार्यकर्त्यांना हवे आहे. मात्र, फडणवीस आणि पवार यांच्यात कथित ‘अंतर्गत सांमजस्य’ आहे. त्यामुळे पवारांशी थेट संघर्ष घेण्यासाठी फडणवीस पुण्याचे पालकमंत्रीपद स्वत:कडे घेतील का, याविषयी मतमतांतरे आहेत.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mla mahesh landge is not included in eknath shindes cabinet print politics news pkd
First published on: 11-08-2022 at 12:14 IST