सोलापूर : नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत राज्यात महाविकास आघाडीने महायुतीला धोबीपछाड दिल्याच्या पार्श्वभूमीवर आगामी विधानभा निवडणुकांमध्ये महायुतीच्या आमदारांसाठी धोक्याचा इशारा मानला जात आहे. त्यातूनच महायुतीचे आमदार व त्यांच्या समर्थकांनी मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर पुन्हा आमरण उपोषणास बसलेले मनोज जरांगे-पाटील यांना पाठिंबा देण्यास सुरुवात केली आहे. सोलापूर जिल्ह्यात माढ्याचे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार बबनराव शिंदे यांनी जरांगे यांना पाठिंबा जाहीर केला आहे. तर बार्शीत भाजपचे सहयोगी आमदार राजेंद्र राऊत यांच्या समर्थकांनी भर पावसात मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ निदर्शने केली.

नुकत्याच झालेल्या माढा लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे धैर्यशील मोहिते-पाटील यांनी भाजपचे मावळते खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांचा एक लाख २० हजारांपेक्षा जास्त मताधिक्याने पराभव केला आहे. यात त्यांचे पारंपरिक विरोधक तथा राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ज्येष्ठ आमदार बबनराव शिंदे यांच्या माढा विधानसभा क्षेत्रातून ५२ हजार ५१५ तर त्यांचे बंधू तथा राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सहयोगी अपक्ष आमदार संजय शिंदे यांच्या करमाळा विधानसभा क्षेत्रातून ४१ हजार ५११ मतांची मोठी आघाडी घेतली होती. या दोन्ही विधानसभा क्षेत्रांत मिळून ९४ हजारांपेक्षा जास्त मताधिक्य धैर्यशील मोहिते-पाटील यांनी मिळविल्याने आगामी विधानसभा निवडणुकांच्या दृष्टिकोनातून शिंदे बंधूंसाठी धोक्याचा इशारा मानला जात आहे. अर्थात मोहिते-पाटील यांच्या विजयासाठी महायुतीविरोधात मराठा आरक्षणाच्या मुद्यावर मराठा समाज आणि नाराज शेतकऱ्यांनी दिलेला कौल महत्वाचा मानला जातो.

हेही वाचा – डॉ. हेमंत सावरा (पालघर – भाजप) : वडिलांची पुण्याई

लोकसभा निवडणुकांपूर्वी मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर सकल मराठा समाजाने केलेल्या आंदोलनाच्यावेळी आमदार बबनराव शिंदे यांनी कथित आक्षेपार्ह विधान केल्यामुळे ते अडचणीत आले होते. आक्रमक मराठा आंदोलकांसमोर त्यांना माफीही मागावी लागली होती. या पार्श्वभूमीवर माढा लोकसभा निवडणुकीत मोहिते-पाटील यांनी शिंदे बंधूंच्या माढा व करमाळ्यातून मोठे मताधिक्य मिळविल्यामुळे आगामी विधानसभा निवडणूक शिंदे बंधूंना जड जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्यातूनच महायुतीच्या विरोधात दुरावलेल्या मराठा समाजाला आपलेसे करण्यासाठी आमदार बबनराव शिंदे यांनी आंतरवली सराटी येथे मनोज जरांगे यांनी पुन्हा सुरू केलेल्या उपोषणाला जाहीर पाठिंबा दिला आहे. या पाठिंब्याचे पत्र त्यांचे पुत्र रणजितसिंह शिंदे यांनी थेट आंतरवली सराटी गावात जरांगे यांना भेटून दिले आहे.

दुसरीकडे बार्शीचे भाजप पुरस्कृत अपक्ष आमदार राजेंद्र राऊत यांनी स्वतः आंतरवली सराटीत धाव घेऊन जरांगे यांची भेट घेतली. तर इकडे बार्शीमध्ये त्यांच्या समर्थकांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन सुरू केले आहे. मराठा समाजाला अपेक्षित ओबीसी आरक्षण मिळवून देण्यासाठी आमदार राऊत हे जोरदार पाठपुरावा करीत असल्याचा दावाही त्यांचे समर्थक आंदोलनातून करीत आहेत. आमदार राऊत हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कट्टर अनुयायी मानले जातात. बार्शी विधानसभा क्षेत्र शेजारच्या धाराशिव लोकसभा मतदारसंघात मोडले जाते. नुकत्याच झालेल्या धाराशिव लोकसभा निवडणुकीत शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नवनिर्वाचित खासदार ओमराजे निंबाळकर यांनी बार्शीतून तब्बल ५४ हजार १९० मतांची आघाडी घेतली होती. त्यामुळे आमदार राऊत यांच्यासाठी आगामी विधानसभा निवडणुकीचा विचार करता धोक्याची घंटा मानली जात आहे. या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षण प्रश्नावर मराठा समाजाची नाराजी दूर करण्यासाठी आमदार राऊत व त्यांचे समर्थक खटाटोप करीत असल्याचे त्यांच्या हालचालींवरून मानले जात आहे.

हेही वाचा – आमदारकीला पराभूत ते आता थेट उपमुख्यमंत्री! अभिनेता पवन कल्याण यांनी कसा उभारला नवा पक्ष?

मराठा आरक्षण आंदोलनास पाठिंबा

पूर्वीपासून आरक्षणापासून वंचित राहिलेल्या मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात कुणबी मराठा सगे सोयरे या शब्दाचा अंतर्भाव करून लाभ मिळण्यासाठी आंतरवली सराटीमध्ये मनोज जरांगे-पाटील यांच्या सुरू असलेल्या आंदोलनास पाठिंबा देत आहे. – आमदार बबनराव शिंदे, माढा